एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ३ नोव्हेंबर, २००७

रेशमाच्या बाबांनी

आमची प्रेरणा शांताबाई शेळके यांचे अप्रतिम गाणे रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

(...एकटी मी !)

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची सुरेख कविता ...एकटी मी !
(...एकटी मी !)

ये घरी नाही कुणीपण...एकटी मी !
दूर कर माझे सुनेपण...एकटी मी !

रोज सांगावा तुला मी धाडते रे
रोज आडोशास तुजला भेटते रे
चटक मज आहे विलक्षण एकटी मी !

कालची ती चूक...नाही रे गुन्हा जर
तो गुन्हा तू आज सखया रे पुन्हा कर
पाहिजे आहे मलापण... एकटी मी !

गुपित अपुले सांग, कुठवर सांग तोलू ?
गाव सारे बघ अता लागेल बोलू
तोंड मी लपवू कुठे पण...एकटी मी !

पाहरे, आहेत माझ्या भोवताली
कर अता काही तरी तू हालचाली
कळत हे नाही तुलापण...एकटी मी !

पाहण्या आलाय मजला आज तो रे
पाहुनी मजला असा तो हासतो रे
वाटले हसतोय रावण...एकटी मी !

- केशवसुमार
(रचनाकाल ः सायं. ६ ते ११, १३ सप्टेंबर २००७)

ती ब्याद लांब गेली

आमची प्रेरणा बकुळ यांची कविता ती वाट लांब गेली

मी आठवू कशाला जो
काल 'भूत' झाला
होता कसा असा हा
माझ्या गळ्यात आला

डोक्यावरी तयाच्या
न मुळीही केस होते
नाना परी कळा अन
डोळ्यांस भिंग होते

हृदयात आस होती
नि मुळात त्रास होता
चालू परंतु त्याचा
हा अट्टाहास होता

सोडून लाज सारी
चोखाळी वामरस्ता
जरी बंद बार सारे
शोधी इथे हा गुत्ता

आता मनास वाटे
का हे खरेच झाले?
ती ब्याद लांब गेली
झाले बरेच झाले

...कुणी सुजवले अंग !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...निळसर झाले अंग !
...कुणी सुजवले अंग !
............................................

गालांचा का हा निळसर झाला रंग !
मज नका विचारू, कुणी सुजवले अंग !!

पाहिले तिला ती मला भासली हूर
ती दिसली की मम मनी उठे काहूर
ती समीप येता...धडधडते हे ऊर
विसरुनी स्वतःला तिच्यात होतो दंग !

स्वप्नात खुणावे रोज मला ती आता
मी तिला मारण्या ,मिठी धावत जाता
सोबतीस होती तिथे तिची पण माता...
मातेने केला मम स्वप्नाचा रस भंग !

ही जिथे जिथे, तू तिथे तिथे येतोस...
पाहून हिला अन वेड्या गत हसतोस...
तू बऱ्याचदा मज गल्लीतही दिसतोस..
तू छळण्याचा का आहेस बांधला चंग ?

तू आजूबाजूला तिच्या जर दिसलास...
घेईन जीव जर पुन्हा बघून हसलास !
मी काल विसरलो त्या मातेचा ढोस...
मज वाचवण्या तो आला ना श्रीरंग !

- केशवसुमार
रचनाकाल ः ५ व ६ सप्टेंबर २००७

मला तुझ्या बापाची भीती

आमची प्रेरणा अनंत ढवळे यांची अप्रतिम गझल मला तुझ्या धर्माची भीती

लिहिताना शब्दांची भीती
लिहिल्यावर अर्थाची भीती

उघडयावर बसण्यास चालला
हा लोटा फुटण्याची भीती...

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या बापाची भीती

खाटेबद्दल शंका नाही
तव बोजड देहाची भीती...

सगळ्यांना "केश्या"वर शंका
विडंबने पडण्याची भीती

होतोय त्रास मजला

आमची प्रेरणा विश्वास यांची गझल आहे उसंत कोठे

होतोय त्रास मजला खाली बसायला
जातेय काय तुमचे नुसते हसायला

कारण पराभवाचे देऊ नकोस तू
चुपचाप घे अता तू पत्ते पिसायला

मी ही जपून थोडे बोलायला हवे
असते तयार पत्नी येथे रुसायला

फुकटात चापण्याला गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला

घेऊन धोतऱ्याची आलास ही फुले
समजू नकोस वेडी मजला फसायला

आली कुठून सासू माझ्या घरात ही
घडणार काय पुढती लागे दिसायला

बाहूत बायकोच्या होतो मजेत मी
हा सासरा तिथे ही आला डसायला

जी वाट लागलेली माझी घरा मधे
तुम्ही तिथे नको पण होते असायला

होता सुखात "केश्या" लग्ना विना किती
बघ लागतात आता फर्श्या पुसायला

मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

टवाळशेठांच्या भाषांतरांनी प्रभावीत होऊन आम्हाला वाटलं आपण ही अस काहीतरी करावं. लगेच जालावर हिंदी गाण्याची संकेतस्थळ शोधली, एक जुने गाणे घेतले आणि लागलो कामाला..थोड्या वेळातच आमचं हिंदी ( की उर्दू) भाषेच ज्ञान(?) आणि त्याहून अगाध आमचं मराठी शब्दभांडार उघडं पडलं. पण जिलब्या पाडायला घेतलेले हे कार्य अर्धवट सोडणं आमच्या शान ( हिंदी ,मराठी नाही ) च्या खिलाफ होत.मग आम्ही परतीचा मधला रस्ता धरला आणि त्या जुन्या गाण्याच्या चाली वर ५-६ ओळी खरडल्या..

मी गं पुरता वेडा झालो पाहून तुला
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

हलवीत वेण्यांना तू नको अशी चालू
लाजूनीया पदराशी नको असे खेळू
तुझी पाहूनीया चाल, माझ्या काळजाचा हाल
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

डोळ्यावर आली तुझ्या बट एक काळी
गालावर खुललेली गुलाबाची कळी
तुझे पाहूनीया गाल, माझ्या काळजाचा हाल
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

चाल : तीच तर तुम्हाला ओळखायची आहे..
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखत बसू नका.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहितील )
४. फक्त चाल ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करू नका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )

तोरा-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल तोरा

दुसऱ्याने दु:खात रहावे
आपण आनंदात रहावे!

वय झाले, का वखवख करता?
गुपचुप - देवघरात रहावे

चिक्कीचे तुकडे खाताना
कवळीने तोंडात रहावे

वजन वाढले फार तरीही
पीत रहावे, खात रहावे

घोटावी दाढी पण थोडी
हजामा कडे जात रहावे

कानामध्ये घाला बोळे
गाणार्‍याने गात रहावे!

नशिबाने हा पदर पडावा
अन आम्ही धक्यात रहावे

वासाचा नसतोच भरवसा
खाताना लक्षात रहावे

मलाच येथे कळते सारे
मी अपल्या तोऱ्यात रहावे

ह्या "केश्या"ला अक्कल आली
का असल्या स्वप्नात रहावे?

(...हा सुखाचा सोहळा !!)

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची सुरेख कविता ...हा सुखाचा सोहळा !!

(...हा सुखाचा सोहळा !!)

दार हे उघडेच थोडे ठेउनी मी झोपलो
काल मजला मच्छरांनी त्यामुळे छळले किती...!
भोवती माझ्या कसे बघ गीत गुणगुणतात हे ?
लावले कासव; तरीही डास घुटमळती किती !

सोड माझी पाठही अन् सोड माझी साथही
चार घटका झोप मजला घेउनी देऊ नको...
पाठ ही मी खाजवोनी,रात्र सारी जागतो...
रे मला चाऊ नको तू रे मला चाऊ नको...

आज ओडोमास हे मी जाउनी बघ आणले
अंगभर चोपून माझ्या तू जरा देतेस का ?
आज मी झोपेन म्हणतो पार मुडद्या सारखा...
आज माला झोपण्याला तू मदत करतेस का?

झोप झाली; बोललो...हे सांग आहे का खरे ?
झोपण्याचे स्वप्न माझे जाहले साकार का ?
आपल्या गाद्या जरा डागाळल्या गेल्या तरी...
रोज ओडोमास मजला फासुनी देणार का ?

अजुन हा बघ गंध आहे, ही निशा गेली तरी...
रंग ही गादीस आहे, बघ जरासा सावळा
रात्र ही येते...तशी मज झोपही येते अता
आणि ओडोमासने मज...हा सुखाचा सोहळा !!

(रचनाकाल ः २२ ऑगस्ट २००७ )
- केशवसुमार

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

आमची प्रेरणा पुन्हा एकदा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो.मिलिंदशेठनी आपल्या आताशा मी फक्त बकाणे चकण्याचे भरतो या विडंबनात ज्या बेवड्याची कैफियत मांडली आहे त्याचा भूतकाळ बहुतेक असा असावा..

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो
रोज रात्री रिचवून थोडी घराकडे निघतो

जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे
जाणीव कुठली? मुळात मजला शुद्ध नको आहे
ह्या शुद्धीशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे तिला, तिने ही छळू नये मजला
बधिरतेच्या गुंगीवर मी रोज असा डुलतो

आता आता छाती केवळ धुरास साठवते
दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते
आता चालती दिलखुष गप्पा बारबालांशी
आता असते रात्रही माझी थोडीशी हौशी
कलंदरीने पेल्यावर हा पेला मी भरतो

कळून येता जगण्याची मज इवलीशी त्रिज्या
उतरून गेली पुरती माझी पिण्याची मौजा
बाई बाटली सर्व जाहला बंद अता चाळा
जगा न कळले असा कसा हा झाला घोटाळा
स्वप्नी हल्ली बघ माझ्या हा यम काळा येतो!

आताशा मी फक्त विडंबन गझलांचे करतो..

आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आणि मिलिंद छत्रे यांनी केलेले सुरेख विडंबन आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो

आताशा मी फक्त विडंबन गझलांचे करतो
चाकोरीचे खरडून तुमच्या चरणी पाठवतो

छंद नको मज कुठलाही अन् ताल नको आहे
मात्रा कसल्या? मुळात मजला वृत्त नको आहे
ह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेने शब्दावर मी शब्द इथे भरतो

आता आता डोके केवळ तिरके चालवते
गझला बघता वाव्वा आधी खोडी आठवते
नंतर होती दिलखुष गप्पा कविवर मित्रांशी
मिळती मजला प्रतिसाद ही थोडेसे हौशी
कलंदरीने बिलंदरी ही गीते मी रचतो

कळून येते प्रतिभेची मज इवलीशी त्रिज्या
उडून जाते विडंबनातील हसण्याची मौजा
बाई बाटली याहून नाही नवा छंद चाळा
लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा
विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो

अंघोळ आणि भांडीवाली

उशीरा उठल्यावर मला अंघोळीला जायची घाई असते ..

आणि

न्हाणीघरात नेमकी तेव्हा भांडी

घासणारी बाई असते ...............

पार्श्व अमुचे..

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल प्रश्न ऐसे..

बायकोने लाटणे जे फेकले
पार्श्व अमुचे त्यामुळे हे शेकले!

"तारखा ह्या सांग चुकल्या रे कशा?"
का कधी माझे सखे तू ऐकले?

हा जरा नाजूक होता मामला
आणि मी चुपचाप गुडघे टेकले

लाजणे पाहून हे, कळले मला
ओसरी वर झोपणे मी येकले

तू असे गातोस मेल्या "केशवा"
लोक म्हणती कोण गर्दभ रेकले!!

-------------------केशवसुमार६९

'दोहे'-२

'दोहे' लिहिण्याचा हा माझा दुसराच प्रयत्न.
आमची प्रेरणा पुन्हा एकदा.. अजब यांचे 'दोहे'

१.
माझ्याइतका दमदार दुसरा कुणी नसे
लोकांचे प्रतिसाद मज यावे सांग कसे?...

२.
लिहिले आहे आजतो दर्जेदार मी फार
वाचत नाही कोणीच ते मी काय करणार...

३.
एकटेपणी मला प्यायला आवडते खास
पील्यावर पण माझ्या येतो तोंडाला वास!...

४.
लिहिले आहे वेगळे, 'विशेष' "केश्या" आज
हे कोण ते ध्यान आला, सगळ्यांना अंदाज...

'पोहे'

मराठीत कुणी 'दोह्यांच विडंबन' लिहिल्याचे ऐकीवात वा वाचनात नाही... 'दोह्यांच विडंबन' लिहिण्याचा हा माझाही पहिलाच प्रयत्न. आमची प्रेरणा अजब यांचे 'दोहे'

'पोहे'

१.
माझ्याइतका जाड हा दुसरा कुणी नसे
जाडीवर उपचार मी घ्यावे सांग कसे?...

२.
चापले आहे आजतो चमचमीतच फार
सोसत नाही मज अता हा वजनाचा भार...

३.
निमूटपणे मी भोगतो तुझेच सारे त्रास
तू नसताना सुद्धा होतो तू असल्याचा भास!...

४.
करते आहे वेगळे, 'विशेष' "केश्या" आज
मी अपला बांधलेला, 'पोह्या'चा अंदाज...

(...मित्रा)

तुझी कशी रे तुमान मित्रा...!
बघून सारे गुमान मित्रा...!

खरेच का भूत आणि तीही
दिसायचे रे समान मित्रा

तसे तिचे पाहताच मजला,
डगमगलेले इमान मित्रा...?

मुलाहिजा ठेव तू जनाचा...
...जरा अता घे दमान मित्रा..

किती रिचवलेस सांग पेले...
...तुझे उडाले विमान मित्रा...!

पडो किडे "केशवा" स मेल्या ..
..करा अपेक्षा किमान मित्रा...

- ई.केशवसुमार, मॅक्लसफिल्ड

या विडंबनाची प्रेरणा 'सुरेशभट.इन' वर

आज साली पण गटारी रात आहे

आमची प्रेरणा मानस यांची सुरेख गझल एक वेडी वेदनेची जात आहे.

गटारी रात....

रोज मी मद्यालयी का जात आहे?
आज साली पण गटारी रात आहे

रंग डोळ्यांचा कसा हा लाल माझ्या,
यात देशीचा जरासा हात आहे

घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
वाटते मज वेगळी ही बात आहे!

काय मी आता करू या बायकोचे
झोपताना लाटणे हातात आहे!

"केशवा"ला काल इतके चोपले की
एक ना तोंडात त्याच्या दात आहे!

-केशवसुमार

(मीतोती- उत्तर)

आमची प्रेरणा अनिल बोकील यांची कविता मीतोती- उत्तर

मी

बघतो

ट..क..म..क!!

तो

एकदम

द..ण..क..ट!!

ती

हसली

कु.. च.. क.. ट!!

-केशवसुमार.

कविवर्यांना आव्हान !!

समस्त कविवर्यांना आव्हान!! येथे दिलेल्या कवितेचा अर्थ शोधा!!

वैधानिक इशारा : हे विडंबन सुमार आहे. जास्त गांभीर्याने घेऊ नये!!

मी...
गीतकार....
त त पप .....म!!

तो..
बघ...
विडंबनकार...
ड्रिं.. डे.. डॉ.. !!!

ती
"केश्या" कोन?
...??...??.. बा..बा..बो!!!!

(केशवसुमार६९)

सोहळा-२

आज चित्त यांचा एका प्रतिसादामुळे आम्हाला मिलिंद फणसें यांची जुनी अप्रतिम गझल सोहळा वाचायला मिळाली. या गझलेने आम्हाला प्रेरणा दिली.

डाव हा आहे तिचा बघ वेगळा
आवळा देऊन मागे कोहळा

प्रेम ठरले एक चर्चा आमचे
आयुधांनी सज्ज ती, मी कोवळा

रोजचे वेणीफणी करणे तिचे
तासभर चाले तिचा हा सोहळा

शोधला बकरा नवा, नवरा नवा
खूप पैसे आणि भोळा-बावळा

मज पटावे हे कसे पण सांग तू
झाड पडले त्यास कारण कावळा!

