एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

कठिण कठिण कठिण किती...

कठिण कठिण कठिण किती बेला हे बाई ।
ते खाण्याप्रति झटता दंत उरत नाही ॥

भाजुनि तूपात मधुर ठिसूळ भासती ।
खात खात फसवुनी दंतस्थान सोडिती ॥

बेलांचे सुंदरसे चित्र टाकती ।
बघत बघत परि शेवटि सुचत गीत जाई ॥

नमन झुक्याला फेसबुकेश्वराला...

Sandhya Soman यांच्या अप्रतिम नांदी (https://www.facebook.com/gappisht/posts/10201728248799861) वरून
आम्हाला सध्या सर्वत्र सुरु असलेल्या भिंतनाट्याची नांदी पुढेमागे लिहायची वेळ आली तर ती कदाचित अशी लिहिली जाईल असं वाटते ...

नमन झुक्याला फेसबुकेश्वराला
भिंतनाट्याच्या आदिशक्तीला || धृ ||

तूच हास्य अन् लास्य स्वतःचे
तूच गीत गुणगान स्वतःचे
तूच स्टेटस तूच नोट अन्
तूच पेज तू स्तुतीसोहळा ||१||

कंडु-साहित्यिक तुज आचरती
मिळे समीक्षका फुकटच कीर्ती
सारे दुर्मती सजवती भिंती
धर्मजात दे त्रास जगाला || २ ||

---------केशवसुमार.

(दिवा)...

आमची प्रेरणा Pradeep Kulkarni यांची अप्रतिम रचना 'दिवा' (https://www.facebook.com/pradeep.r.kulkarni/posts/10151801021258924)

.........................................................
(दिवा)
.........................................................

गुत्यात या जवळच्या दारावरी उभा मी...
हलकेच सांज येई उतरून भोवताली
चोहीकडे दिवे हे अंधूक लावलेले...
अन संथ, धुंद होती गाणी हि लावलेली ...!

धड सांजवेळ नाही, धड रात्रही न पुरती...
मधलीच वेळ हॅपी आवर्स चाललेली ?
काळोख अर्धमुर्धा चोहीकडे तरंगे...
ह्या रम्यकल्पनेनी गात्रे तरारलेली...!

होणार नृत्यचालू घंटा अशात वाजे...
काळोख-धूर तेथे जमला कणाकणाने...
हळुवार नादलहरी...हलकी प्रकाशवलये
उठती क्षणाक्षणाने...विरती क्षणाक्षणाने...

मी ही अशा क्षणी मग घेतो भरून पेले !
हुरहूर कोणती ना माझ्या उरात दाटे
आलो इथे कशाला, आलो इथेच का मी ?
काहीतरी बरे मज येथेच फक्त वाटे !

कुठली अनाम मदिरा येते...रिचून जाते
...काळोख वाढलेला बाहेर-आत आता
कोणामुळे कळेना अजुनी असा उभा मी...
जुळले तरी न जुळती माझेच हात आता!

जाणीव-नेणिवेचा हा खेळ चाललेला...
मज भोवताल सारा अंधुक होत जाई...
मीही दिवा जणू ह्या क्षितिजात सोडलेला...
हलकेच शुद्ध माझी सोडून दूर जाई !

- केशवसुमार

(आठवणींचा अवरोह ----)

Joshi शेठची सुंदर कविता (https://www.facebook.com/uday.joshi.967/posts/10200994666929395) वाचून आम्हाला आमच्यावर गुदरलेला एक गंभीर प्रसंग आठवला..

आमच्या हि आठवणींचा अवरोह ----

लागुनी टोक अंधुकसे
विलगली नको त्या जागे
उसवले नकळत तेव्हा
ह्या घट्ट जीन चे धागे ....

हदरून जरासा गेलो
घेतले प्रभूचे नाव
गंभीर अवस्था आणि
त्यावर ओळखिचा गाव ....

अवतरली तिन्हीसांजा
बसलो मी निश्चलतेने
अंधार पडू लागता
वाचवले काळोखाने ....

कुणी शेजारून जाताना
अति विस्मयतेने बघते
अन पापण्यांत सर्वांच्या
हलकेच हासणे कळते ....

डुचमळतो आठवणींचा
त्या गर्दसावळा डोह
उमटून तळातून येता
कधी गंभिरसा अवरोह ....

केशवसुमार.

