एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २४ जून, २०१५

मी फसले ग फसले...

मी फसले ग फसले
तरीही बचावले

किती 'ललित' तो साधा भोळा
मी ओळखिले 'माणुसकी'ला
माझे मन कोणा ना कळले

जे गुपचुप होते केलेले
ते अवचित सामोरे आले
सारेच उफराटे घडले

आज एसिबी मम घरात आले...

आज एसिबी मम घरात आले
त्यास पाहुनी छगन हासले

आज माझिया 'सदन'घरांनी
मिडीयापुरी गेली भरुनी
परदेशांतिल ते सर्व विसरले

ज्या पक्षाच्या कणाकणांतुन
भरून राहिले हे 'साधे' पण
'फुले' विकून मी सर्व कमवले

कावा कावा अखंड रडूया...

कावा कावा अखंड रडूया
बामणी बामणी मुखे म्हणूया

युगपुरुष्यांची महात्मांची
उभी आडवी गुंफून नावे
पुरोगामी हे असल्याचे
जाळे विणिले खुप सरावे
एसेमेस तो बेनामी पहिला
वादारंभी त्यास स्मरूया

दाभोळकर अन पानसरेंचे
सनातनीच हे खुनी सांगे
फेकून वाक्ये वादग्रस्त ही
प्रसिद्धिच्या धावे मागे
धर्मांतर हा काढून मुद्दा
टिआरपीस या उंच करूया

करद्वयीच्या नाचावरती
मनघडीत ते मुद्दे मांडा
ओरडुनिया लोकांवरती
उरलीसुरली लाज सोडा
हिंदुत्वाचा दावित बडगा
सिक्युलरत्वाचे सूत्र धरूया

विदेशीच्या पिणाऱ्याला चढते ना फार ...

विदेशीच्या पिणाऱ्याला चढते ना फार
तोड नाही ओल्डमंका, ब्रांड खरा थोर

बालवयी चोरून प्यालो, तारुण्य झिंगले
वृद्धपणी घेतो आता फक्त पेगचार

डान्सबार नको मजला, नको फायुस्टार
नको चकण्याचा हि तो व्यर्थ भडिमार

चलाचला प्यायला हो जाहला उशीर
'ओल्डमंक' 'ओल्डमंक'.. ब्रांड खरा थोर

अर्थ"पूर्ण भासे मज हा घोळ कायद्याचा...

अर्थ"पूर्ण भासे मज हा घोळ कायद्याचा
कोर्ट न्याय निती सारा खेळ कल्पनेचा

वर्ष फक्त तेरा सरुनी निकालास द्यावे
बेल त्यावरी पण सत्त्वर सीलबंद व्हावे !
सर्व फार्स मज हा दिसतो न्यायमंदिराचा

हायकोर्ट लोभे त्याला लाभ स्थगितीचा
धाक फक्त सामान्यांना इथे कायद्याचा
वागणे न बिईंग ह्युमन मर्मभेद त्याचा

आम्हां नकळे न्याय ...

आम्हां नकळे न्याय न कळे निकाल ।
घटनेचें पिनल नकळे आम्हां ॥१॥

कायद्याची बोली नियमाचा भेद ।
वकिलांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

धन्य तो फर्लो आणिक पेरोल ।
नकळेची बेल क्लीनचिट ॥३॥

थोर गुंड नट नेते नि सधन ।
कायदा पालन त्यांना कोठे ॥४॥

"केश्या" म्हणे आता 'अर्थ' समजला।
कायदा अंधळा कशा पायी ॥५॥

न्याय तुला मिळणार ...

न्याय तुला मिळणार अम्हाला पूर्ण खातरी होती
भ्रष्ट व्यवस्था, धर्मावरती भिस्त केव्हढी होती !

घटनेच्या गर्भात उमगली पळवाटांची रीत
वकिलांची फौज जमवली नामी प्रस्थापित
विनापुरावा करतिल सुटका अशी जयांची ख्याती!

चिरडावे अन पळुन निघावे हेच तुम्हाला ठावं
बिइंग ह्युमन वरून म्हणावं हेच तुम्हाला ठावं
स्वार्थापायी विसरा तुम्ही माणुसकी अन नीती !