तू फसावे ह्याचसाठी छेडतो
लावला आहे नवा मी सापळा

हाच कारावास दे आजन्म तू
मारतो डोळा मला हा आंधळा

कोण हा गातोय इतक्या रातरी
आवळा जावा जरा त्याचा गळा

सांगतो आहे तुम्हाला आज मी
वाटतो तितका न "केश्या" सोवळा

(ठसा)

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ठसा

त्या संध्याकाळी मेघ रुपेरी होते
ती घरात मजला आणि एकटी दिसते

खिडकीत दिव्याचा उजेड येऊन गेला
तो तर होता संदेश तिचा आलेला

झाडाची फांदी खिडकीपाशी होती
ती चढून गेलो, प्रिया मिठीत होती

ही वेळ अशी वैरीण साधला दावा
का बाप तिचा पण तेव्हाच तिथे यावा

पायांचे करूनी शस्त्र धुलाई होई
ऐकतो अजून तो पदरव कानी येई...

शांतता कशी? गोंगाट कुठे तो गेला?
त्या पायांचा हा ठसा मात्र उरलेला!

--केशवसुमार
(१० ऑगस्ट २००७,
आषाढ कृ. १२ शके १९२९)

तंतरलेली सायंकाळी

आमची प्रेरणा डॉ‌. संतोष कुलकर्णी यांची अजून एक अप्रतिम गझल मंतरलेल्या सायंकाळी

तंतरलेली सायंकाळी, चालत मी भरभर काहीसा..
श्वास जरा झाले जड होते...घाबरलेला स्वर काहीसा..

मेघ अनावर कोसळताना, वीज कडाडे नभही फाटे...
आणि स्मशानी अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..

कोण बरे हे हसते आहे, कोसळणार्‍या जलबिंदूंसम...
..भास अचानक स्पर्शाचा हा, अन थरकापे कर काहीसा...!

ही तर आहे काळीजादू...वा आहे हा खेळ मनाचा...
...का,मजला मातीमध्ये दिसला अस्थीपंजर काहीसा..

केवळ झाल्या गजराने ह्या जाग मला आलेली पुरती
सावरला "केश्या" काहीसा.. पण चढलेला ज्वर काहीसा...

-ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड

वाटते अप्रूप आता

आमची प्रेरणा डॉ. संतोष कुलकर्णी यांची अप्रतिम गझल आजही अप्रूप वाटे

काय मी आता करावे कवडश्यांचे ...!
- लोक डोकावून बघती भरवश्यांचे...!

लग्न केले मागच्या वर्षीच त्यांनी...
काय पेढे ही मिळाले बारश्यांचे ...?

काय खातो हे कुणाला ज्ञात नाही,
मात्र कौतुक रोज त्यांच्या बाळश्यांचे...!

मोकळा पडला तमाशा...पाहतो मी...
...सूरही विरले अताशा मावश्यांचे...!

पाहुनी थोबाड सुंदर "केशवा"चे!!
..वाटते अप्रूप आता, आरश्यांचे...

- ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार

हिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांच्या गझलेतील काही निवडक शेरांचा मनोगती मानस यांनी केलेला सुंदर भावानुवाद काल वाचला आणि कालच भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या जुन्या सामन्यांच्या चित्रफिती पाहण्याचा योग आला त्यातून सुचलेले हे काव्य..

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार.
विजयाचे अन शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.

जागून सुद्धा,आम्ही पाहिली नित्य फलंदाजी
हे निद्रे, तू आम्हा सोडले, त्याबद्दल आभार.

केल्या नसत्या तुम्ही; ह्या धावा बनल्या असत्या का?
त्या चेंडूंना, तुम्ही बडवले, त्याबद्दल आभार.

तेव्हा तर हे विश्वच तुम्ही जिंकलेले होते,
विश्वकपाला घरी आणले, त्याबद्दल आभार.

जुन्या चेंडूने पण गोलंदाजी बहरून हो गेली,
स्पिन, गुगलीने दुनियेला छळले, त्याबद्दल आभार

विडंबनाची ऊर्मी पुन्हा"केश्या"ला आली!
इथे दिला अनुवाद 'मानस', त्याबद्दल आभार

-केशवसुमार

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
मूळ गझल येथे आहे

मोठ्याने मज का असा बघ जरा बोलावतो सासरा ?

आमची प्रेरणा चित्तयांची अप्रतिम गझल दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
मोठ्याने मज का असा बघ जरा बोलावतो सासरा ?
दारू का इतकी पितो, बरळतो, भंडावतो सासरा?

दाराचा खटका कसा अडकला आहे बघा ना जरा
वाघाच्यासम आज आत फिरतो, ठोठावतो सासरा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी कुणाचाच हा
कोणालाच न सोडतो पण बघा, हा चावतो सासरा

दारूने सगळी भिजून असती ओलावली कापडे !
त्यादर्पासम हा घरात अमुच्या घोंघावतो सासरा

आईना, निरखून काय बघतो आहेस मेल्या असा?
माझे रूप बघून आणि मजला रागावतो सासरा !

वाटावा चकणा असे बघत हा होता मला आज का?
चष्मा जाड असून ही पण कसा,ना लावतो सासरा

दे सोडून विडंबने सुनवतो आहे तुला "केशवा"
माझ्याहून कुणी न वाइट, असे दर्डावतो सासरा

वेळी अवेळी -२

आमची प्रेरणा जयंतरावांची गजल वेळी अवेळी

तू नको घेऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,चालता वेळी अवेळी

हा खुळा नवरा विचारी बायकोला!
'चिंच कैऱ्या' मागता वेळी अवेळी?

योजना आहे तुला छेडावयाची
का अशी मग सभ्यता वेळी अवेळी

मी घरी येऊ कसा तू सांग,सखये
बाप तव हा जागता वेळी अवेळी

येव्हढे ही जाणशी ना "केशवा" तू
येत नाही सांगता वेळी अवेळी

(केशवसुमार६९)

मंगळवार, ४ सप्टेंबर, २००७

भांड

आमची प्रेरणा मृण्मयी यांची सुरेख कविता भांडं

"...चर्चेत भांडावं लागायचंच,
त्यात काय मोठंसं?"
गुळगुळीत, क्लिशे बनलेले प्रतिसाद
बहुतेक क्लिशेंप्रमाणे
- काही प्रमाणात.

नसेलही त्यात काही मोठंसं
पण प्रत्येक वेळी भांडण हवंच
कधी लहानकधी मोठं
कधी कायमचे
चर्चेचे स्वरूप बदलणारे,
चर्चा रंगवणार.

प्रतिसादांची संख्या वाढत जाते
अपरिहार्यपणे
आणि एक दिवशी चर्चेचा मूळ विषय
ओळखू येईनासा होतो
तरी ही हिंमत कर
नवं भांडण करण्याची
...नवी चर्चा घेण्याची...

तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो

आमची प्रेरणा माफी यांची मार्मिक मुक्तक तिच्या वागण्याचा मला त्रास होतो
तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो
तिला जिंकल्याचा खुळा भास होतो
कशी शत्रुता मीच केली स्वतःशी
पती होऊनी मी तिचा दास होतो !

-केशवसुमार

(मुक्ती)

कशा माझ्या अताशा थांबल्या त्या मैफिली साऱ्या
तश्या त्या जायच्या जागा जरा थोड्या जुन्या झाल्या
भरारी घेत काळाची पहा गेली कुपी कोठे
सुखाच्या कल्पना आता पहा नवनव्या आल्या

कसे ते स्कर्ट होते, टॉप होते, पँट ही होत्या
जगाला सर्व समजावे अशा त्या सैलही होत्या
कळावे पण कुणाला चाललेल्या त्या खुळ्या गोष्टी
तश्या त्या वागताना जराश्या स्वैरही होत्या

मुखाला फासलेला लेप रंगाचा झळाळावा
जरासा अत्तराचा मोगऱ्याच्या गंध लाभावा
पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
हळू मग एकएका सांगती आता घरी जावा

दिवास्वप्नातही येतात नंतर त्या मनोहारी
कसा अजून बुडेना सूर्य हा ही आज अंधारी
नभाच्या सांजरंगांचा पिसारा लोपल्या नंतर
बघा येतील आता त्या पुन्हा आनंद बाजारी

कशी कळली तिला रे आज माझी सर्व ही थेरे
तिच्या डोळ्यातल्या ज्वाळा, तिच्या पायातली शक्ती,
लपाया आसरा ना वादळापासून ना थारा
कशी मिळणार रे "केश्या" तिच्या पासून तुज मुक्ती

--केशवसुमार
(३ ऑगस्ट २००७,
आषाढ कृ ५, शके १९२९)

...चोरी घरात झाली!

आमची प्रेरणा पुन्हा एकदा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता ...पोरी वयात आल्या !

चोरी घरात झाली...!

चोरी घरात झाली, झाली घरात चोरी !
खाली करून गेला सगळी बघा तिजोरी !

होत्या समस्त नोटा त्यांनी लुटून नेल्या
माझीच का तिजोरी लुटलीस सांग मेल्या
छाती पिटून घेतो, लाला अता किशोरी....!

दिवसा दिसून आले लालास आज तारे
देहातले निघोनी गेलेत त्राण सारे
अंधार दाटलेला होता तया समोरी !

पैसेच फक्त तुजला होते हवेहवेसे...
लाला जनास केले तू ही नकोनकोसे...
अन्याय खूप केले होतेस तू अघोरी !

भलताच हा बिलंदर दिसतोय चोर मजला
मज वाटले जसे की रॉबिन हूड आला
सोडून खूण गेला अरसा तिथे बिलोरी !

***
थोडे जपून लाला वागायला नको का ?
झोपेतही जरासे जागायला नको का ?
...याच्यामुळेच आली हाती तुझ्या कटोरी !

***
...चोरी घरात झाली... झाली घरात चोरी !

- केशवसुमार

(बदल)

आमची प्रेरणा अजब यांची कविता बदल

दुरून ते घर
बहुतेक तेच असते...

घरात बहुधा
दुसरे कोणी दिसते...

आजू बाजूला
येतो-जातो, बघतो...

"केश्या" घराचा
पत्ता चुकला असतो...

(पोरी वयात आल्या...!)

`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे पाहुणे-सदस्य....या सगळ्यांन तर्फे प्रदिपराव आपलं मनोगतावर स्वागत ..!
........................................................
आपली सुरेख कविता ...पोरी वयात आल्या ! वाचून आम्हाला ही काही ओळी सुचल्या

(पोरी वयात आल्या...!)
पोरी वयात आल्या, आल्या वयात पोरी !
फिरती घरावरूनी गल्लीतले टपोरी!

होत्या कभिन्न काळ्या आता नटून आल्या
रंगात कोणत्या या रंगून आज आल्या
आल्या पहा बसुनी या नाभिके समोरी....!

या चालतात तेव्हा न्याहाळतात सारे
या बोलतात तेव्हा पण तोडतात तारे
आहे जरी तयांची पाटी खुशाल कोरी !

त्यांना सदाच वाटे सारे हवेहवेसे...
यांच्यामुळे कुठेही होई नकोनकोसे...
कंठात प्राण येतो, येताच या समोरी !

बघ हासतोय नुसता ह्याला न लाज थोडी
"केश्या" विडंबनाची रे थोडक्यात गोडी
अवरून घे अता तू प्रतिभा तुझी छिचोरी !

***
तू ही जपून थोडे खरडायला नको का ?
"केश्या" तुला तरी हे समजायला नको का ?
...मिळतो न न्याय येथे पसरून नको कटोरी !
***

...पोरी वयात आल्या...आल्या वयात पोरी !

-केशवसुमार

भय मल्हार

काही दिवसांपूर्वी कुणीतरी 'मला आवडलेले मनोगती लिखाण' अस एक टूमण काढलं होते..ते अजून ही आमच्या डोक्यात (?) घोळत होते. आपल्याला आवडलेले लेख ठरवणे म्हणजे जुने लेख/ कविता शोधून वाचन आलं. ते करताना अनुताईची जागतिक भूत महासभा(जा.भू.म.) पुन्हा वाचली. जा.भू.म. च भूत अजून उतरलं नव्हत आणि मृण्मयी यांची सुरेख कविता रुद्र मल्हार आमच्या वाचनात आली आणि आमच्या डोक्यात(?) नेहमी प्रमाणे गोंधळ झाला.

पसरलेला कभिन्न काळोख भोवताली
तशास अठवे पिशाचलेल्या कथा मलाही
उरात माझ्या बघा लागले धडधडायला
कडाडणाऱ्या विजे मुळे मी हदरून जाई
करू लागली भुते माझ्या भवति तांडव
समीप मुंज्या उभारल्याची उगाच ग्वाही
सभोवताली ठसेच उलट्या पावलांचे
करीत आला खवीस माझ्यावरी चढाई
कवेत घेई हळूच मजला अधीर हाडळ
बघून हसली सुरात वरच्या ती सटवाई
फिरून येतो विचार मज या सर्व भुतांचा
खिशात माझ्या 'ह.चालिसा' उगाच नाही

मंगळवार, ३१ जुलै, २००७

मुलांना जर असे

आमची प्रेरणा प्रमोद बजेकरांची सुरेख गझल फुलांना जर असे

मुलांना जर असे आहेच फेटाळायचे
कशाला रंग लावुन तोंड मग सजवायचे

कशासाठी पसारा मांडतो तू एवढा?
तुला आहेच जर नंतर सख्या अवरायचे

पुन्हा भिजलोच मी , भिजलो जसा मी काल ही
विसरतो रोज मी छत्री कशी आणायचे

विचारे सारखी येऊन झाले का तुझे
किती वेळा तिला नाही असे सांगायचे

नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
उगा लोकास अन भलतेच बघ वाटायचे

'पुन्हा भेटू 'जरी म्हटले तिने आहे मला
मला सांगा तिला आता कसे टाळायचे

सदा चाले तुझे माझे बघा माझे बघा
जरा थोबाड तू आरशास ही दावायचे

तुला बघताच "केश्या" लोक बोलू लागले
कधी मेल्या तुझे लिहिणे अता थांबायचे

केशवसुमार

चूक

आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम कविता भूक

चूक

एक सुंदरी सलूनमधल्या खुर्चीवरती भल्या दुपारी
येउन बसली अगदी अलगद, सोडून केस तिचे सोनेरी

मिटून चष्मा काळा बसली पायावरती पाय चढवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी

नजर झुकवुनी पदर सारखा करून झाला मग हाताने
जणू पंखाची पिसे सारखी करावी कोण्या पक्ष्याने

केस कापले अनेकदा पण समाधान काही लाभेना
आरशामध्ये बघून झाले पण जीवाला चैन पडेना

म्हणतील सख्या किती कापले केस अता मी कैसे जावे -
काय करावे आता याचे बाईंना कैसे उमजावे?

तोच चलाखी करून न्हावी चूक लपवी लावे गंगावन
रूप नवे पाहून स्वतःचे अन सुंदरी झाली पावन

अधीरतेने हर्षभराने स्पर्धेला अवतरली यक्षिणी
आणि तिच्या केसात अचानक चुकून घुसली एक पक्षिणी

महिला मंडळा मधली जेव्हा संपली स्पर्धा नटण्याची
चिमणीची चिंता कायमची होती मिटलेली घरट्याची

-केशवसुमार

वाकला

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल दाखला

हा वाकला तो धावला
"जो वाकला, तो संपला"

उठणे कसे, बसणे कसे
नाजूक आहे मामला

पाहून हालत अन मला
तो वैद्य सुद्धा हासला!

खोडी न त्याची काढली
मग तो मला का चावला?

माझ्यात होते काय जे
त्याने चुना मज लावला

सोडे न हा कोणास ही
इतका कसा हा माजला

"केश्या"तुझा कलगीतुरा
भलताच होता गाजला

(केशवसुमार६९)

(गंध)

अदितीताईंची सुरेख कविता गंध वाचून आम्हाला आमच्या उमेदीच्या काळात पिंपरीला नोकरी करत होतो ते दिवस आठवले. तेव्हा हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक ( एचे) कारखान्यातून रोज येणाऱ्या गंधाची आठवण झाली..

