एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती !

शूर अम्ही सरदार अम्हाला लाज न कसली भीती ! देव, देश अन्‌ जनतेसाठी केली आम्ही युती!

ईडीच्या गर्भात उमजली बंडाची ही रीत
कमळाशी लगिन लावलं अता आम्ही निश्चिंत
खुर्चीसाठी टोप्या बदलू अशी आमची ख्याती!
जिंकावे वा लढून मरावं हे न अम्हाला ठावं
मांडवली ही करुन जगावं हेच अम्हाला ठावं
सत्तेपायी सारे विसरू तत्वे धोरण -निती!

जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे

जीवनात ही 'घडी' अशीच राहु दे कमळाच्या फुलाकडे 'अजित' जाऊ दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला पक्ष खेळणे
पक्षाचा पाठिंबा मुलीस लाभु दे
मुळात मला गुगलीचा छंद आगळा
खेळींचा त्या माझ्या अर्थ वेगळा
जोडतोड करून मला धुंद होउ दे
येऊ दे असेच मला स्वप्न कैकदा
होऊ दे पिएम मला फक्त एकदा
स्वप्नातच या मजला धन्य होउ दे

जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा ।

जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा । गमे या भ्रान्त संसारीं । ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥

अशा या विविध रंगाच्या । 'मिश्यां' च्या लहरबरळींनीं ।
दुरंगी जाल दुनियेची । भिंत ही रंगली सारी ॥

चल रे सख्या चल रे सख्या चौकशीला

चल रे सख्या चल रे सख्या चौकशीला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे सत्ता तिथे चेव
चल टाळू इडी अन् आयटीला
दिनदयाळ मर्गाच्यावर
मंदिर भाजपचे सुंदर
दोघे आहे उभे दारावर
जोडुनी दोन्ही कर तत्पर
ते पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन शामोंच्या मूर्तीला
भाजपच्या दारी कुणा ना बंदी
इडी पीडित होती आनंदी
दुर्जन होती भक्तीचे छंदी
आली चालून छान ही संधी
तू सोडून दे 'हात', धरू कमळाची ही वाट
पाहू डोळे भरुनी जगजेठीला
वाली सीबीआयचा दिल्लीत
दर्शन घेऊ जोडुनी हात
तो देईल 'चौकशी' साथ
नांदू 'संसदी' नंतर सुखात
तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार
आज 'विकासा'च्या हाकेला

शक्यता

आमची प्रेरणा  

1.

समग्र
निवडणूक रोख्यांची गाथा
लिहायची,
खरीखुरी, तर,
निव्वळ नागडं
व्हावं लागेल,
कुणालाही.
खरंतर, प्रत्येकालाच.
सबब,
भयग्रस्त सकलजन
आवरणबद्ध.
आरटीआयसुद्धा
कायद्याच्या टणक बंदोबस्तात,
कडेकोट !
-O-
2.
काल रात्री
अंधारलेल्या गल्लीत गाठून
काही बातम्यांना
गळा घोटून ठार मारलं मी.
आज,
कदाचित,
मला झोप लागेल
शांतनिवांत.
-O-
3.
प्रचार संपला
म्हणून प्रचार संपत नाही.
निवडणूक संपली
म्हणून निवडणूक संपत नाही.
सर्वसंहारक मतदान घडून गेलं,
म्हणून कुणाचंच महाभारत संपत नाही.
सरकारस्थापनेनंतरही
शक्यतांच्या हजार शक्यता असतात,
त्यांचं काय करशील ?
-O-
- केशावसुमार.