एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

दादोबा दादोबा चिडलास का?

आमची प्रेरणा दादांची मनधरणी ...
दादोबा दादोबा चिडलास का?
कमळाच्या फुलामागे लपलास का?
कमळाचे फुल संघवादी,
काकांच घड्याळ राष्ट्र्वादी!
ताई-काकांवर रुसलास का?
असाच एकटा गेलास का?
आता तरी परतुनी येशील का?
काय हवं तुला ते सांगशील का?
ताई बिचारी रडत बसेल
काकांचा पारा चढत असेल!
असाच बसून राहशील का?
काकांची बोलणी खाशील का?
दादोबा, दादोबा कुठे रे गेलास?
दिसता दिसता गडप झालास!
काकूला तरी 'हो' म्हणशील का?
ऐनवेळी राजीनामा देशील का?

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

रात्रीस खेळ चाले...

रात्रीस खेळ चाले सरकार स्थापनेचा
समजेल ना कधीही हा खेळ बेरजांचा ..
'धनुबाण' ना स्वयंभू 'घडी' 'हात' जोडतो हा
सत्तेत हक्क अर्धा 'कमळा'स मागतो हा
ऱ्हासास होय साक्षी सैनिक 'सायबां'चा
आभास बातम्या हा.. नसतो खरा प्रकाश
जे सूत्र सांगती ते असती नितांत भास
फसतात बातम्यांना हा दोष वाचकांचा..
या लाजिर्‍या क्षणाला ना पाहवे दिठीत
धरणात मुतणारे कमळासवे मिठीत
अपमान चालला हा जनते तुझ्या मतांचा..

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

स्टेटस...

https://www.facebook.com/vijay.tarawade/posts/560183077389399?comment_id=3160763637331317&notif_id=1574130059602289&notif_t=feed_comment_reply

स्टेटस


स्टेटस असतात कधी साधी
रत्यावरच्या शिवीसारखी
स्टेटस असतात कधी बोल्ड
भलतीच, चक्क ओवीसारखी

कधी असतात आरस्पानी
पण बरीशी फसलेली
कधी अर्धपारदर्शक
आतबाहेर असलेली

अमुकवादी तमुकवादी
कोशामध्ये बसलेली
क्लिष्ट होऊन स्वतःवर
यावर त्यावर रुसलेली

काही तरी मागणारी, काहीच न देणारी,
कोड्यात पाडणारी,गरळ ओकणारी,
अर्थांना निरर्थक शब्दांच्या नादी लावणारी
वात्रटिकेसारखी खोचक, शिवीसारखी कडक

साधे स्टेटसच आवडत नसेल तर
आपलं काही चुकत नाही ना?

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

दिवस आजचा असाच गेला ...

आमची प्रेरणा महाराष्ट्रातील आजच्या राजकीय घडामोडी आणि शांता शेळके यांची लावणी 'दिवस आजचा असाच गेला ...' https://www.aathavanitli-gani.com/…/Divas_Aajacha_Asach_Gela
दिवस आजचा असाच गेला आता तरी द्याल का?
काका अहो, पत्र मला द्याल का?
भगवा फेटा डोक्याला बाधुनी
मी वाट पाहिली 'मातोश्री' बैसुनी
ही घडीमागुनी 'घडी' जातसे सुनी
राजभवनी लागले डोळे; फॅक्स धाडाल का?
कितीकिती योजिले होते बोलायचे
मागचे बोलणे होते विसरायचे
संगतीत तुमच्या होते बहरायचे
'पोळ्या' आजच्या शिळ्या जाहल्या वाटाया न्याल का?
या सरत्या राती तळमळतो मी किती
वाटते पलंगी उगा मोडली युती
मज हसे जमाना, नको नको ती भिती
उद्या तुम्हाला चान्स मिळाला , 'मामु' कराल का?
अघाडीमध्ये, वचन मला द्याल का?

पुन्हा एकदा भोलानाथ...

पुन्हा एकदा भोलानाथ...🐮🐂🐮


सांग सांग भोलानाथ, सरकार बनेल काय?
अघाडीच्या सपोर्टावर सेना तरेल काय?

भोलानाथ ऐनवेळी शहा येतील काय?
मंत्री हळूच फोडताना आवाज होईल काय?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
राष्ट्रपती राजवट लागेल का रे यंदा?

भोलानाथ आज आहे पवारांचा पेपर
'मुख्यमंत्री सेनेचाच' वाटेल का रे साखर?


रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

सांग सांग भोलानाथ, कमळ तरेल काय?

सांग सांग भोलानाथ, कमळ तरेल काय?
सेनेमध्ये फूट पाडून बहुमत मिळेल काय?
भोलानाथ घड्याळाची साथ लाभेल काय?
घोटाळ्यांच्या चौकशीत गजर होईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
विदर्भाचे वेगळे राज्य जमेल का रे यंदा?
भोलानाथ परवा आहे विश्वासाचा पेपर
विधानसभी पास होऊन वाटेन का मी साखर?

सांग सांग भोलानाथ ....

पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा ....
सांग सांग भोलानाथ, सेना नमेल काय?
राऊतांना काही दिवस सुट्टी मिळेल काय?
भोलानाथ इडी आता कमी येईल काय?
नोटीस हळूच देताना आवाज होईल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
पाच वर्षात मुख्यमंत्री बदलतात का रे दोनदा?
भोलानाथ आता आहे बहुमताचा पेपर
फिफ्टी फिफ्टी लाईफलाईनचा करवा का वापर?