काल रात्री झोप जराशी कमीच झाली
सकाळ झाली तरी डोळ्यातून ती ओघळली
अपुऱ्या झोपेने थकलेले मन पेंगत होते
अजून थोडे झोप मला ते सांगत होते
गजर वाजला तरी पांघरूण ओढून घ्यावे
मनात आपल्या नोकरीलाही शाप द्यावे
पुन्हा एकदा या गजराची घंटा झाली
निरीच्छेने उठून आवरा आवरी आली
दार उघडले अजून पेपर नाही आला
दिसू लागला अन मज पुढचा घोटाळा
मार्ग मोकळा आज कसा होणार कळेना
उपाय दुसरा काय करवा काही सुचेना
मरगळ सगळी विसरून पण आवरणे आले
क्षणात एका तो-तो फो-तो उरकून झाले
सात पाचची धावत मग मी लोकल धरली
सवयीने मग उभ्या उभ्याने झोप लागली
गंधाने मज त्या नेहमीच्या जाग आली
'एचे' गेले म्हणजे "केश्या" पिंपरी आली!

--केशवसुमार
(२५ जुलै २००७,
आषाढ शु. १०, शके १९२९)

केव्हा झाली पहाट..

आमची प्रेरणा मंजुश्री गोखले यांची सुरेख चित्रमय कविता हिरवी पहाट..

दिवस सरल्या वरती धरलेली मी गुत्याची वाट
पिण्याच्या नादात न कळले केव्हा झाली पहाट..
गुत्याच्या निळ्या तांबड्या
दिव्यांत लागली समाधी
उषेची चाहूल लागली
थोडी उतरण्या आधी
काही केल्या आठवेना मज माझ्या घरची वाट
पिण्याच्या नादात ...
लटपटणारे तनू सावरत
रस्त्यातच केली गाई
मुडद्यासम निजलेल्या
कसली उठण्याची घाई
ताना घेऊन निघून गेले रविराजाचे भाट
पिण्याच्या नादात ...
दुपारच्या उन्हामधे
तापू लागे अंबर
जागा होऊन उठू पाहता
ठणकू लागे कंबर
बहुतेक रात्री पडलो तेव्हा सणकलेली पाठ
पिण्याच्या नादात ....

-केशवसुमार.

रविवार, २२ जुलै, २००७

विडंबन

विडंबन आमची
कोण वाचतो
आनंदाने
कोण नाचतो...

शब्द कुणाला
जेव्हा सलती
विडंबने आमची
तेव्हा गळती...

कोणाला हे
विडंबन छळते
न सांगताही
सर्वांना कळते...

शुक्रवार, २० जुलै, २००७

आत्मसात-२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुरेख गझल आत्मसात

'हो-हो' खुले म्हणालो, 'ना-ना' मनात केले
आहे गुलाम मजला माझ्या घरात केले!

फसलो हसून आता येथे तिच्यापुढे मी
मी काम नोकराचे मग आत्मसात केले!

का लाज वाटते ना आता मला कशाची?
नाते तिचेनि माझे सर्वांस ज्ञात केले...!

सांगू कसे कुणाला चिंगूस मी किती ते
फुकटात केशकर्तन घरच्याघरात केले

छळलेस "केशवा" तू दिनरात ज्या कवींना
त्यांनीच काल शिमगे एकसुरात केले

- केशवसुमार

गुरुवार, १९ जुलै, २००७

साळसूद-२

आमची प्रेरणा पुलस्तिंची गझल साळसूद

घट्ट बांधली तरी
काळजी जरा बरी

पाव रोजचा इथे
मज मिळे न भाकरी!

ढीग फार साचला
धूत जा कधीतरी

चावते किती तुझ्या
आत खाटल्यावरी

आलबेल का इथे?
एकटीच मी घरी!

साळसूद का असा?
चाललोय सासरी!

प्रश्न फार हे तुझे -
गप्प बस जरा तरी!

द्यायला हवी तुला,
"केशवा" जरा धुरी

(’उत्तर’)

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता 'उत्तर'

मिटून डोळे
हिंदी गाणे
मनात धर...
अनुवाद अन
त्याचा नंतर
तयार कर...

ठाउक आहे
अर्थ लावणे
सोपे नाही...
अनुवादात छंद
निभावणे
सोपे नाही...

प्रतिसादाला
तावातावाने तू
दे उत्तर...
चुकले असले
तरी कशाला
कबूल कर...

केशवा रे!

आमची प्रेरणा अदितीताईनी केलेला 'उठाये जा उनके सितम, या हिंदी गाण्याचा सुरेख भावानुवाद मन्मना रे!
संपले मद्य, कसे हे, तू पहावे, "केशवा" रे
द्राक्ष-आसव पीत आता तू बसावे "केशवा" रे ॥

सवय थोडीशी जुनी आहे अशी तुजला, तरी पण
सोडण्या प्रयत्न, थोडे तू करावे, "केशवा" रे ॥

उतरली आहे, तरी ही, कालची अजून गुंगी
तू मला आधार होता, तू पडावे? "केशवा" रे ॥

त्रास ते देतील सारे, जगही छळेल, तुला जरी
पण विडंबन नित्य नेमाने पडावे, "केशवा" रे ॥

--केशवसुमार
(१७ जुलै २००७)
आषाढ शुद्ध तृतीया, शके १९२९
( उठाये जा उनके सितम या हिंदी गाण्याचा अनुवादाचे विडंबन)

(...दिवेलागणीच्या वेळी ! )

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची सुरेख गझल ...दिवेलागणीच्या वेळी !

(...दिवेलागणीच्या वेळी ! )

नको तेच मजला स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !
चला ग्लास माझा भरते...दिवेलागणीच्या वेळी !

हळू खा जरा तू चकणा...भरे पोट बसल्या जागी...
तशी ही कुठेही चरते...दिवेलागणीच्या वेळी ?

- चढू लागली बघ मजला पुरे बास आता झाले...
पुन्हा कोण प्याला भरते...दिवेलागणीच्या वेळी !

मला एकट्याला बघुनी म्हणे 'चांदणी' एकाकी...
चला आज ह्याला धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !

मला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...
नको ते कशाला स्मरते...दिवेलागणीच्या वेळी ! !

कुणी येत नाही...येथे तरीही कळेना वेडी - -
कशाला अशी घाबरते...दिवेलागणीच्या वेळी ?

सुचेनाच काही अगदी...सुचेनाच कोणालाही...
बसावे न कोठे ठरते...दिवेलागणीच्या वेळी !

अशा या रिकाम्या, आता कुठे मी खिशाने जाऊ ?
उधारी पुन्हा मी करते...दिवेलागणीच्या वेळी !

कुणी दूर वरती करता जरा गारव्याच्या गप्पा...
तिचे नाक येथे झरते...दिवेलागणीच्या वेळी !

तिची आर्तता, कातरता कळावी कुणाला सांगा ? ...
म्हशीसारखी हंबरते...दिवेलागणीच्या वेळी !

लिहू आज म्हणले थेडे, जरा वाचता या ओळी...
विडंबन मला हे स्फुरते...दिवेलागणीच्या वेळी !

- केशवसुमार

शुक्रवार, १३ जुलै, २००७

आज मज कुठे...

आमची प्रेरणा प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी यांची सुरेख गझल फार मी कुठे...
आज मज कुठे...

आज मज कुठे जावत नाही
काय बातमी दावत नाही

दोष आरशाला मी देतो...!
आरशात ज्या मावत नाही

भाग मागचा इतका सुजला
बोट त्यांस ही लावत नाही

ओरबाडते तीक्ष्ण नखाने
जवळ मज तिच्या जावत नाही

श्वान लागले मागे माझ्या...!
मी उगाच हा धावत नाही..!

घाबरू नको ह्या कुत्र्याला
फक्त भुंकते... चावत नाही...

काय मी करू ह्या "केश्या"
लालाज काढतो... ठेवत नाही...

-ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड.

कळेना -२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल कळेना

मुलांना कसे थांबवावे कळेना
नव्याने कसे हे घडावे कळेना

जमाना असा, सर्व चालून जाते
तिने का असे आखडावे - कळेना

किती माहिती ही, किती तज्ञ सल्ले
कसे नेमके मी करावे - कळेना

तिला नेमका आज उत्साह आला!
कसे हे पुन्हा मी गळावे - कळेना

बिचारी बघा चिंब ही पार झाली
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"

पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गिरगटावे - कळेना

जरा आज चावट असे सुचत जाता
कुठे "केशवा"ला लपावे - कळेना!

कळप हुंदडे तर्र मुलांचा

आमची प्रेरणा विसुनानांची सुरेख कविता कळप हुंदडे पुष्ट ढगांचा

कळप हुंदडे तर्र मुलांचा
मत्त हत्तीसम पिऊन ठर्रा
सुरू घोष अर्वाच्यं शिव्यांचा
पळत सुटे सैरा वैरा

रस्त्यावर कल्लोळ माजवी
होतो नाचत सोडून लाज
धुंद होऊनी वारूणी प्यावी
असा आमचा रोज रिवाज

कुंद धुराची काळी चादर
असे आमच्या अवती भवती
धुंद नशा ती पिऊन नंतर
स्वप्ने मनी भलती सलती

कसली आली अवखळ गाणी
कसला आला शुभ्र प्रपात
ढोस आणखी लाल वारुणी
या मदिरेने झिंगून जात

***
उभा आठवत मनी बालपण
वर्षे बघ झर्रकन गेली
अता राहिली फक्त आठवण
आणि पापणी ही ओली..

अता राहिली फक्त आठवण
आणि पापणी ही ओली..

रोटी, कपडा... (विडंबन)

अमची प्रेरणा अजब यांची गझल रोटी, कपडा...

रोटी, कपडा, मकान दे
शेजाऱ्याच्या समान दे...

मला जरा तू दे भरपूर
शेजाऱ्याला किमान दे...

पँट फाटली पुन्हा अता
बायको, नवी तुमान दे...

तिला ढकलण्यासाठी मज
एक उंचशी चटान दे...

पाखरू नवे बघायला
जरा खुले आसमान दे...

साफसफाई करायला
वेळ जरासा निदान दे!...

नकोच पोकळ आश्वासन
पैसे आता गुमान दे...

(नको हक़ीकत सांगू तू
होतीस कोठे बयान दे...)

विडंबने लिहिण्या मज
लिखाण ताजे-तवान दे...

कळावे..

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता पत्र

खूप दिसांनी
तिला गेलेलो
मी भेटाया...

एक क्षण ही
नाही जाऊ दिला
मी वाया...

जरा कुठे मी
ओढून तिला
मिठीत घ्यावे...

आवाज नव्हता
तरी बापाला
तिच्या 'कळावे'...

भयंकर -२

आमची प्रेरणा प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी यांची अप्रतिम गझल भयंकर

मिसळी वर मज राग भयंकर...!
सऱ्या दिवशी आग भयंकर...!

तव स्पर्शाने घाबरले मी,
मला वाटला नाग भयंकर...!

काही केल्या लपला नाही..
सदऱ्यावरचा डाग भयंकर...!

बाप तिचा आलाच अचानक,...
नंतरचा तो भाग भयंकर...!

दूर वरुनी दरवळ आला,
सोन खताची बाग भयंकर...!

"केश्या"च्या ह्या विडंबनांवर..,
सर्व कवींना राग भयंकर...!

ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड.

वाजले किती ते सांग...

आमची प्रेरणा बैरागी यांची कविता वाजला किती पाऊस...

वाजले किती ते१ सांग
न आली जाग
जरा डोळ्यांना

नेमका विसरलो बोळ
कसा हा घोळ
झाला रस्त्यात

दारात भेटला२ बाप
मारली थाप
मी नेहमीची

चोरून दिले मी फूल
तरी चाहूल
तिच्या बापा ये

बाहेरी संततधार
कशी जाणार
घरी मी माझ्या

विझू दे तेवता दिवा
अरे "केशवा"
जरासे थांब

१. 'बारा की' आधीच्या आवृत्तीत.
२. 'उभा हा' आधीच्या आवृत्ती.

... कसे? (विडंबन)

आमची प्रेरणा अजब यांची ... कसे? (गझल)

पुन: पुन: तुला इशारे करणार कसे?
शब्दावाचून मला मग कळणार कसे?...

झोपेतून जागा झालो दचकून मी
स्वप्नी सुद्धा तुलाच बघणार कसे?...

लपवून फिरतो तोंड आता मी माझे
विचार करतो हे लफडे मिटणार कसे?...

सांगत होते केस तरी तू विस्कटले
बाप यायच्या आत आवरणार कसे?...

श्वास, स्पंदने झाली माझी बंद अता
मगर मिठीतून तुझ्या पण सुटणार कसे?...

सडक्या डोकी "केश्या"ला दुसरे काही
'अजब' विडंबनाखेरीज सुचणार कसे?...

.. खरे सांगतो!

.. खरे सांगतो !

कसे भेटले, तुलसी आणि मिहीर विरानी- खरे सांगतो
खूप भावली, महिलांना ही सोप-कहाणी- खरे सांगतो

कुठून आला, बाप तिचा हा, कसे मला ते, दिसले नाही;
मारून खाऊनी , आले माझ्या नयनी पाणी- खरे सांगतो

हवा तुझ्या येण्याची खबर,आणता; गुदमरलो, मी ही
कधी तरी तू, धूत जा या जीन तुमानी- खरे सांगतो

समय असा की! बोललीस तू, ऐकले परि, कळले नाही;
हतात होती, गोड गुलाबी मदिरा राणी- खरे सांगतो

आज म्हणे, येणार घरी ती! राहण्यास अन, डास किती हे,
घरात माझ्या, आणि नसावी, मच्छरदाणी?-खरे सांगतो

पुलाखालच्या, वस्तीमध्ये, रोज कुणा ती भेटत होती?
"लफड्याची या, जगास आता दिसे निशाणी-खरे सांगतो"

-केशवसुमार

ह्यातील सर्व शेर हे मनोगती कवी मानस ह्यांच्या ..पुन्हा सांग ना! गज़लेतील शेरांचा विडंबानुवाद आहे.

अवघड नसते...(विडंबन)

आमची प्रेरणा अजबयांची सुरेख गझल अवघड नसते...

तसे पाहिले तर हे नटणे अवघड नसते
पोट लपवूनी सुडौल दिसणे अवघड नसते...

नुसते खुणवू नकोस मजला नजरेमधुनी
(आडोशाला मला भेटणे अवघड नसते )

येता जाताना मी रोजच अनुभवतो हे
बेंबी खाली पँट घालणे अवघड नसते

वेदनेतुनी जन्म घेतसे 'अजब' गजल, पण-
सुमार विडंबन त्यांचे करणे अवघड नसते...

विड्या फुंकणे कधीच नाही सुटले "केश्या"
कोण म्हणाले 'सवय सोडणे अवघड नसते'?...

पोचुनी इतक्या जवळ

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुरेख गझल पोचुनी दारी तुझ्या

पोचुनी इतक्या जवळ ना करत जायचे
मी असे येथे कितीदा परत जायचे?

पाहुनी 'चित्रे' अनोखी ही सभोवती
'आह्' केवळ रोज नुसती भरत जायचे...

किर्र काळोखात बुडल्या दशदिशा,
तरीमी तिच्या हातास नुसते धरत जायचे?

शुष्क पर्णासारखा दिसतोय काय मी?
आणखी सांगा किती मी चरत जायचे?

रोज अड्याच्या दिशेने वाट चालतो
हसत-खेळत रोज थोडे हरत जायचे

लोक बोंबलती जरी वाचून हे तुझे
("केशवा" तू ते कशाला स्मरत जायचे)

- केशवसुमार, मॅकल्सफिल्ड.

शिष्टाचार

आमची प्रेरणा सोनाली जोशी यांची गझल निराधार

लोकसंख्या का फार येथे?
लोक नुसते बेकार येथे !

प्रश्न कोठे? रस्त्या कडेने?
रोज हा शिष्टाचार येथे

सावरावे कैसे कुणा मी?
पेग घेऊनी चार येथे

पी चहा तू कोराच आता..
म्हैस आहे गर्भार येथे

लोळतो मी वेळी अवेळी
काय दुसरे करणार येथे?

छापले का नाही कधीही?
काव्य परते साभार येथे

कर पुरे हे "केश्या" विडंबन
लोक झाले बेजार येथे

स्वीकारले-२

आमची प्रेरणा केदार पाटणकरांची सुरेख गझल स्वीकारले

मी कधी पैशास ना नाकारले
सर्व मार्गांनी तया स्वीकारले

मैत्रिणीवर जीव होता टाकला
पण तिनेही मला झिडकारले

लोक आता कुंचल्याने मारती
(नग्न चित्रंना अधी मी साकारले)

खीर खाता वाढली साखर अशी
रोज आता जेवणाला कारले

"केशवा"च्या निर्लज्य या लेखना
आज सर्वांनी पुन्हा धिक्कारले

नेहमीच का...(विडंबन)

आमची प्रेरणा अजब यांची नेहमीच का...(गझल)

नेहमीच का हे ना घडते?
नेहमीच का ती ना झुकते?...

