एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १३ जुलै, २००७

बदलले मी शब्द काही

आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम गझल जोडले मी शब्द काही

शेवटी पाहू विठोबा संपवूया प्रथम खादी
जीर्ण झाल्या मंदिरी या पसर तूही आज गादी

क्लिष्ट काही, शिष्ट काही, भेटले विशिष्ट काही
भेटले नाही जिहादी, भेटले ते साम्यवादी

का अश्या हीमेशच्या या जीवघेण्या भ्रष्ट चाली?
(भुंकत्या कुत्र्या पुढे ह्या टाक लवकर पाव लादी)

कोण आले? कोण गेले? जाल हे उद्ध्वस्त झाले
शेवटी राहून गेली केवढी सदस्यत्वयादी

वृत्त नाही, छंद नाही, "केशवा"ला काम नाही
बदलले मी शब्द काही, लागता तुमच्याच नादी

रविवार, २७ मे, २००७

ओल-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल ओल

अधी काय होते? अता काय केले?
बघा वाकुनी नीट मी काय केले

तसा दोष असतो सदाचाच माझा
तरी प्रश्न उरतो कुठे काय केले!

मला वेगळे खूप पर्याय होते
अता वाटते हाय मी काय केले!

जरा जास्त हा आज आवाज आला
तुम्हाला समजलेच मी काय केले!

मला श्रेय मिळते सदा हे बुर्‍याचे
असे नेमके मी अधी काय केले ?

तुझा चेहरा का असा आज झाला?
कळेना जगाला कुणी काय केले!

तुमानीस का ही तुझ्या ओल आहे?
विचारू नका "केशवा" काय केले!!

-- केशवसुमार

मज उन्हाळा सोसतो ना

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची गझल ना उन्हाळा भोगला मी

मज उन्हाळा सोसतो ना फारसा...
भाजुनी झालोय मी बघ कोळसा...

'हात' अमचा नेहमीचा सोबती
सांग का ठेवू कुणावर भरवसा?

रोज मी गर्दीत येथे पाहतो
रेटतो माणूस येथे माणसा...

गाल का गेला सुजूनी आज हा?
हा कुणाच्या सांग हाताचा ठसा?

आयता अंधार सारा भोवती
चांदण्याचा हा कशाला कवडसा?

लोकहो, इतके तरी सांगा मला
"केशवा"ला मी इथे टाळू कसा?

-केशवसुमार, माकल्सफिल्ड

बुधवार, २३ मे, २००७

हवी आहे एक छबकडी..

गेल्या काही दिवसात मनोगताचे कुरुक्षेत्र करणाऱ्या सर्वसाक्षीयांच्या उडत्या छबकड्यांनी आमच्याही मनात वादळ उठवलं. पण कुरुक्षेत्रा वरचा रणसंगार पाहून प्रतिसाद कसा द्यावा ह्या विचारात असतानाच आमचे परमस्नेही जयंतरावांची हवं आहे एक आभाळ! ही अप्रतिम कविता वाचनात आली आणि आमच्या विमानप्रवासाच्या सुप्त इच्छा शब्दरूप घेऊन कागदावर उतरल्या.

हवी आहे एक स्मितसखी
कपड्याची अट नाही.
अगदी वीतभर किंवा चतकोर असले तरी चालेल!

हवी आहे एक बाहुली
कुठल्याही देशाची अट नाही.
अगदी भारतीय दिसली नाही तरी चालेल!

हवी आहे एक 'मधुमक्षिका'
अट फक्त एवढीच.
ती सुस्मिता असावी!
अगदी संपूर्ण प्रवासात एकदा जरी हसली तरी चालेल!
त्या हसण्याने
काही खडूस चेहऱ्यांनी
इंग्रजी वर्तमानपत्रातून असूयेचा नजरेने बघितले तरी चालेल!

कारण विमानतळावरची गर्दी. कोलाहल,गचाळ व्यवस्थापन, लांबलचक रांगा, ताटकळणे, तपासणीन
ेथकून गेलेल्या ह्या जीवाच्या
सुकलेल्या घशात
मार्टिनीचे दोन थेंब पडावे
एवढीच इच्छा!

हवी आहे अशी एक छबकडी
तातडीने!
अगदी माझ्या बोलण्याने चक्क लाजली आणि धूम पळाली तरी चालेल!

मंगळवार, १० एप्रिल, २००७

हातघाई चालली आहे...

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल लढाई चालली आहे...

प्रेमिकांची बघ धिटाई वाढली आहे
बाकड्यांवर हातघाई चालली आहे...

छापण्या नाकारती हे लेखणी माझी
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )

हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!

डोंगराच्या पायथ्याशी चालल्या पार्ट्या
कोण म्हणे आता 'पुण्या'ई राहिली आहे!

जायचे तेथे स्वतःची बाटली नेते
येव्हढी ही काय बाई बेवडी आहे...

बंद झाले बार सारे बारबालांचे
(पोलिसांची बघ कमाई थांबली आहे!)...

"केशवा"चे काव्य वाचुन हे म्हणाली ती
आज का माझी धुलाई चालली आहे

सोमवार, ९ एप्रिल, २००७

लेखकांचे पाय कायम ओढणारा

आमची प्रेरणा माफी यांची गझल रूपकांच्या ओढण्यांना ओढणारी

लेखकांचे पाय कायम ओढणारा
टाचणी कविता-फुग्यांना लावणारा

मद्य, मदिरा, मद्यालयावर लिहिणारा
वृत्तही केव्हा तरी सांभाळणारा

सख्त टीकेने कधी ना झोडणारा
पण जरा तिरकस स्तुतीने मारणारा

थंड रक्ताने विडंबन पाडणारा
वेळकाढू भांडणे ही लावणारा

राग येण्यासारखे हा वागणारा
'माफी'चेही भान "केशव" ठेवणारा

-केशवसुमार.

मंगळवार, ३ एप्रिल, २००७

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुंदर गझल झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे
कळले खरे तिचे हे रुपडे नवे मला रे

खाण्यात केस लागे, खाण्यात 'चोर' लागे
गिळतात चावल्याविण नवरे बघा बिचारे

माझ्या घरात मजला बोलायचीच चोरी
मजला कशास म्हणता जोरात बोल ना रे

बाया अनेक आल्या जमले न काम कोणा
धूतो घरात कापडे मी रोज का उगा रे

हसतात लोक हल्ली पाहून रोज मजला
तिन्हीत्रिकाळ असती माझ्यावरी पहारे

जावे जरा कुठे मी शोधात संपदेच्या
दिसतात बायकोच्या डोळ्या मधे निखारे

निर्धास्त देवतांनो, अमृत न मागतो मी
बस, एकदा बयोचे काळीज द्राववा रे

सांगू नकोस दुखडे "केशवा" जगाला
हसतील फक्त तुजला निर्लज वाचणारे

-केशवसुमार