एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, ३१ जानेवारी, २००७

सुचत नाही-2

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल सुचत नाही

मी इथे किती हे पेले रिचवुन बसलो
ही नजरच सांगे, टाईट होउन बसलो

देवळात जायचो भेटाया जीला मी
मी टिळा कपाळी तीच्या लावुन बसलो

सोबती मला ना आता लागे कोणी
बाटलीस माझ्या सोबत घेउन बसलो

संपले किती पेले ना मोजू शकलो
मोजदाद त्यांची शेवट चुकवुन बसलो

विसरलो कसा, वय नाही शृंगाराचे
आसनात चुकलो कंबर लचकुन बसलो

वाढल्या तनूचे ओझे ना पेलवले
आपल्याच वजनाने कर मोडुन बसलो

आकड्यात मोजे दुनिया कर्तृत्वाला
मी लगेच मटका येथे खेळुन बसलो

राहिले मुखी "केश्या"च्या दात कितीसे
उपटून तयानां कवळी बनवुन बसलो

मंगळवार, ३० जानेवारी, २००७

दीप आधी मालवावा लागतो

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल प्राण थोडासा जळावा लागतो...

दीप आधी मालवावा लागतो
मीलना काळोख व्हावा लागतो

तोल सांभाळायला आता मला
ग्लास हा पुरता रिचावा लागतो

ऊब येण्याला जरा थंडीमध्ये
पेग पतियाली भरावा लागतो

रंगते ना तोंड शाईने गड्या
कात पानामध्ये असावा लागतो

तोंड लपवायास का जागा हवी?
फक्त बुरखा वापरावा लागतो

दाबला आवाज मी येथे जरी
हाय वायूचा सुगावा लागतो

वागतो मी ही पतंगासारखा
फक्त हा मांजा तुटावा लागतो

ही कशी प्रीती? असे नाते कसे?
(दाम हा मोजून द्यावा लागतो)

टाकली माझी पथारी मी जरा
जेवणा नंतर विसावा लागतो

"केशवा"चे समजण्याला गीत हे
भाग डोक्याचा नसावा लागतो