कापड असते क्षुल्लक अगदी
झा'काया' ते कोठे पुरते!...

तू आल्यावर मजला वाटे
ब्याद आता ही कधी टळते...

कसा अचानक पाउस येतो..
तुमान सदरा सगळे भिजते!...

विसरू म्हटले जरी कितीदा
पण ती माझी पत्नी पडते...

ह्या मेल्या मुडद्या "केश्या"ला
दळभद्री कविता बघ सुचते...

(हे खरे ना?)

आमची प्रेरणा विसुनाना यांची गझल हे खरे ना?

चाखली आहेस तूही - हे खरे ना?
टली होती बरीही - हे खरे ना?

पाहुनी अंधार लागे वाट माझी
फाटली होती तुझीही - हे खरे ना?

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
जायची घाई तुलाही - हे खरे ना?

वाळली का आज नाही पँट माझी
पाडली पाण्यात तू ही - हे खरे ना?

हासलो जेव्हा असा घोड्याप्रमाणे
वाटलो वेडा तुलाही - हे खरे ना?

वाचुनी मुक्ताफळे ही"केशवा"ची
बोलुनी उपयोग नाही - हे खरे ना?

बोलण्याने बाप बघ जागेल आता

आमची प्रेरणा चित्तरंजन यांची सुरेख गझल बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बाप बघ जागेल आता
ललो नाही तरी चालेल आता

आज आहे पूर्ण बंदोबस्त केला,
मी कसा बघतोच तो धावेल आता

हातघाई येवढी नाही बरी पण,
संयमाने काय मज साधेल आता

या नदीला पार कर, थोडे पुढे जा
ओळखीचा बार बघ लागेल आता

दुःखही याहून भीषण दुःख नाही-
ती म्हणे राखी मला बांधेल आता

"केशवा"ची खरडण्याची वेळ झाली
वाट कवितेची कुण्या लावेल आता!

कसा करावा या कवितेचा मी कचरा

आमची प्रेरणा अनंत ढवळे यांचि अप्रतिम गझल कसा करावा या भयगंडाचा निचरा

कसा करावा या कवितेचा मी कचरा
मी जालावरती होतो शोधित बकरा

या वेळी पाहु ,कोणता नंबर येतो
आज लावुनी बसलो मटक्यावर नजरा

प्रलोभनांच्या अहमहिकेला अंतच ना...
मी किती जणीच्या घरच्या मारू चकरा

ही मुठा आपली झालीय गटार जशी
येता जाता जरा आपले नाक धराही

कवटी कसली ही तर कचरा कुंडी
अन विडंबने तव सर्व "केशवा" कचरा........

जीव या गझलेत माझ्या

अनुताईंचा गाथा माझ्या गझलेची हा लेख वाचला आणि गझला न लिहिता आयत्या जमिनीवर विडंबनाची पिके घ्यायला सुरवात आम्ही का सुरवात केली ह्याची आठवण झाली..

जीव या गझलेत माझ्या फारसा नाही
'अनु'भव मला लिहिण्याचा फारसा नाही

का मला हे येत नव्हते गझल लिहिणे
(पाडण्याचा त्रास हा पण फारसा नाही)

गझल ही तर पाच शेरांची असे मोळी
एकमेकांशी संबंध ज्यांचा फारसा नाही

मातरा झाल्या किती ते मोजले कोणी
मोजुनी उपयोग ही पण फारसा नाही

"केशवा" च्या लेखनाची काळजी नको
कोण ही त्याला विचारत फारसा नाही

केशवसुमार...

रंग थोबाडास माझ्या

आमची प्रेरणा अनुताईंची गझल जीव माझा अंतरी या

रंग थोबाडास माझ्या फारसा नाही?
नेमका न्याहाळला मी आरसा नाही

सोडले नाही तिने केवळ धनासाठी
(आज कळले या घरा का वारसा नाही)

या विदेशी बाटलीने काय मज व्हावे?
कैफ ठऱ्याची तझ्या त्या सुधारसा नाही

पेग हे झाले किती मी मोजले नाही
एक ही गुत्यात आता आधारसा नाही

"केशवा"चे बरळणे हे रोजचे आहे
बोलुनी उपयोग त्याला फारसा नाही

मोक्ष-२

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची कविता मोक्ष

तव शब्दांनी जळते प्रतिभा
प्रश्न मला बघ हे छळणारे
कशी कविता आता लिहू
नको विडंबन मग डसणारे

मला हवीशी गोड दाद ही
मोक्ष मला दे ह्या टीकेतून
स्तुती कौतुके नुसती वाहवा
आज वाहू दे प्रतिसादातून...

केशवसुमार.

जरी तिला मी

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख गझल जरी तुला मी...

जरी तिला मी टेहाळूही शकलो नाही
काल स्वतःला सांभाळूही शकलो नाही...

तिला पाहता, मला न जमले, सर्व विसरणे
संयम हा पण मी पाळूही शकलो नाही...

तिच्याचसोबत, कुणा न कळता भेटत होतो
नंतर घडले ते टाळूही शकलो नाही...

तिला भेटण्यासाठी गेलो तिच्या अंगणी
तिच्या बापास हेटाळूही शकलो नाही...

तिला चुकून 'नाही' म्हटले इतके झाले
गाल स्वतःचे कुरवाळूही शकलो नाही...

लग्ना आधी सगळे केले असा न दावा
कधी तिला मी कवटाळूही शकलो नाही...

किती "केशवा" चावट मजकुर हा शेवटचा
सुचलेच असे ते टाळूही शकलो नाही...

अजून-२

आमची प्रेरणा विसुनाना यांची कविता अजून

अजून कळेना कशास होतो घुसलो तव कक्षी
अजून आठवे गालावरची तुझ्या हाताची नक्षी

अजून स्वप्नामध्ये दिसती तुझ्या पायीच्या बाटा
अजून सुद्धा टाळून जातो तुझ्या घराच्या वाटा

अजून जेव्हा वार्‍यावरती तुझाच दरवळ येतो
अजून घराची दारे खिडक्या मी लावून घेतो

अजून लागतो अधार मजला रोज इथे कुबड्यांचा
अजून घेतो आहे मी बघ शोध इथे दातांचा

अर्थ नाही

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अर्थवाही गझल

तिचे श्वास देतात ग्वाही
तिने चापले लसुणकाही

सुरा घेउनी आज आली
तिला बोलणे शक्य नाही

पहा लाज सोडून बिलगे
तिला येव्हढा धीर नाही?

कशा थोपवू मी स्वत:ला ?
(हवे हेच होते मला ही)

तुझी "केशवा" व्यंगकाव्ये
तुझ्या लेखना अर्थ नाही

-केशवसुमार

निळा((कन्)फुजन)

सध्या सगळीकडे बोकाळलेला 'फ्यूजन' किडा काल अम्हाला चावला आणि त्याचाच परिणाम म्हणजे कुमार जावडेकरांच्या हजलेचे आम्ही केलेले विडंबन आणि 'रंग माझा तुला' च्या चालीच झालेलं हे (कन्)फुजन.

ठोकला येव्हढा काल त्यांनी मला
आणि झालो बघा आज काळानिळा

दे मला तू सखे कोंबडी एकदा
रोज खातोच ना भात मी हा शिळा

लाजुनी लाल ती काल झाली अशी
मी म्हणालो तिला पाहू दे त्या तिळा...

भोपळ्या सारखा होत गेलो इथे
बायको सांगते राव थोडे गिळा

वाचता काव्य हे "केशवा"चे असे
बोलले ते कवी दाब त्याचा गळा

(नाते)

आमची ही प्रेरणा - प्रदीप कुलकर्णी यांची गझल नाते.

डोके बिघडल्यासारखे !
मोडून पडल्यासारखे !

लोकापुढे हसू नको
कवळी पडल्यासारखे !

असना मधे आता मला -
`झाले जखडल्यासारखे !!`

गाऊ नको गाणे असे -
नरडे खरडल्यासारखे !

लाजणे अन माझे तुझे
चोरी पकडल्यासारखे !

का वाटले पडल्यावारी
पाय मोडल्यासारखे !

संपले यौवन तिचे...
वाया दवडल्यासारखे !

बटाट्यागत येथे मला
वाटे उकडल्यासारखे !

दिलास तू होकार हा...
नाके मुरडल्यासारखे !

टक्कल तुला आहे जरा
केसात दडल्यासारखे !

वागणे वरती तुझे...
काही न घडल्यासारखे !

घेतलेस माझे नाव तू
बघ रोज रडल्यासारखे !

बाप तुझा पण बोलतो..
माझेच अडल्यासारखे !

कपडे तुझे अन ओठही...
भलतेच घडल्यासारखे!

माझे-तिचे नाते जरा
नेहमी नडल्यासारखे !

हे विडंबन "केशवा"चे
बुंदी पाडल्यासारखे!!

शृंगार

आमची प्रेरणा मंजुश्री यांची सुरेख कविता सुवर्ण शृंगार

आंब्याच्या झाडावरती पहिल्यांदा चढले होते
डहाळी डहाळी वरती अंबे लगडले होते

काढून दात तो मजल फिदीफिदी हसला होता
धरणीवर पडले तेव्हा अंगअंग सडकले होते

पडण्याचे देणे इतके, आला हा हात गळ्यात
वौद्याचे कडू काढे मग अमृतागत प्यायले होते

जवळपास नव्हतं कोणी , केलेला म्हणून धीर
पडल्यावर ओरडले,अन सगळ्याना कळले होते

आता कसला शृंगार अरसाही बघवत नाही
फुकटच्या आंब्यांन पायी तोबाड सुजले होते

-केशवसुमार.

वारांगना

आमची प्रेरणा मंजुश्री यांची अतिशय सुंदर कविता सुवासिनी

साऱ्या रातीत रातीत
खूप घोटलं घोटलं
धुलवडीच्या भांगेन
डोक चढलं चढलं

हिरव्या अफूचा रंग
पेल्यापेल्या उतरे
भोळ्या शंकराच लेणं
डोळ्याडोळ्यात पाझरे

जाईजूईचा गजरा
हाती बांधला बांधला
माडीवरती मुजरा
होता रंगला रंगला

अवखळ हा पदर
खांद्यावरती राहे ना
छुमछुमते पैंजण
पायावरती थांबे ना

सोळा शृंगारात अशी
काल सरली ग रात
वारांगनेच त्या रुप
पुन्हा खुणावत होत .

- केशवसुमार.

(गझल)

आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख गझल

समजून घ्या जरा तो, भार्यालयात होता
त्याचा पुरा भरवसा परमेश्वरात होता

आता बघा कसा तो आहे सरावलेला
पहिल्याच फक्त वेळी तो संभ्रमात होता

हे पाप वाढलेले त्याच्याच तर कृपेने
पतनात फक्त माझ्या त्याचाच हात होता

तो वाजवीत टाळ्या रस्ता मधून फिरतो
नारीत ना पुरा तो , ना ही नरात होता

दररोज प्रश्न पडतो मी रोज का नहावे
माझा सवत-सुभ्या त्या नाहणीघरात होता

साशंक वाटला मज आवेग प्रियसीचा
भलताच काय हेतू आलिंगनात आहे?

प्रेमास अंत असतो, इतिहास साक्ष आहे
अंकुर समरबिजाचा शुभमंगलात होता

दिसतात ओळखीची येथे अनेक पोरे
होता कोणी मवाली, कोणी मनात होता

पाहून मेनकेला ज्याचा न तोल सुटला
त्याच्या तपश्चरेचा शेवट वरात होता

चरणी, प्रभो, तुझ्या तो आला थकून आहे
शोधीत माणसांना जो गर्दभात होता

अद्दल "केशवा"ला जन्मात या घडू दे
धावा कवीजनांचा एका सुरात होता

निळा(विडंबन)

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची हझल टिळा(हझल)

ठोकुनी केला मला बघ खिळखिळा
सुजवली माझी छबी, केला निळा!

कोंबडी पानी कधी येईल का?
रोज मजला भात हा मिळतो शिळा...

लाजली अन लाल झाली काल ती!
मी म्हणालो दाखव मला त्या तिळा...

भोपळ्यागत होत गेलो मी इथे
बायको सांगे अता थोडे गिळा!

"केशवा"ला काम का नसते कधी?
लावतो प्रत्येक कवितेला विळा

- केशवसुमार, माकल्सफिल्ड

(मुलाहिजा)

आमची प्रेरणा चित्तरंजन यांची सुरेख गझल मुलाहिजा

उगाच काय मी करी तिचा मुलाहिजा
खडूस बाप हा तिचा करेना ना इजा!

जमायचे मला न हातचेच राखणे
(चुकायच्या उगीच का कठीण बेरजा!)

तिला किती जपून मी मिठीत घ्यायचो!
तरी कशा नको तिथेच व्हायच्या इजा!

घरात स्वागतास आज तात का उभे
कसा चुकेल मार आज व्हायची सजा!

किती स्वतःस फासशील अत्तरे इथे?
सुगंध बोकडा तुझा न व्हायचा वजा!

अनोळखीच वाटणार बायको तुला
कधी चुकून "केशवा" घरात जात जा!

चूक

आमची प्रेरणा जयंतरावांची चूक

माझीच चूक होती
ती धरून डूक होती

माझी इथे पिटाई
थोडीच मूक होती?

सेवेत प्रियसीच्या
फक्त दमणूक होती

आवेश बायकोचा
'ही तर चुणूक होती'

ती वाटली कुमारी
(ही फसवणूक होती)

"केशा"स विडंबनाची
भलतीच भूक होती

मृगजळ-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल मृगजळ

प्रत्येक भांडणाने मी धीट होत गेलो
पण बायको पुढे मी माघार घेत गेलो

शोधून काढले मी कपडे नवे तिचे अन
बोहारिणीस झुकते माप देत गेलो

त्याच्यात काय मोठे हे रोजचेच आहे
रामागडी बनूनी पत्नी सवेत गेलो

ताटात वाढलेल्या पाहून ह्या श्रीखंड
वाढेल वजन माझे ह्या वंचनेत गेलो

जा लाडक्या सख्यांनो, शोधा नवीन कोणी
मी आज बायकोच्या आहे गुहेत गेलो

लाडात बायकोला मी कुर्निसात केला
सवतीस भेटण्याला मोठ्या मजेत गेलो

बुडवून मृगजळी या मी आज "केशवा"ला
पुन्हा नव्या कवीचा मी शोध घेत गेलो

-केशवसुमार.

किनारा-२

आमची प्रेरणा ॐकार यांची सुरेख गझल किनारा

हरवून किनाऱ्यावर कपडे, उघड्याने फिरतो आहे
मी घरी कसे पोचावे विचार भिरभिरतो आहे

जे कागद होते तेथे त्याचीच विमाने केली
अन पाणी गेल्यावर तो आता किरकिरतो आहे

आत्ताच झटकली थोडी मी राख विडीची माझ्या
हा धूर पुन्हा छातीच्या पोकळीत विरतो आहे

पत्नीने बोलवले जेवाया भीशीस साऱ्या
मी घरात बसल्याबसल्या हे कांदे चिरतो आहे

"केश्या"च्या उथळ लिहिण्याचा लवकर शेवट शोधा
तो पुन्हा नव्या जोमाने जालावर शिरतो आहे.

-केशवसुमार

रसायन-२

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांचे रसायन

उघडी असोत दारे सगळीच दालनाची
आलीच वेळ जर का मजवर पलायनाची

जमते कुणाकुणाला, चुकते कुणाकुणाचे
पहिलीच वेळ असते प्रत्येक यौवनाची

हा चेहरा कशाने गेला सुजून माझा
गावास लागलेली चाहूल मर्दनाची

इतके समीप होते दोघे परस्परांना
लय वाढली अशाने वेगात स्पंदनाची

मी ऐकले असे की, मदमस्त नार आहे
मज वाट सापडेना त्या केतकी बनाची

नाही, नको म्हणाली लाजून नेहमी ती
एकांत ह्या ठिकाणी मग लाज का जनाची

जो बंधनात नाही कुठल्याच बांधलेला
वाटे तयास भीती सगळ्याच बंधनाची

गावास माणसे या आहेत सभ्य काही
होते म्हणून चोरी वस्तीत चंदनाची

सांगू कसे कुणाला काही मला सुचेना
मजला तहान आहे कुठल्या रसायनाची

वाचून "केशवा"ला सुचलेच काव्य पुन्हा
ही टांगसाळ आहे त्याची विडंबनाची

-केशवसुमार.

