एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

केजरीच्या झाडूनी...


केजरीच्या झाडूनी, आणि साध्या मफलरनी
दिल्लीमध्ये बाक माझा काढीला
दोष नगा लावू शा.मो. जोडीला !

नवी कोरी कुर्ती लाखमोलाची
भरली मी नक्षी नमोनामाची
बोलवला ओबामा, ओबामा ही भेटीला
दोष नगा लावू शा.मो. जोडीला !

जात होतो वाटंनं मी तोर्‍यात
अवचित आला झाडू फार्मात
आणि माझ्या लाटेचा फुगा त्यांनी फोडीला
दोष नगा लावू शा.मो. जोडीला !

गेम मी केली लई डोक्याची
बदलली व्यक्ती मी ही मोक्याची
स्केपगोट म्हणुनी मी, आणिले हो बेदीला
दोष नगा लावू शा.मो. जोडीला ! !

काय बाई सांगू ?...

काय बाई सांगू ?
कसं ग सांगू ?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज !

उगी निवडल मी हे 'फूल'
उगिच 'सीएम'ची पडली भूल
त्या रंगाचा, त्या चिन्हाचा
अंगावर मी ल्याले साज
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी जुने हो आम्ही मेट
लढत राहिले त्याला थेट
'आय ए सी'ची पोर कशी मी
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

अजब बोलले फसले मी
मलाच हरवुन बसले मी
लाट अनावर झाडूची ही
नाही चालला 'शाही' इलाज
काही तरी होऊन गेलंय आज !

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५

शेवट थोडा बदलावा...

तुझी आठवण गाला वरती मिरवावी ?
नको जगाचा त्रास उगाचच...खोडावी !

बरेच झाले, आड मार्ग तो सापडला...
ती अंधारी -वाट कशाला चालावी?

कधीतरी येईल वाटते बाप तुझा...
या भीतीने भेट कशी मग रंगावी !

कोणी ही नसतात तिथे, जाऊ आपण...
जिथे पावले दाराशी ना थबकावी

रोज झोपतो भर दिवसा मी यासाठी...
दिवसा मज विश्रांती थोडी भेटावी

नको व्यर्थ ही धडपड आता शब्दांची...
तुला 'मुक्यां'ची भाषा केवळ समजावी...

या गोष्टीचा शेवट थोडा बदलावा...
चावट जरी ही कथा; सात्विक वाटावी !

एक धागा सुताचा, शंभर धागे मलमलचे...

एक धागा सुताचा, शंभर धागे मलमलचे
जरतारी हे वस्‍त्र घडवले तुझिया अडनावाचे

पांघरसी जरि असला कपडा
माध्यमांपुढे, पडसी उघडा
कपड्यांचे हे करिसी नाटक, तीन प्रवेशांचे

शाल केशरी विमानतळाची
'नामांकित' ती चहाचर्चेची
राष्ट्रपतीच्या घरी शेवटी, लेणे जोधपुरीचे

या वस्त्रांना शिवतो कोण ?
बिले तयांची भरतो कोण?
कुणा न कळले गुपित हे कधी प्रधान सेवकाचे