एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १० एप्रिल, २००७

हातघाई चालली आहे...

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल लढाई चालली आहे...

प्रेमिकांची बघ धिटाई वाढली आहे
बाकड्यांवर हातघाई चालली आहे...

छापण्या नाकारती हे लेखणी माझी
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )

हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!

डोंगराच्या पायथ्याशी चालल्या पार्ट्या
कोण म्हणे आता 'पुण्या'ई राहिली आहे!

जायचे तेथे स्वतःची बाटली नेते
येव्हढी ही काय बाई बेवडी आहे...

बंद झाले बार सारे बारबालांचे
(पोलिसांची बघ कमाई थांबली आहे!)...

"केशवा"चे काव्य वाचुन हे म्हणाली ती
आज का माझी धुलाई चालली आहे

सोमवार, ९ एप्रिल, २००७

लेखकांचे पाय कायम ओढणारा

आमची प्रेरणा माफी यांची गझल रूपकांच्या ओढण्यांना ओढणारी

लेखकांचे पाय कायम ओढणारा
टाचणी कविता-फुग्यांना लावणारा

मद्य, मदिरा, मद्यालयावर लिहिणारा
वृत्तही केव्हा तरी सांभाळणारा

सख्त टीकेने कधी ना झोडणारा
पण जरा तिरकस स्तुतीने मारणारा

थंड रक्ताने विडंबन पाडणारा
वेळकाढू भांडणे ही लावणारा

राग येण्यासारखे हा वागणारा
'माफी'चेही भान "केशव" ठेवणारा

-केशवसुमार.

मंगळवार, ३ एप्रिल, २००७

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुंदर गझल झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे

झाले जुने जसे हे नाते जरा इथे रे
कळले खरे तिचे हे रुपडे नवे मला रे

खाण्यात केस लागे, खाण्यात 'चोर' लागे
गिळतात चावल्याविण नवरे बघा बिचारे

माझ्या घरात मजला बोलायचीच चोरी
मजला कशास म्हणता जोरात बोल ना रे

बाया अनेक आल्या जमले न काम कोणा
धूतो घरात कापडे मी रोज का उगा रे

हसतात लोक हल्ली पाहून रोज मजला
तिन्हीत्रिकाळ असती माझ्यावरी पहारे

जावे जरा कुठे मी शोधात संपदेच्या
दिसतात बायकोच्या डोळ्या मधे निखारे

निर्धास्त देवतांनो, अमृत न मागतो मी
बस, एकदा बयोचे काळीज द्राववा रे

सांगू नकोस दुखडे "केशवा" जगाला
हसतील फक्त तुजला निर्लज वाचणारे

-केशवसुमार