मजला कुरण मिळाले

आमची प्रेरणा नीलहंस यांची सुरेख गझल शब्दांत प्राण आले

आता कुठे जरासे त्यांचे लिहून झाले
होते विडंबनाला मजला कुरण मिळाले

सोडू नकोस गझला, सोडू नकोस कविता
सगळ्या कविजनांचे गुत्ते मला कळाले

मी हा विडंबनाचा जेव्हा ठराव केला
जे जे प्रसिद्ध होते ते ते बघा गळाले

प्रतिसाद वाचताना तो आपसूक मेला
वा वाह बोलणारे मारेकरी निघाले

कंपूत गाढवांच्या ही एकजूट आहे
बघताच "केशवा"ला सगळे कुठे पळाले?

-केशवसुमार

दुकाने-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची दुकाने

कोठे तरी मिळावी मदिरा मला सुखाने
शोधू अजून सांगा येथे किती दुकाने

होतो इथे निघालो शोधात 'बाटली'च्या
वाटेत लागली ही दुग्धालये ढिगाने

त्या मैफिलीत गेलो तिथली ठमा म्हणाली
आता हुजूर तुम्ही खाली बसा गुमाने

शेजारच्या मुलींच्या आल्या गळ्यात वाट्या
आजन्म ब्रह्मचारी अमचीच खानदाने !

होताच बंद मजला बहुतेक सभ्य दारे
वस्तीत शोधले मी फाजील चोरखाने

माझ्याच बायकोला आलो न ओळखू मी
(थोबाड रंगलेले होते तिच्या मुक्याने)

सोडू नका अता या निर्लज्ज "केशवा"ला
तुडवून आज काढा त्याला जरा बुटाने

करारनामे-२

आमची प्रेरणा ॐकार यांचे करारनामे

होता करारनामे येती घरी लखोटे
खाऊन रोज त्यांची सुटलीत खूप पोटे

स्वस्तात केशकर्तन ही जहिरात परवा
रस्त्यात माणसांचे दिसतात फक्त गोटे

कोठे विचार त्यांना जातात तुंबलेले
मजला पवित्र वाटे, होताच स्वच्छ पोटे

दिसतो जरी मदन मी, झालोय मी निकामी
सांगू कसे तुला मी फुटलेत काल घोटे

बोलून काय गेलो, ऐकू कुणास आले
जमले सभोवताली घेऊन सर्व सोटे

मद्यालयात केले मदिरेस कैद तुम्ही
पेताड माणसाला हे विश्व फार छोटे

ती ओकताच येथे मी सावधान झालो
(मी ताडले बरोबर, ती बोलतेय खोटे)

माणूस मी हरामी, खोड्याच काढणारा
फुसकेच बार माझे नाही लवंगि तोटे!

नाही कुणी मिळला प्रतिसाद घालणारा
पण "केशवा" तुझे ही आहे लिखाण थोटे

केशवसुमार

(गझल)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल

टार नाही, टूर नाही
वास हा पण दूर नाही

चौर्य केले, काव्य नाही
मी तरी मशहूर नाही

विरह भेटावा जरा मज
हे तिला मंजूर नाही

टाकली दुःखात थोडी
येवढा मी शूर नाही

आरसा पाहू नको तू
भूत दिसते, हूर नाही

बघ जरा माझ्या कडे तू
तोंड माझे ऊर नाही

"केशवा" ही झूल कसली?
आज पण बेंदूर नाही

केशवसुमार.

निर्लज्ज

पोटार्थासाठी आम्हाला स्वतःचा देश सोडून आमचा बाड बिस्तरा राणीच्या देशात हालवावा लागला आहे. त्यामुळे नव्या ठिकाणी बस्तान बसे पर्यंत विश्वजालाशी संपर्क तुटला होता. आज बरेच दिवसच्या अंतरानंतर विश्वजालावर वावर करायला मिळाला. मनोगती कवींनी माझ्या अनुपस्थी मुळे सुटकेचा निःश्वास टाकला आहे अशी एक बातमी मला व्यनिमधून मिळाली. ह्या कालावधीचा फायदा घेऊन बऱ्याच कविता / गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा यथा योग्य समाचार माफी आणि खोडसाळ या गुरुजनांनी घेतलेला बघून बरे वाटले.. ह्या थोर गुरुजनांना वंदन करून पुनरागमन करावा असा विचार आला आणि अदितीताईची निष्पर्ण ही अप्रतिम कविता वाचनात आली.(काय हा योगायोग म्हणावा) त्या प्रेरणे तून सुचलेली ही कविता..

हा येता जाता बघा काढतो खोड्या
कंटाळून गेले अता पुरी मी त्याला
निर्लज्ज उभा हा रस्त्यावर एकाकी
पाहताच मुलींना विडंबन सुचते ह्याला

हे गीत म्हणू की काव्य एक सडलेले?
लिहिताना मजला वाटे उदासवाणे
मी उगाच पडलो ह्या काव्याच्या मागे
शोधात नव्या कवितेच्या आले जाणे

पाडले तरी मी काव्य पुन्हा हे सारे
मग प्रकाशनाला अधीर झाली गात्रे
निरोप द्या वा प्रतिसाद कोणी टाका
कर तुझी "केशवा" बंद विडंबन सत्रे.....

--केशवसुमार
(२१ एप्रिल २००७,
वैशाख शुद्ध चतुर्थी, शके १९२९)

इतकी बंडल बघ दिसते ती

आमची प्रेरणा अजब यांची गझल इतकी सुंदर का दिसते ती?

इतकी बंडल बघ दिसते ती
नाक सारखे बघ पुसते ती...

उशीरा मजला, कळले सारे--
खुळ्यासारखे बघ हसते ती...

मैफल कुठली चालू असता
पेंगा काढत बघ बसते ती...

समोर दिसता मिटतो दारे
आणि उघडता बघ डसते ती...

नेत नाही तिला कोठे मी
नको तिथे पण बघ घुसते ती...

अता न तुझी सुटका यातून
तुला "केशवा" बघ पिसते ती...

'भेटणे नाही तुला'

हे विडंबन जयंत५२ यांची गझल 'भेटणे नाही अता' वरून सुचलं. ते येथे देत आहे.

'भेटणे नाही तुला'

बाप हा अत्ता तुझा सांगून गेला
'भेटणे नाही तुला' बोलून गेला

गुंड तो, त्याला कुणाची काय पर्वा
तो नको तेथे मला बदडून गेला

पाहिले होते तुला उचलून जेव्हा
हाय खांदा हा असा निखळून गेला

गाल माझे हे असे सुजले कशाला
व्हायचा तो सोहळा होऊन गेला)

लाज नाही, लाज नाही "केशवा"ला
बघ विडंबन तो पुन्हा पाडून गेला

(केशवसुमार)

बदलले मी शब्द काही

आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम गझल जोडले मी शब्द काही

शेवटी पाहू विठोबा संपवूया प्रथम खादी
जीर्ण झाल्या मंदिरी या पसर तूही आज गादी

क्लिष्ट काही, शिष्ट काही, भेटले विशिष्ट काही
भेटले नाही जिहादी, भेटले ते साम्यवादी

का अश्या हीमेशच्या या जीवघेण्या भ्रष्ट चाली?
(भुंकत्या कुत्र्या पुढे ह्या टाक लवकर पाव लादी)

कोण आले? कोण गेले? जाल हे उद्ध्वस्त झाले
शेवटी राहून गेली केवढी सदस्यत्वयादी

वृत्त नाही, छंद नाही, "केशवा"ला काम नाही
बदलले मी शब्द काही, लागता तुमच्याच नादी

रविवार, २७ मे, २००७

ओल-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल ओल

अधी काय होते? अता काय केले?
बघा वाकुनी नीट मी काय केले

तसा दोष असतो सदाचाच माझा
तरी प्रश्न उरतो कुठे काय केले!

मला वेगळे खूप पर्याय होते
अता वाटते हाय मी काय केले!

जरा जास्त हा आज आवाज आला
तुम्हाला समजलेच मी काय केले!

मला श्रेय मिळते सदा हे बुर्‍याचे
असे नेमके मी अधी काय केले ?

तुझा चेहरा का असा आज झाला?
कळेना जगाला कुणी काय केले!

तुमानीस का ही तुझ्या ओल आहे?
विचारू नका "केशवा" काय केले!!

-- केशवसुमार

मज उन्हाळा सोसतो ना

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची गझल ना उन्हाळा भोगला मी

मज उन्हाळा सोसतो ना फारसा...
भाजुनी झालोय मी बघ कोळसा...

'हात' अमचा नेहमीचा सोबती
सांग का ठेवू कुणावर भरवसा?

रोज मी गर्दीत येथे पाहतो
रेटतो माणूस येथे माणसा...

गाल का गेला सुजूनी आज हा?
हा कुणाच्या सांग हाताचा ठसा?

आयता अंधार सारा भोवती
चांदण्याचा हा कशाला कवडसा?

लोकहो, इतके तरी सांगा मला
"केशवा"ला मी इथे टाळू कसा?

-केशवसुमार, माकल्सफिल्ड

बुधवार, २३ मे, २००७

हवी आहे एक छबकडी..

गेल्या काही दिवसात मनोगताचे कुरुक्षेत्र करणाऱ्या सर्वसाक्षीयांच्या उडत्या छबकड्यांनी आमच्याही मनात वादळ उठवलं. पण कुरुक्षेत्रा वरचा रणसंगार पाहून प्रतिसाद कसा द्यावा ह्या विचारात असतानाच आमचे परमस्नेही जयंतरावांची हवं आहे एक आभाळ! ही अप्रतिम कविता वाचनात आली आणि आमच्या विमानप्रवासाच्या सुप्त इच्छा शब्दरूप घेऊन कागदावर उतरल्या.

हवी आहे एक स्मितसखी
कपड्याची अट नाही.
अगदी वीतभर किंवा चतकोर असले तरी चालेल!

हवी आहे एक बाहुली
कुठल्याही देशाची अट नाही.
अगदी भारतीय दिसली नाही तरी चालेल!

हवी आहे एक 'मधुमक्षिका'
अट फक्त एवढीच.
ती सुस्मिता असावी!
अगदी संपूर्ण प्रवासात एकदा जरी हसली तरी चालेल!
त्या हसण्याने
काही खडूस चेहऱ्यांनी
इंग्रजी वर्तमानपत्रातून असूयेचा नजरेने बघितले तरी चालेल!

कारण विमानतळावरची गर्दी. कोलाहल,गचाळ व्यवस्थापन, लांबलचक रांगा, ताटकळणे, तपासणीन
ेथकून गेलेल्या ह्या जीवाच्या
सुकलेल्या घशात
मार्टिनीचे दोन थेंब पडावे
एवढीच इच्छा!

हवी आहे अशी एक छबकडी
तातडीने!
अगदी माझ्या बोलण्याने चक्क लाजली आणि धूम पळाली तरी चालेल!

मंगळवार, १० एप्रिल, २००७

हातघाई चालली आहे...

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल लढाई चालली आहे...

प्रेमिकांची बघ धिटाई वाढली आहे
बाकड्यांवर हातघाई चालली आहे...

छापण्या नाकारती हे लेखणी माझी
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )

हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!

डोंगराच्या पायथ्याशी चालल्या पार्ट्या
कोण म्हणे आता 'पुण्या'ई राहिली आहे!

जायचे तेथे स्वतःची बाटली नेते
येव्हढी ही काय बाई बेवडी आहे...

बंद झाले बार सारे बारबालांचे
(पोलिसांची बघ कमाई थांबली आहे!)...

"केशवा"चे काव्य वाचुन हे म्हणाली ती
आज का माझी धुलाई चालली आहे

सोमवार, ९ एप्रिल, २००७

लेखकांचे पाय कायम ओढणारा

आमची प्रेरणा माफी यांची गझल रूपकांच्या ओढण्यांना ओढणारी

लेखकांचे पाय कायम ओढणारा
टाचणी कविता-फुग्यांना लावणारा

मद्य, मदिरा, मद्यालयावर लिहिणारा
वृत्तही केव्हा तरी सांभाळणारा

सख्त टीकेने कधी ना झोडणारा
पण जरा तिरकस स्तुतीने मारणारा

थंड रक्ताने विडंबन पाडणारा
वेळकाढू भांडणे ही लावणारा

राग येण्यासारखे हा वागणारा
'माफी'चेही भान "केशव" ठेवणारा

-केशवसुमार.

मंगळवार, ३ एप्रिल, २००७

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुंदर गझल झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे
कळले खरे तिचे हे रुपडे नवे मला रे

खाण्यात केस लागे, खाण्यात 'चोर' लागे
गिळतात चावल्याविण नवरे बघा बिचारे

माझ्या घरात मजला बोलायचीच चोरी
मजला कशास म्हणता जोरात बोल ना रे

बाया अनेक आल्या जमले न काम कोणा
धूतो घरात कापडे मी रोज का उगा रे

हसतात लोक हल्ली पाहून रोज मजला
तिन्हीत्रिकाळ असती माझ्यावरी पहारे

जावे जरा कुठे मी शोधात संपदेच्या
दिसतात बायकोच्या डोळ्या मधे निखारे

निर्धास्त देवतांनो, अमृत न मागतो मी
बस, एकदा बयोचे काळीज द्राववा रे

सांगू नकोस दुखडे "केशवा" जगाला
हसतील फक्त तुजला निर्लज वाचणारे

-केशवसुमार

शुक्रवार, ३० मार्च, २००७

शब्द-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांचे शब्द

झोपे मध्ये चुळबुळतो
झोपे मध्ये बडबडतो!

मी लिहितो शब्द असे
तो वाचून ते का चिडतो?

तुझ्याच मनी का संभ्रम?
थेट जरी मी हे लिहितो

तव ह्रदयी किल्मिष नाही?
तोल तुझा मग का ढळतो?

जालावर लिहण्या आलो
प्रशासक पण तडमडतो

हो मीच तिचा नावडता
नको तिथे बघ कडमडतो!

"केश्या" या जालावरती
लोकांना तू का छळतो!

-- केशवसुमार

गज़ल-२

आमची प्रेरणा शिवश्री यांची गज़ल

ह्या तुझ्या हातच्या पोळ्या आताशा खावत नाही
अन् कवळी लावून सुद्धा त्या मजला चावत नाही

झडलेत कधीचे कुंतल अन् उजाड झाला बगिचा
मी उगीच या डोक्यावर गंगावन लावत नाही

सदऱ्यावर माझ्या असते पानाची तांबुल नक्षी
पण बायकोस माझ्या ती केव्हा ही भावत नाही

ही बघून काया माझी, वदला तो भोचक शिंपी
विजार-पैरण सोडा,मी तंबूंत ही मावत नाही

दाराच्या पाठीमागे ही बघणाऱ्याची गर्दी
तरी बरे दारी मी तसली पाटीही लावत नाही

बापाच्या डोक्याला मी नित्याचा झालोय ताप
मी हुशार इतका त्याच्या हाताला गावत नाही

मी पडतो-उठतो पडतो पण पुन्हा तिथे तडफडतो
मी साधे गाढव आहे कोणी ऐरावत नाही

या गुत्त्यांमध्ये कितिदा मी पाणीच केवळ पितो
अन् नशा तरी होते हे आंटीला भावत नाही

हा पिडतो "केशव" लोका लिहून विडंबने असली
लिहिलेले कोणी सुंदर ह्या मेल्या पहावत नाही

-केशवसुमार.

गुरुवार, २९ मार्च, २००७

खात आहे सर्वकाही...

आमची प्रेरणा प्रसाद यांची सुरेख गझल भास आहे सर्वकाही...

खात आहे सर्वकाही...
लंघनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्रास घेतो
(थेट नाही एकदाही...)

शब्द सारे चोर साले
एकही ना अर्थवाही...

पाठ फिरता बायकोची
मी जराही भीत नाही

शेवटी येतो घरी मी
उकिरडे फुंकून दाही

जाणिवा ह्या गोठलेल्या
अन् तुझी ही हात घाई!