कलात्मकता म्हणा, मुलांनो, कलात्मकता म्हणा...

आमची प्रेरणा उठठेवीवर Upadhyeशेठनी टाकलेले धाडसी कलात्मक फोटो

फोटो बघुनी स्टेटस सुचते करू जुनी वल्गना
कलात्मकता म्हणा, मुलांनो, कलात्मकता म्हणा
प्रस्तरारोहण कल्याणम्‌, प्रस्तरारोहण कल्याणम्‌

अवघड डोंगर निर्भय तरुणी
उभी नग्न प्रस्तरारोहणी
कोनाकोनातुन तिच्या या दिसती यौवनखुणा

या फोटोंतील पहा संपदा
कुणा न वाटो यात आपदा
नग्न दृष्टीचा विनाश होता कला दिसे सृजना

दिव्य दिव्य हा स्तेटस्कार
टाकी धाडसी फोटो फार
सेमीचावट स्टेटस याचा रिवाज आहे जुना

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

दुर्गा..

मीरा सिरसमकर ह्यांची दुर्गा ( https://www.facebook.com/meera.sirsamkar/posts/524740960935905 ) ही कविता वाचून आम्हाला आमच्या गल्लीतील दुर्गा आठवली

दुर्गा

हलके हलके चालत गेलीस
रस्त्यावरच्या रेषेवरती ,
सर्कशीतली जशी डोंबारीण
चालत असते दोरीवारती .

शुद्ध नसे सुसंबद्ध नसे
तरी टाकीत गेलीस चारपावले ,
पायतळीचे बळ ओळखले
नजर आमुची माथ्यावरती .

नाद न सूटला वाद जगाशी
उधळायाचे स्वप्न उराशी ,
करता करता तुडवित गेलीस
असंख्य गुत्ते पायतळाशी !!

------ केशवसुमार .
( दै . फेसबुक , १० ऑक्टोबर २०१३ )

विश्वाचे मर्म ब्लॉगावरी प्रकाशले ...

आमचे परम जालस्नेही श्री श्री कऱ्हाडेशेठ ह्यांनी आज भर दुपारी आम्हाला पिंगले ..थोड्याच चर्चे नंतर त्यांना 'सरो'निया झाला आहे हे आमच्या लक्षात आले... मी सांत्वनाचे दोन-चार शब्द बोलणार इतक्यात त्यांनी आम्हाला एक फर्मान सोडले...

Joshiउर्फ चिंगीकाकूंची हि पोस्ट वाचा https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/589472107781981/)... आणि विश्वाचे आर्त (http://www.aathavanitli-gani.com/Song/Vishvache_Aarta) ह्या गाण्याचे विडंबन लिहा..

मी म्हटलं आहो मी वर्साला कार्यालयात आहे...तर ते परत डाफरले... रोज बघतोय तुमची कार्यालयातील कार्ये इथेच उठठेवीवर ...

मग नाइलाजाने आम्हाला त्यांच्या आज्ञेचे पालन करावे लागले... पण वर्साच्या कार्यालयात मिटिंग मिटिंगचा खेळ सुरु असल्यामुळे, विडंबन लिहून झाल्यावर नेहमीप्रमाणे मोठ्यांदा गुणगुणता येईना... तेव्हढ्यात आमचे गाणाराडॉक्टर Patilशेठ रेघेवर आलेले दिसले ... त्यांना विडंबन मोठ्यांदा रेकून बघायची विनंती केली ... आणि त्यांनी ती तत्पर स्विकारली ... काही ठिकाणी मात्राभंग आहे... पण 'सरांपुढे कोणाचीच मात्रा चालत नाही' ...असे प्रस्तावनेत लिहा मग कोणी मात्राभंगाच्या दोषाकडे बघणार नाही असा त्यांनी दिलासा दिला...तुम्हाला त्रास झाला तरी श्री श्री कऱ्हाडेशेठ ना थोडा आराम मिळेल ...म्हणून हे विडंबन इथे द्यायचे धाडस केलं ...

विश्वाचे मर्म ब्लॉगावरी प्रकाशले ।
अवघे चि झालें लोक धन्य ॥१॥

अवकाशेताण खंडामधे विभागणे ।
नवल देखिलें ऋणात्मक गे माये ॥२॥

बाप भौतिकशास्त्रवरू अदितीस भेटला ।
उठाठेवी दाविला 'सरा'कारें ॥३॥