जुन्या विडंबनात काही बदल करून
कमळाला जड झाले नाते धनुष्यबाणाचे
नि वाटप अडले "खात्या"चे
मित्रांनी सहज उचलिले धनू युतीबळाचे
पूर्ण जाहले जनतेच्या ही हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य बहुमत समोर सगळ्यांचे
धुर्त घड्याळी दुरून न्याहाळी सैन्य धनुर्धारी
सपोर्ट देऊन दुबळी केली शिवशक्ति सारी
कळू लागले गुपित हळू हळू दादांना घेण्याचे
उंचावुनिया जरा मागण्या सेना ही पाही
तडिताघातापरी भयंकर नाद 'नाही' होई
कमळाने सांगितले आकडे जाग जिंकल्याचे
मावळल्या सगळ्या आशा , अन रुसले राजे
फक्त हसले, आणिक गेले गावी ते जे
सुरु जाहल्या नाराजी चर्चा खलबत सुत्रांचे
हात सोडुनी म्हणे कमळ मग सेनाप्रमुखासी
"आजच करतो संपर्क मी इतरही मित्रांशी"
आनंदाने खुलले डोळे घड्याळ प्रमुखांचे
धमकीने त्या आले भरभर तापातून भेटी
अधिक मागती, अधिकच्या मग वाटाघाटी
गृहखाते ही हवे अम्हाला मंदिर मलिद्याचे
वेशीवरती जसा भरावा ढोरांचा बाजार
तसा चालला 'सागर'तीरी 'खाते' व्यापार
पडद्यामागे मीलन झाले 'माया'-ब्रम्हाचे
झुकले थोडे ते हि, हे हि ठरला व्यवहार
टिव्हीवरती नेते करती युतीचा उच्चार
'जादा खाती' पदरी पडले दान रुसण्याचे
लाज, तत्त्व ही सोड, सर्व तू सत्तेच्या करता
फक्त येव्हढे कळले "केश्या" हे नाटक बघता
कमळाला हे नडले सैनिक धनुष्यबाणाचे