"केशवा"सांभाळ आता
वागणे हे ठीक नाही

(कुठे म्हणालो परी असावी)

आमची प्रेरणा प्रणव सदाशिव काळे यांची सुरेख गझल कुठे म्हणालो परी असावी

कुठे म्हणालो परी असावी
जरा तरी पण बरी असावी

हवा तुला जर प्रचंड पैसा
चरायला नोकरी असावी

तरुण लाचार होत जावा
अशी कुणी त्या घरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
लपायला ओसरी असावी

नकोस "केश्या" उगाच गप्पा
मनात लाज्जा तरी असावी

-केशवसुमार

गोड खाणे

आमची प्रेरणा चिन्नु यांची गोड गझल गोड गाणे

मला वेड लावी सखे गोड खाणे
खुळावून खातो सखे गोड खाणे

कसे त्या शिऱ्याला विस्मरून जावे
मंतरून जाई सखे गोड खाणे

मला हालव्याची दिसे रोज वाटी
तरंगे मनाशी सखे गोड खाणे

जरी आज आले मला हे घशाशी
कसे सांग सोडू सखे गोड खाणे

उदासीन झाले किनारे दिलाचे
मधूमेह लावी सखे गोड खाणे

जरी बंद लाडू, मला आज झाले
सुरू रोज चोरी! सखे गोड खाणे ...

अता दात सुद्धा मला सांगती हे
तुझे "केशवा" रे पुरे गोड खाणे

बुधवार, २८ मार्च, २००७

पावले-२

आमच्या पावलांची प्रेरणा मिलिंद फाणसे यांची पावले

निलाजरी, बदनाम करती पावले
नको तिथे बघ रोज वळती पावले

पुन्हा पुन्हा ही रेष लक्ष्मण खोडतो
न मोहणे चुकते, न अडती पावले

परावलंबित्व काय असते वेगळे
सरळ कधी झिंगून पडती पावले?

न पाहिले चंचलचरण सौदामिनी
स्थिरावली कमरेत नवती पावले

दहा ठिकाणे लिहिण्यास ही मोकळी
मनोगती अडकून बसती पावले

न "केशवा" बदनाम उगीच तू इथे
सदा तुझी तिरकीच पडती पावले

मंगळवार, २७ मार्च, २००७

शोभते ना वागणे हे फारसे

आमची प्रेरणा अदिती यांची अवघड वृत्तातली गज़लॉईड कविता शब्द माझ्या अंतरीचे आरसे

रोज मजला वाटते लाचारसे
शब्द त्याचे बोचरे फटकारसे

ही अवस्था कोणती सांगू कसे?
बोलता ही येत नाही फारसे

काल रात्रीचा तुझा पिंगा असा
शोभते ना वागणे हे फारसे

जाऊ दे ना सोड माझी पाठ ही
संपले माझे लढाऊ वारसे

आठवे ना घेतलेले नाव ही
रोज माझे चाललेले बारसे

"केशवा" झाला पुरे अचरट पणा
तू पुणेरी ही पहावे आरसे

--केशवसुमार(२७.०३.०७)
टीप : ही कविता विडंबन म्हणून खपेल का?
ह. घ्या.

शुक्रवार, २३ मार्च, २००७

उलटसुलट केले शब्द मी हे जरासे

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची सुंदर गझल.. उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे

उलटसुलट केले शब्द मी हे जरासे
सरळ डिवचले मी त्या कवींना जरासे

चरत चरत माझी वाढते रोज जाडी
सतत लपवतो मी पोट माझे जरासे

धडगत बघ माझी आज नाही तरी ही
(भिडव सरळ डोळे बायकोला जरासे)

"सहज बघ फसवितो , लीलया हा कुणा ही!"
जपुन पण असावे "केशवा"ला जरासे

विसर पडत जाता वाढत्या या वयाचा
फिरून बघ सख्या तू आरश्याला जरासे

केशवसुमार

गुरुवार, २२ मार्च, २००७

पिंगा -२

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता पिंगा

पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
वाटेवर घालतेय पिंगा जसे

चिंचेच्या झाडावर पिंपळाच्या पारी
उलट्या पायाच्या भुताची स्वारी
रानात चालला सावल्यांचा खेळ
भुताच्या मिशीला लावलय तेल
फेंदारल्या मिशांनी भुतोबा हसे...
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

पल्याडच्या झाडावर समंध खुळा
माडांच्या पोरीला घालतोय डोळा
चांदणं रातीला सांभाळा जरा
अडव्या वाटेचा अडवा वारा
झावळ्याच्या झोक्यात भामटा बसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

माडांनी वाऱ्याशी धरला फेर
लाटांनी काठाला मांडले थेर
अवस रातीला भरती भारी
झिंगून रंगून मातली स्वारी
उलट्या पायचे उलटे ठसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

--केशवसुमार(२२.३.२००७ चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९२९)

त्रास -२

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल त्रास

जास्तीच पावट्याचे झाले उगाच खाणे,
विसरू कसा अता मी? थांबे न वास येणे.

पत्नीत मेव्हणीचा हा रोज भास होणे,
मिळताच कारणे मी मग सासरास जाणे. (पत्नीस सोडण्याला मग सासरास जाणे)

सोसायचे किती मी हे बोल बायकोचे?
(होऊन तर्र का मग भार्यालयास येणे)

झाला सराव आता नुसताच पाहण्याचा,
(मदमस्त तारकांची चित्रे उश्यास घेणे)

शिकवीन मी तुला ही भाषा मुक्या मुक्यांची,
शिकण्यास एकदा पण माझ्या घरास येणे.

तू एकदा तरी रे घे ना मिठीत सखया
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.

बुधवार, २१ मार्च, २००७

तुमान लेका

आमची प्रेरणा पुलस्ति गझल वादळ-रेघा

काय करावे आता काही उमजत नाही
मला हवे "ते" तिला कसे पण समजत नाही

बुकलून गेले काल मला ते हात कुणाचे?
अवयव माझा कुठला की जो ठणकत नाही ?

गळवाचे दुखणे प्राणांतिक, सोसत नाही
मऊ गालिच्यावरती देखिल बसवत नाही

ओढुन बसली कमरेवरी तुमान लेका
नशीब माझे बसताना ती उसवत नाही

त्रास जगाला होतो साऱ्या विडंबनांचा
खंत तरी का तुला"केशवा" करवत नाही?

-- केशवसुमार.

मंगळवार, २० मार्च, २००७

काय पहाटे घडून जाते?

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख गझल स्वप्न पहाटे पडून जाते...

काय पहाटे घडून जाते?
रोज कशी ती चिडून जाते...

मनात नसते माझ्या काही
घडायचे ते घडून जाते...

ओठ मागती भलते काही
मलाच का अवघडून जाते...

तुझा चेहरा तसा बेरकी!
खरे मनातच दडून जाते...

तुझे "केशवा" असे वागणे
भल्या भल्यांना नडून जाते..

सोमवार, १९ मार्च, २००७

अता फक्त मी हात हे चोळते ....

आमची प्रेरणा अदितीताईची कविता मनाला तुझे चांदणे माळते ....

लिहावे अता ऊर दाटून येतो
लिहावे परी "केशवा" मी कसे?
तुझी याद येता उरी घाबरे मी
कश्या काढशी सांग माझी पिसे

तुझे भास होतात, साऱ्या ठिकाणी,
अनामी भीती ही मला वाटते
तुझे बेरकी ते प्रतिसाद येता
कुठे लाज माझी इथे राहते ?

कळेनाच काही कसे मी लिहावे?
लपाया अता मी कुठे जायचे?
पुरी लावलेली इथे वाट माझी
अता मायबोली कडे जायचे?

फणा काढलेल्या नागिणीपरी मी
तुझा 'चेहरा' पाहते कोसते
तुझी सर्व ती विडंबे आठवोनी
अता फक्त मी हात हे चोळते ....

--केशवसुमार(१८ मार्च २००७)
(फाल्गुन वद्य चतुर्दशी शके १९२८)

(मधुकर)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल मधुकर

तुझ्या करांचा स्पर्श कशाला, थरथर व्हावा
कळेन मजला भित्रा का हा भ्रातर व्हावा

न मोह मजला इंद्रपुरीच्या मदनाचाही
घरात सुद्धा शेर न का हा बब्बर व्हावा

कशास रागे भरसी, आहे प्रियकर का मी
तुझ्या पती मी माझा का ना आदर व्हावा

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
दूर कसा पण सासूचा हा अडसर व्हावा

असे नटावे, बघण्यानेही नेत्र भरावे
असे बघावे, नटव्यांनाही मत्सर व्हावा

कश्यामुळे निष्फळ बागे या मोहर यावा?
उपाय "केश्या" काही आता सत्त्वर व्हावा

अवरून घे पसारा

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुरेख गझल जुळवून ठेव तारा

उघडू नकोस खिडकी येईल आत वारा
मी दार लावतो, तू अवरून घे पसारा...

सखया मिठीत घे ना लाजू नकोस आता
कोणी पहात नाही ओसाड हा किनारा!

दारात थांब थोडे जाऊन आत बघतो
माझ्या पितामहांचा चढलाय काय पारा

फुकटात जेवणाचा आहे मज़ा निराळा!
(भरले कधीच नाही मी बील का विचारा...)

बोलू नकोस काही खाशील मार आता
मुडद्या तुझा मला रे कळतोय हा इशारा!

सुचतील सहज ओळी, जुळतील गझल-गाणी
नाहीच "केशवा"च्या नशिबात हा नजारा!

- केशवसुमार, पुणे

वर्म -३

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल वर्म

मालकाचे विव्हळणे ना मद्य ही चिक्कार आहे
त्या जुन्या गुत्त्यापरी हा ओळखीचा बार आहे!

शिंग कोणी मारलेले शोध ते नंतर जरा तू
(झाक हाताने अधी तू फाटली सलवार आहे)

व्यर्थ का झिंगले महात्मे, मद्य बघ संपून गेले
या बसा हासू नका मी प्यायलेलो फार आहे!

जाणतो रस्ता घराच्या , शोधता मिळती न वाटा
मी करावे मग कसे? मी चालण्या लाचार आहे!

वाहते धमन्यात ते जे "केशवा" पेल्यात होते
अर्थ शब्दांना कुठे मग, लिहिणे बेकार आहे!

-- केशवसुमार.

देवा-२

आमची प्रेरणा चित्तरंजन भट यांची अप्रतिम गझल देवा

आमच्या वस्तीत असतो रोज शिवीगाळ देवा
याचसाठी जाहली बदनाम अमुची चाळ देवा

ती तुझे बघ नाव घेते , लाजताना-हासताना
घेतला जाईल आता बघ तुझ्यावर आळ देवा

पाहिले आहेस का तू नाचताना बारबाला?
एक ठुमक्यानेच तू होशील बघ घायाळ देवा

वेळ पाळावीच लागे आमच्या खानावळीची
येथली कंत्राटदारिण भलतीच तोंडाळ देवा

झगमगाटात इथल्या करशील तू भलतेच बाबा
रे नको हातात घेऊ नर्तकीचे चाळ देवा

बदलले संगीत सारे; बदल अपले कान, तूही
रॅप कर आता कशाला आरती रट्टाळ देवा

मारतिल पाकीट केव्हा ते तुला कळणार नाही
सांगतो तू ऐक माझे, पाकिटा सांभाळ देवा!

शेवटी विडंबना ह्या जायचे विसरून देवा
मानले की "केशवा'ने लिहिले वंगाळ देवा

-- केशवसुमार

तरही गज़ल -२

आमची प्रेरणा वैभव जोशी यांनी मायबोलीवर घेतलेल्या कार्यशाळेत मीनु यांनी लिहीलेली तरही गज़ल

ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
अता बोलणे फक्त स्पर्शात होते ..

कुणी बेवडा गात जातो भसाडा ..
शिव्या फक्त देण्या जणू रात होते ..

घरी एकटी ती, असावे सवे मी ..
असे नेहमी फक्त स्वप्नात होते ..

मनी चाललेले तुझ्या जाणतो मी ..
सुरू खेळ सारे इशाऱ्यात होते ..

दुकाने सुरेची, भले बंद केली ..
तरी आमची सोय गुत्यात होते ..

मला वाटले फास बसला गळ्याला ..
करांचे तिच्या हार कंठात होते ..

सुरू श्वास नाही अधी दाखला द्या ..
म्हणे चैकशी फार मुडद्यात होते ..

कुणी एक रेडा, झपाटून जावा,
असे लाल या काय रंगात होते ?

भले तोल जावो, भले चाल बदलो ..
तरी चालणे हे दिमाखात होते ..

कुणी काव्य केले, कुणी गीत केले ..
अखेरीस त्यांची, हजामात होते ..

नडे या कवीशी नडे त्या कवीशी ..
तुला"केशवा"टेकले हात होते ..

किती येत होते किती जात होते

आमची प्रेरणा कारकून यांची वैभव जोशी ह्यांच्या गझल कार्यशालेतील जमीनीवर आधारित (सौजन्य- मायबोली) गझल ऋतू येत होते ऋतू जात होते

किती येत होते किती जात होते
पहा सर्व पंडीत कोड्यात होते!

कसे थांबवू पोट माझे प्रवाही!
असे कालच्या काय खाण्यात होते?

जरी जाहले मग्न मी देवळात
परी चित्त माझे चप्पलात होते!

कशाला तयारी नव्याने फसाया ?
भले का कुणाचे विवाहात होते!

कशाला करा हात ओले अता हे
अता काम सारे , चिठोऱ्यात होते

कुणाला कधी ना, दिले ते तुला मी
तसे सर्व माझे हिशोबात होते

रडे ती अशी आज भलत्याच वेळी
(पुन्हा घोळ झाले हिशोबात होते!)

शिवीगाळ ही "केशवा" रोज होते....
जरी व्यंग त्यांच्याच काव्यात होते

- केशवसुमार

मंगळवार, १३ मार्च, २००७

चेहरा-२

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता चेहरा आणि अनुताईची जागतिक भूत महासभा(जा.भू.म.)

मी भुतांनी बाध झालो आवसेची रात झालो
मी गिरा, मी देवचारा मी वेताळी हास्य झालो
पिंपळाचा पार दारी , चिंचेवरी समंध मी
रूप माझे कोणते सांगा खरेसे दाखवू मी?

खवीस मी मुंज्या ही मी रुप भुताचे नवे मी
रक्त सारे शोषण्यारे ड्रॅक्युल्याचे रूप ते मी
रूपकांच्या ओढण्या या ओढताना चेहऱ्याशी
"केशवा"चा चेहरा मी सांडला सांगा कुठेशी?

--केशवसुमार
(१२.३.२००७)

आनंदाने -३

आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल आनंदाने

जाता-जाता हसून जावे आनंदाने१
तोंड वाकडे करून जावे आनंदाने

स्मशानातले मुडदे सारे जिवंत व्हावे
जादूटोणा करून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
किटक नाशकं मारून जावे आनंदाने

तुझ्या तनूने पृथ्वी गोलासमान व्हावे
वजन वाढुनी, सुजून जावे आनंदाने

घरी पोचणे अशक्य व्हावे प्यालावरती
रस्त्यावरती पसरून२ जावे आनंदाने

मिळालाच तर अश्या ठिकाणी मार मिळावा
कुणालाच ते दिसू न जावे आनंदाने

मार कुठे मज किती मिळाला स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी जाण्या सुद्धा
मेकप थोडा करून जावे आनंदाने

वेळ मार खाण्याची येईल "केशा" तेव्हा
जिवलग गोळा करून जावे आनंदाने

— केशवसुमार
------------------------------------------------------------------------------------------------
१."आनंदाने" हा शब्द फक्त क्रियाविशेषण रुपांत वाचवा आणि नाम रूपांत वाचून गैरसमज करून घेउ नये. २.पसरणे- (१) पडणे, पडून रहणे (२) लोळणे किंवा झोपणे

"तरही" गझल -२

आमची प्रेरणा कामिनी केंभावी यांची "मायबोली" वर वैभव जोशींनी घेतलेल्या गझल कार्यशाळेतली गझल "तरही" गझल

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कशी नेहमी मीच गोत्यात होते

तुझा खेळ झाला पुन्हा पावसाचा
अता वाहते नीर नाकात होते

उसाच्या रसा काढण्या वेळ झाला
तुला वाटले मी गरे खात होते

इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते

अता "केशवा" हे उगा दाखले का?
तुझ्या कोठल्या त्राण काव्यात होते?

केशवसुमार

सोमवार, १२ मार्च, २००७

(रग)-२

आमची प्रेरणा अदितीताईची कविता (रग) आणि आमचे गुरुजी खोडसाळपंतांनी (रग) कवितेला दिलेला प्रतिसाद..

मनोगतावर साऱ्या कविंनी हे विसरू नये
प्रशासकाला इथल्या कधी गृहित धरू नये

तो टाकेल काढून वाट्टेल तसल लिहिलेलं
व्यक्तिगत टोमणे लिखाणात पखरू नये

विडंबन करती सारे, कधी असे कधी तसे
असू दे, म्हणून काय आम्ही कविता करू नये?

नाल्यात बेडकांचा बघ सूर लाजला
कंपूत नांदताना असे घाबरू नये

झाले अशक्य "केशवा" माश्या मारणे
म्हणून विडंबनाचे विडंबन करू नये

केशवसुमार

बुधवार, ७ मार्च, २००७

कवितेचा चोळामोळा

आमची प्रेरणा संपदा१ यांची कविता दाद

कोणत्या नावने मी रे
आता लिहावे ना कळे
ह्या विडंब वणव्यात
काव्य कोवळे हे जळे

शब्द दाहक, बोचरे
त्यांना घाबरले मन
प्रश्न सतावतो पुन्हा
कसे करावे लेखन

कसे आवरावे त्याला
द्या हो कुणी त्याला मार
आग ओकतो येव्हढी
लाज काढतो हा पार

सांग "केशवा" रे तुला
कसा येईना कंटाळा
थंड रक्ताने करीतो
कवितेचा चोळामोळा

केशवसुमार

मंगळवार, ६ मार्च, २००७

मराठमोळी -२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुंदर गझल मराठमोळी

नकोस समजू साधी भोळी...
जरी नेसते साडी चोळी!

हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुझ्याच लोचट लुबऱ्या डोळी...

नकोस छेडू पुन्हा मला तू,
बाप माझा घालेल गोळी...

फकीर आम्ही! जगास लुटण्या
आता फिरतो करून टोळी!

तुला "केशवा" जमणे नाही
जो तो येथे गोंडा घोळी!

- केशवसुमार, पुणे

सोमवार, ५ मार्च, २००७

(ऋतू येत होते ऋतू जात होते- ५)

आमची प्रेरणा जयन्तरावांची सुरेख गझल ऋतू येत होते ऋतू जात होते- ५

ऋतू येत होते ऋतू जात होते
मला काय सांगा नवे होत होते

जुना तोच साकी जुनी ती सुराही
नव्याने पिणारे गटारात होते

कधी ऐकलेना पसरले कुठेही
जरी लोक सारेच प्रख्यात होते

सदा ओढणी ओढशी का तिची तू
असे काय त्या ओढणीच्यात होते

मदीरा इथे मी किती प्यायली ही
घरी जायचे हे कुणा ज्ञात होते

उतारा अता द्या मला आज कोणी
किती प्यायलो हे कुणा ज्ञात होते

न प्रतिसाद आला कुणाचा कधीही
कमी "केशवा" काय काव्यात होते?

(केशसुमार६९)

शुक्रवार, २ मार्च, २००७

"रोजची बात"

आमची प्रेरणा पुलस्ति यांची "कुणाची बात"

ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी गुंग मी रंग-ढंगात होते

उगा सांगता का कथा रावणाच्या
असे आजच्या ही जमान्यात होते

जरी खात लालू इथे 'घास' आहे
कशी रेलवे आज स्वस्तात होते?

रिकामीच मैफ़िल पहा जाहलेली
असे 'दर्द-गाणे' कुणी गात होते

मला आरसा आज कोठे मिळावा?
किती ओतले तेल केसात होते

जरा शांत आता, पहाटे निजू द्या
सुरू जंग रात्री अकस्मात होते!

अशी वेळ येता कुठे सांग जावे
न जाता फजीती समाजात होते

चढे षंढ गाडीत, त्याला भिडावे
इथे येव्हढे धैर्य कोणात होते!

शहाण्यात माला कुणी मोजले हो?
इथे सर्व वेडे अभिजात होते

अता "केशवा" रोजची बात आहे
विडंबन कसे हे झटक्यात होते

केशवसुमार..

गुरुवार, १ मार्च, २००७

खूप सोसले अर्धांगीचे बंधन मी(गझल)

आमची प्रेरणा अजब यांची गझल खूप सोसले आयुष्याचे बंधन मी (गजल)

खूप सोसले अर्धांगीचे बंधन मी
करीन आता पहा तिचे रणकंदन मी...

दिसे मवाली चेहरा माझा वरून अन्
(आतून सुद्धा मुळीच नाही सज्जन मी)...

नको तिथे हे दुखते मजला कधी कधी
बोलु न शकतो कुणास हे पण पटकन मी...

तिला भेटता, फटके पडले अनेकदा
सांग तुझ्या बापाला तुझे प्राक्तन मी...

नको "केशवा" उगा घाबरू आता तू
सांग 'अजबा' केले आहे विडंबन मी...

केशवसुमार

आज भजी कांद्याची.....

आमची प्रेरणा मानस६ यांची गझल आज फुलांची भाषा.....

आज भजी कांद्याची, मी ही तळते आहे
त्या वासाने घर सारे दरवळते आहे

करपट ढेकर आज मजला आली कशी ही ?
अरबट चरबट खाण्याने मळमळते आहे

शांत बैस रे, कधी तरी तू निमूट आता
बघेल तेव्हा कारट हे वळवळते आहे

आज लागले करास माझ्या पुन्हा नव्याने,
रक्त पाहूनी नर्स ही चळचळते आहे

आज बायको माहेरी जाण्यास निघाली,
खबर 'आतली' सर्वांना पण कळते आहे!

गझल झरा का मनोगतावर अटून गेला ,
रक्त "केशवा" चे पुन्हा सळसळते आहे!

केशवसुमार

बुधवार, २८ फेब्रुवारी, २००७

(ऋतू येत होते ऋतू ज़ात होते -३)

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल ऋतू येत होते ऋतू ज़ात होते - ३

ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
फसवणे तुझ्या हे स्वभावात होते

नको ते मला आज मागून गेली
तिचे मागणे फार वाह्यात होते

गिरवता तिचे नाव मी राजबिंडे
तिने मारलेले श्रिमुखात होते

तिच्या रुमच्या कवडशा मधोनी
तिला पाहिले बाहुपाशात होते

जरी लाजते आज तुमच्या समोरी
(परी गुदगुली 'आतल्याआत' होते)

पुन्हा दैव आलेच अडवे मला बघ
तिच्या सोबतीला तिचे तात होते

नको " केशवा" जाउ वाटेस माझ्या
मला 'चक्रपाणि' बजावीत होते

तुझी वाचुनी रोज सूमार काव्ये
तुला "केशवा" टेकले हात होते

केशवसुमार

ऋतू येत होते, ऋतू जात होते -२

आमची प्रेरणा आमच्या गुरुजींच्या द्विपद्या ( इथे वाचा) आणि जयन्तरावांनी केलेली समिक्षा 'पण तरीही हा चतुर कवि आपले महिलाविषयक धोरण बदलण्याबद्दल चकार शब्दही काढत नाही हे लक्षात घ्यावे ! त्यामुळे भविष्यात या कवीकडून असेच प्रत्ययकारी लिखाण वारंवार वाचायला मिळेल अशी आशा करण्यास बराच वाव आहे.'

ऋतू येत होते, ऋतू जात होते
विचारू नका हे सुरु काय होते

मुली पाहण्याला जरा वेळ झाला
चणे भेटले पण, कुठे दात होते

घरी बायको अन् कचेरीत स्टेनो
किती रोज मजला इथे काम होते

कशाला अता आठवू काय झाले
नकोत्या ठिकाणी तिची गाठ होते

तिला पाहता घाबरे गाव सारा
जिभेला कुठे हो तिच्या हाड होते

नको तेच मी नेमके बोललो अन्
सुजे गाल माझा ,तिचे हात होते

भुताला कसे ओळखावे कळेना
तुझे "केशवा" वाकडे पाय होते

केशवसुमार

सोमवार, २६ फेब्रुवारी, २००७

कंदिल - द दिवा

आमची प्रेरणा साऱंग यांची गझल दिवा

होता सुसाट वारा घुसला झग्यात माझ्या !
लाजून झाकला मी मुखडा करात माझ्या !

मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?

मीही मठात जातो; अन मंदिरात जातो
पण ध्यान सर्व माझे असते बुटात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
(ह्याच्या पुढे जमेना सरत्या वयात माझ्या !! )

हे रोजचेच झाले आम्हास भारनियमन
कंदिल ठेवला मी आता घरात माझ्या...!

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २००७

पीक -२

आमची प्रेरणा पुलस्ति यांच सु(रेख) पीक

लाविले मी बाटलीला बूच हे का लीक आहे?
का असे माझ्या मनी हे संशयाचे पीक आहे?

तू कश्याला ढोसताना मागुती लपलास दोस्ता?
का फुकट पीतोस, तुजला लागली का भीक आहे?

देव किंवा दैत्य केवळ बघ प्रमाणाचा फरक हा
दैत्य तो बघ ज्यास बसली वारुणीची कीक आहे.

मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
चेहऱ्या वर वाढलेल दाढी मिशांचे पीक आहे

"केशवा'ला का सुचावे काव्य मदिरेचेच पुन्हा
घेतसे हल्ली पुन्हा का तो विडंबन पीक आहे?

फटके पडले बापाचे जर

आमची प्रेरणा माफीचा साक्षीदार यांची कविता परके झाले बाबांचे घर

फटके पडले बापाचे जर
उघडे आहे हे माझे घर

सासू हूनी, बाप सासरे
दीरनणंदा हे त्यांच्या उपर

सिंह जरी हा, घरात उंदिर
असा माझा पतिपरमेश्वर

शेतेविहिरी गायगुरे ही
कसले आले जीवन सुंदर

ठरला अमुचा खाण्याचा क्रम
मी आधी अन बाकी नंतर

लौकिक पाहुन तुझा "केशवा"
क्षणभर आली मलाच चक्कर

मुजरा

आमची प्रेरणा पुन्हा एकदा मिलिंद फणसे यांची गझल पृथक्

नुस्तेच पाहुनी हे मन तृप्त होत नाही
सांगावयास हे ही लज्जित होत नाही

विसरून भान सारे बघतात लोक मुजरा
गाण्यात फक्त कोणी संतुष्ट होत नाही

कोणी उरास पाही, कोणी कटीस पाही
लुब्रा कधी कलेने आकृष्ठ होत नाही

पश्चात मीलनाच्या येती मलाच डुलक्या
माझा सखा परी हा निद्रिस्त होत नाही

सरताच रात्र सारी, ती ही घरास जाई
कोणी इथे कुणाचे आजन्म होत नाही

तोंडास झाकती हे बघ माडीस सोडताना
ह्या "केशवा" प्रमाणे का धारीष्ट होत नाही

बुधवार, २१ फेब्रुवारी, २००७

काय कू

आमची प्रेरणा अनील बोकील यांच्या हायकू

साजरे केले सण
वाढलेले तन
आता पुन्हा 'जिमे'त वेट पाहणे आले
***
धुलवडीचे भांग
मी पिण्यात दंग
पाय कधी घसरला कळलच नाही
***
हिरवे जर्दा पान
चंपाबाईची तान
माझा बाप अचानक माझ्या समोर
***
चिंचा, बोरे, आवळे?
हलकट,मेले,टवळे
नक्की कुठे, केव्हा शेण खाल्ले?
***
म्हातारपणी चळ
मरायला टेकलेलेपण
'त्यांच्या' मागे धावणे सुरूच..
***
वाचक दिसेना
प्रतिसाद मिळेना
तरी 'केशवा"चे लिहिणे सुरुच...
***

केशवसुमार.

गं सखे-२ ....!!!

आमची प्रेरणा प्राजु यांची सुंदर कविता गं सखे.....!!!

सप्तसुरांच्या नावा खाली जरा कमी तू रेकत जा
गाताना सभोवतालचे थोडे भान ही ठेवत जा

शुभ्र पांढऱ्या केसांना तू कलप थोडा लावत जा
झिपऱ्यातूनी त्या थोडासा कंगवा ही फिरवत जा

निळ्या तुझ्या नयना मधली चिपाडे सुद्धा काढत जा
गोड(?) तुझ्या वदना वरती पाणी थोडे शिंपीत जा

रोज सकाळी दात आपले खराखरा तू घासत जा
मुखवासाने नंतर उर्ग श्वासास तू रोखीत जा

सप्ताहातून ह्या देहाला थोडे पाणी दावत जा
रंगेबेरंगी(?) मळके कपडे कधीतरी बदलत जा

मनोगतावर येऊन गधड्या थोडेसे तरी लाजत जा
एकतरी इथली कविता "केशवा" आता तू सोडत जा

-केशवसुमार

झाले पिणे...!

आमची प्रेरणा आदितीताईंची कविता झाले गाणे...!

जमता सारे मित्र जुने मग झाले पिणे
स्मिता, रेखा आठवता मग झाले पिणे

मदिरेचे ब्रान्ड किती हे आले गेले
त्यांना ओळखण्या साठी मग झाले पिणे

पार पडल्या सत्र परीक्षा तेव्हा साऱ्या
आज लागता निकाल मग झाले पिणे

जेव्हा कळला 'मनोरमे'चा नवीन अड्डा
त्या जाता मधूशाळेला मग झाले पिणे

मंदिरामध्ये बसून घेता ओल्या रात्री
बोटांनी नैवेद्य शिंपडूनी मग झाले पिणे

ग्लासांनी ग्लासांना देऊन हलका धक्का
आरोळ्या अन किंकाळ्या मग झाले पिणे

खंब्बे तुटले, फुटला पेला, प्रत्येकाचा
ओंजळी मधूनी "केशवा"चे मग झाले पिणे

---केशवसुमार
(११.१.२००७)

सध्याच्या या मनोगतावर...

आमची प्रेरणा अजब यांची गझल आकाशीचा चंद्र

काही जुन्या मनोगतींचे (काल्पनिक) मनोगत

सध्याच्या या मनोगतावर मन माझे लागत नाही
प्रशासकाच्या काय मनी पण कोणा उमगत नाही...

काळ बदलला मनोगतचे स्वरूप बदलत गेले
जूने जाणते कोणी आता येथे लिहीत नाही...

अनोळखी ती सर्व माणसे तरी ही माझी अपुली
हाय! अताशा त्यांच्या वाचून मजला करमत नाही...

ह्या नात्याला नाव, गाव वा पत्ता ही लागत नाही
असाच राहो स्नेह मी दुसरे काही मागत नाही...

खूप ठरवले तरी ही मी परतून येईन येथे
दुसऱ्या संकेतस्थळी "केशवा" घरपण वाटत नाही...

केशवसुमार

समजत नाही...

आमची प्रेरणा अजब यांची गझल आकाशीचा चंद्र

तुम्हा सांगतो बायकोला मी जरा ही भीत नाही
गरम पाणी नसेल तर मी भांडी ही घासत नाही...

काळ बदलला तिचे दिसणे पण तसेच बदलत गेले
वजन वाढले किती तीचे मी हिशोब ठेवत नाही...

अनोखे हे नाते आमचे साऱ्या दुनियेच्या मध्ये
बायको पुढे माझ्या माझे काहीच चालत नाही...

रोज भांडतो इतके तरी ही अजून विटलो नाही
खरे सांगतो तीच्या वाचून मलाच करमत नाही...

'अजब' चे हे काव्य काशाला तू मोडलेस "केशवा"
सगळे सांगूनी थकले तरी पण तुला समजत नाही...

केशवसुमार

गझल-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल

सांगून सुत्र तसले मज बुध्दिमंत गेले
माझी करुन काशी, मग, सर्व संत गेले

चित्कारतोस का रे खाऊनी हरभऱ्यांना
हदरून गर्जनेने बघ आसमंत गेले

काढ्यास ही नमेना, गोळीस पण नमेना
एरंड ढोसल्याने मग सर्व जंत गेले

ताडी म्हणू नका, हे आहे पवित्र पाणी
प्राशन करून तिजला मुल्ला-महंत गेले

आहे अटळ, मिलिंदा, वरवंट केशवाचा
त्याने पिटून येथे,बघ नामवंत गेले

केशवसुमार..

लढाई ..(गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची लढाई..(गझल)

कमरेस दाखवी जी सलवार पाहतो मी
रुढी परंपरा ह्या बेकार पाहतो मी

जी काल बाग होती, ती आज प्रणयभूमी
बाकांवरी इथेहा शृंगार पाहतो मी

'तुटलाय' हात डावा,कोणी 'तयार' नाही!
धुण्यास आज मजला लाचार पाहतो मी

प्रतिसाद लाटण्याची चालू बघा लढाई
त्या सर्व लेखकांचा बाजार पाहतो मी

इतिहास "केशवा"चा सांगू नका मला हो
त्याच्या विडंबने जग 'बेजार' पाहतो मी

केशवसुमार...

बाटल्या

आमची प्रेरणा वैभव जोशींचा पिंजरा

बाटल्यांना कोणी सांभाळायचे?
बेबड्यांचे सुरू झाले प्यायचे

बेवड्यांनो स्वाभिमानी व्हा जरा
शुद्ध असल्यागत अता वागायचे

मान्य कर आता चढाया लागली
बाटलीला दोष नाही द्यायचे

प्यायचे समजूतदारांसारखे?
जाऊ दे ! नाही मला झेपायचे

ठेवुया लक्षात आपण रात्रभर
तू किती अन मी किती ढोसायचे

सांग मजला आज तू आता तरी
मी कसे माझ्या घरी पोचायचे?

एक होता खांब शेजारी खरा
दोन नेहमी ते मला वाटायचे

एकटा ही मी पिण्याला लागलो
काय माझे वेगळे मग व्हायचे?

ऐकले मी "केशवा"बद्दल किती
एकदा त्याच्या सवे मज प्यायचे

केशवसुमार

माणसे (गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची माणसे (गझल)

शरम लाज सगळी विसरती माणसे
बघत खेळ तसला गुंगती माणसे

तो तिथे नाचला, मी जरा झिंगलो
नाव माझेच का सांगती माणसे?

तीच ती टेबले,त्याच त्या बायका
बदलतो बार, ना बदलती माणसे

दूर असला तरी मी तिथे पोचलो
अन नकोतीच का भेटती माणसे

नाचती लोक हे सोडनी लाज का?
"केशवा"लाच ना समजली माणसे

(केशवसुमार 69)

प्रेम -२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल प्रेम

आज तीर्थ दे जाम नाही
सोबती सखा शाम नाही

लाज बाळगू रे कशाला
तेव्हढे तिचे दाम नाही

एकनिष्ठ राहू कसा मी?
देह तेव्हढा ठाम नाही

हो पवित्र तू ही तनाने
लक्स वापर हमाम नाही

फक्त वासना प्रेम खोटे
(मी उगाच बदनाम नाही)

छेड काढशी का कविंची
"केशवा" तुला काम नाही

केशवसुमार...

शोध -२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल शोध

मुक्ती पुरोहितांना प्रणवात सापडेना
युक्ती सराइतांना प्रणयात सापडेना

देणार त्रास नाही भवसागरात अवघ्या
ती बायको कुणाला जगतात सापडेना

तो वागतो जसा की कुत्रा पिसाटलेला
का खांब एकही या शहरात सापडेना

बाहूतली प्रियाही मज वाटते सुरा ही
आहे नशा तिची जी दारूत सापडेना

तोडांस वास भपकन, डोळ्यात तर्रवादळ
माझ्याहुनी पियक्कड वस्तीत सापडेना

'केश्या' कुठून सुचली ही अवदसा तुला रे
जागा लपायला मग गावत सापडेना

शोध -२

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांचा शोध

हे जड कोठ्याचं
पोट घेऊन
मला आता जगणं
अशक्य झालंय
आता
हा मार्ग मोकळातरी व्हावा
किंवा
पूर्ण ढास तरी लागू देत

त्रिफळा चूर्णाचा शोध
मी अजून सोडला नाहीय.

केशवसुमार.

पृथक्-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल पृथक्

सॅलेड खाऊनी हे मन तृप्त होत नाही
वाढीव पोट माझे का लुप्त होत नाही

सरताच पावसाळे, सुकतात पाणसाठे
मोरीतल्या नळाचा गंगौघ होत नाही

कोणी तलाव गाठी, कोणी नदीत जाई
ह्याच्या मुळेच पाणी बघ शुद्ध होत नाही

पश्चात जेवणाच्या येताच खीर वाट्या
एकाच वाढणीने संतुष्ट होत नाही

अठवून काय घडले सुटलाय कंप मजला
सांगायची कुणाला अन भिस्त होत नाही

कोणी तरी अता का सांगल "केशवा'ला
पृथगात्मते कवी हा पण श्रेष्ठ होत नाही

शरीराने मला हो नेहमी मद्यालयी नेले

आमची प्रेरणा माफीचा साक्षीदार यांची सुंदर गझल शरीराने मला जेव्हा जरा रुग्णालयी नेले

शरीराने मला हो नेहमी मद्यालयी नेले
मदीरेने मला पण शेवटी 'देवालयी' नेले

शिकाया बायका आल्या चला हे ही बरे झाले
असे याच्याच साठी मी मला विद्यालयी नेले

सकाळी रोज तू जातेस कोठे ते कळाले अन
तुला भेटायला मीही मला दुग्धालयी नेले

नशेने सोडले कोणा फरक इतकाच केला की
कुणा भार्यालयी नेले कुणा नृत्यालयी नेले

असे मान्य मलाही मीच गुन्हेगार "माफी"चा
म्हणोनी "केशवा"ला या तुझ्या न्यायालयी नेले

केशवसुमार

शनिवार, १७ फेब्रुवारी, २००७

कशाला ! -२

आमची प्रेरणा अदिती यांची गझल कशाला !

गटारा मधे सांग जाणे कशाला
तुझे रोजचे मग नहाणे कशाला

असे रोज जर दूर जाणे कराया
अधी येव्हढे सांग खाणे कशाला

तुझे नाव माहीत साऱ्या जगाला
उगा मीच घेऊ उखाणे कशाला

जरी त्रास आहे तुला घोरण्याचा
मला झोपण्याचे बहाणे कशाला

तुझे लागलेले मला वेड आहे
मला सांगती हे शहाणे कशाला

जरा लागली गाठ जेंव्हा सुटाया
दिसावी नको ती निशाणे कशाला

करी स्नान ना त्यास येईल बदबू
अता अत्तराचे उधाणे कशाला

तुला पाहिजे हॉर्स पावर इथे जर
शिळे आंबलेले फुटाणे कशाला

कुणालाच ना माहिती बाप त्यांचा
तुला सांगु त्यांचे घराणे कशाला

(लिही "केशवा" तू स्वतःच्या कलाने
कवींचे मला वक्र पहाणे कशाला)

मात्रांच्या संकटात सापडल्यामुळे अखेरच्या शेराला कात्री लावावी वाटले होते. पण तो इथे देण्याचा मोह आवरला नाही

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २००७

शूळ -२

आमची प्रेरणा आमचे गुरुवर्य खोडसाळ यांचा शूळ

वाढताना 'नको रे!’ म्हणावे
आणि चोरुन मग का गिळावे!

आठवेना कधी प्रेम केले
चेहरे मग कसे आठवावे?

बाप झालास बारा मुलांचा
तू तुझ्या वारूस आवरावे!

वास हे खास नाहीत माझे
हे तुझ्या खेटसराचे सुगावे!

एकही मूल अद्याप नाही
मागती लोक मजला पुरावे!

हासतो हा अता आरसाही
अंग ढोले तुझे हेलकावे!

ठेवतो कोण येथे कुणाला?
प्रश्न असले कशाला पुसावे!

दार माझे मला सापडेना
सारखी दिसती सर्व दारे!

धन्य झाले कवी आज सारे
"केशवा" ठेवली खूप नावे

मिठी मधूनी कसे सुटावे?

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल मिठीतही का सखे दुरावे?

कळे न मजला कसे करावे
मिठी मधूनी कसे सुटावे?

हळू हळू बघ विरून गेले
न केस आता शिरी उरावे?

वजन न पेले मलाच माझे
कशास ठेवू तुलेस नावे

पगार संपे मिळो उधारी
कधीच काही कमी नसावे

जिथे तिथे हे खिळे निघाले
अता कसे मी इथे बसावे

ललाटरेखा कशी पुसावी
नवीन कोणी तरी पटावे!

उजाडल्या वर निघे पळाया
उदर तरी का न आत जावे

शुद्धीत यावे कधीतरी मी
उतार पीण्या...घरास जावे

जनास वाटे खरेच आता
न "केशवा" तू कधी लिहावे.

श्वासांची धडधड उगीच चालत नाही

आमची प्रेरणा चित्त यांची गझल श्वासांची धडधड काही सांगत नाही

श्वासांची धडधड उगीच चालत नाही
मी कधीच प्याला खाली ठेवत नाही

आजकाल मी बघ दिवसाढवळ्या पीतो
मी रात्ररात्रभर आता जागत नाही

मी शब्द दिला, तुज पिणार नाही आता
पण शब्द कधी मी माझा पाळत नाही?

प्रत्येक घोट हा सावकाश मी गिळतो
मी शुष्क घसा हा माझा ठेवत नाही

मी अपरात्रीला उगाच वळवळ करतो
बघ पिल्यावीण हा डोळा लागत नाही

मदिरेचे प्याले तुडुंब वाहुन गेले
पण अक्षय तृष्णा माझी भागत नाही

मी येण्याआधी सुरा गंध हा येतो
"मी आलो!" मज सांगावे लागत नाही

केली विडंबने थोरामोठ्याची तू
बघ तुझी "केशवा' आता धडगत नाही

असहाय-२

आमची प्रेरणा जयंतरावांची गझल असहाय

भात हा नुसता असा मी घेत नाही
मागतो सांबार कोणी देत नाही

खीर माझी संपली आहे कधीची
वाढपी माझ्याकडे का येत नाही?

भागली नाहीच तृष्णा काल माझी
आज बासुंदी पुरीचा बेत नाही?

वाढलेले सर्व मी खाऊन जातो
मी घरी बांधून काही नेत नाही

लाडवांचा ढीग हा ताटात माझ्या
पैज लावा, हारणे मज येत नाही

वागतो "केशवा" तू हावऱ्या गत
ह्या मुळे कोठे तुला मी नेत नाही

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २००७

विसावा-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल विसावा

कर जरा मालीश थोडे, तेल मी चोपून आलो
मी विसावा आज घेण्या, वेळ ही काढून आलो

वाढलेले केस मजला क्लेशदायक फार झाले
रेशमी हे पाश होते आज मी कापून आलो

काल दारू घेत बसलो साथ सारे धंद राती
तर्र, सगळ्या सोबत्यांना मग घरी सोडून आलो

तुंबलेल्या माणसांचे दुखः हे सांगू कसे मी
थांब थोडा वेळ तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का "केशवा" मित्राप्रमाणे
ह्या पहा कविता तरी ही आज मी पाडून आलो !

चाल का माझी अशी हळुवार आहे

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे

चाल का माझी अशी हळुवार आहे
(फाटलेली मागुनी सलवार आहे)

मस्तकी घेऊन शेण्या चालले ते
वास हा त्यांना अता छळणार आहे?

बदलल्या मी पत्रिकांच्या चौकटीही
लग्न का याने असे जुळणार आहे?

मी सुखाने दाबतो हो चरण तीचे
मोल त्याचेही मला मिळणार आहे

तो भला माणूस जो घाली विजारी
धोतराची कास ही सुटणार आहे

पाहिला मी सूर्य हा अंधारताना
सत्त्वरी पेला अता भरणार आहे

बंद कानांचीच भोके आज केली
काव्य तुज बहुधा सखे स्फुरणार आहे

व्यर्थ येथे कष्ट मी घेऊ कशाला?
जमिन जर मज आयती मिळणार आहे !

अक्षरांची मोडुनी सारी गणीते
"केशवा"ला काव्य का जमणार आहे?

गुरुवार, १ फेब्रुवारी, २००७

बऱ्याच वेळा...३

आमची प्रेरणा यादगार यांची कविता बऱ्याच वेळा

लपवून तोंड नंतर फिरतो बऱ्याच वेळा
आधी नको नको ते करतो बऱ्याच वेळा

तू काळजी किती ही घेशील गे परंतू
अंदाज तारखांचा चुकतो बऱ्याच वेळा

रस्तात ही अताशा असतो उजेड कोठे
एकांत हवा तसा मग मिळतो बऱ्याच वेळा

घालू नकोस आता बुरखा सखे पुन्हा तू
भलतीस साद मी ही देतो बऱ्याच वेळा

सवयी नुसार मी ही होतो जरा अधीर
तो चेहरा तुझा पण नसतो बऱ्याच वेळा

साऱ्याच बायका त्या नसतात एकट्या पण
नवरा तिथेच मागे दिसतो बऱ्याच वेळा

घेतात हात धुउनी मग लोक सर्व तेथे
नाजूक हात त्यांचा नसतो बऱ्याच वेळा

बिल फाडुनी पळाला कोणी तरी प्रवासी
फसवून "केशवा"ला हसतो बऱ्याच वेळा

चिमण्या-२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची गझल चिमण्या

त्या प्रेमिकाच माझ्या मजला कुटून गेल्या
आधी तश्या चुका ही माझ्या घडून गेल्या

समजायला मला ही झाला उशीर होता
माझ्या उचापती पण त्यांना कळून गेल्या

धरल्या मनात होत्या चिमण्या गृहीत साऱ्या
एका क्षणात मजला दुर्गा दिसून गेल्या

कुरबूर अवयवांची मी एकतोय आता
बुकलून पार मजला साऱ्या निघून गेल्या

केली अशी धुलाई जन्मात ना विसरणे
नक्षाच पार माझा त्या बिघडवून गेल्या

अस्थि-हिशोब जेव्हा करण्यास बैसलो मी
सगळ्याच सापळ्याच्या संख्या चुकून गेल्या

हे शब्द पाहिले अन् सुचलेच "केशवा"ला
पुन्हा विडंबनाच्या चकल्या पडून गेल्या

बुधवार, ३१ जानेवारी, २००७

सुचत नाही-2

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल सुचत नाही

मी इथे किती हे पेले रिचवुन बसलो
ही नजरच सांगे, टाईट होउन बसलो

देवळात जायचो भेटाया जीला मी
मी टिळा कपाळी तीच्या लावुन बसलो

सोबती मला ना आता लागे कोणी
बाटलीस माझ्या सोबत घेउन बसलो

संपले किती पेले ना मोजू शकलो
मोजदाद त्यांची शेवट चुकवुन बसलो

विसरलो कसा, वय नाही शृंगाराचे
आसनात चुकलो कंबर लचकुन बसलो

वाढल्या तनूचे ओझे ना पेलवले
आपल्याच वजनाने कर मोडुन बसलो

आकड्यात मोजे दुनिया कर्तृत्वाला
मी लगेच मटका येथे खेळुन बसलो

राहिले मुखी "केश्या"च्या दात कितीसे
उपटून तयानां कवळी बनवुन बसलो

मंगळवार, ३० जानेवारी, २००७

दीप आधी मालवावा लागतो

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल प्राण थोडासा जळावा लागतो...

दीप आधी मालवावा लागतो
मीलना काळोख व्हावा लागतो

तोल सांभाळायला आता मला
ग्लास हा पुरता रिचावा लागतो

ऊब येण्याला जरा थंडीमध्ये
पेग पतियाली भरावा लागतो

रंगते ना तोंड शाईने गड्या
कात पानामध्ये असावा लागतो

तोंड लपवायास का जागा हवी?
फक्त बुरखा वापरावा लागतो

दाबला आवाज मी येथे जरी
हाय वायूचा सुगावा लागतो

वागतो मी ही पतंगासारखा
फक्त हा मांजा तुटावा लागतो

ही कशी प्रीती? असे नाते कसे?
(दाम हा मोजून द्यावा लागतो)

टाकली माझी पथारी मी जरा
जेवणा नंतर विसावा लागतो

"केशवा"चे समजण्याला गीत हे
भाग डोक्याचा नसावा लागतो