एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ४ सप्टेंबर, २००७

भांड

आमची प्रेरणा मृण्मयी यांची सुरेख कविता भांडं

"...चर्चेत भांडावं लागायचंच,
त्यात काय मोठंसं?"
गुळगुळीत, क्लिशे बनलेले प्रतिसाद
बहुतेक क्लिशेंप्रमाणे
- काही प्रमाणात.

नसेलही त्यात काही मोठंसं
पण प्रत्येक वेळी भांडण हवंच
कधी लहानकधी मोठं
कधी कायमचे
चर्चेचे स्वरूप बदलणारे,
चर्चा रंगवणार.

प्रतिसादांची संख्या वाढत जाते
अपरिहार्यपणे
आणि एक दिवशी चर्चेचा मूळ विषय
ओळखू येईनासा होतो
तरी ही हिंमत कर
नवं भांडण करण्याची
...नवी चर्चा घेण्याची...

तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो

आमची प्रेरणा माफी यांची मार्मिक मुक्तक तिच्या वागण्याचा मला त्रास होतो
तिच्या मागण्यांचा मला त्रास होतो
तिला जिंकल्याचा खुळा भास होतो
कशी शत्रुता मीच केली स्वतःशी
पती होऊनी मी तिचा दास होतो !

-केशवसुमार

(मुक्ती)

कशा माझ्या अताशा थांबल्या त्या मैफिली साऱ्या
तश्या त्या जायच्या जागा जरा थोड्या जुन्या झाल्या
भरारी घेत काळाची पहा गेली कुपी कोठे
सुखाच्या कल्पना आता पहा नवनव्या आल्या

कसे ते स्कर्ट होते, टॉप होते, पँट ही होत्या
जगाला सर्व समजावे अशा त्या सैलही होत्या
कळावे पण कुणाला चाललेल्या त्या खुळ्या गोष्टी
तश्या त्या वागताना जराश्या स्वैरही होत्या

मुखाला फासलेला लेप रंगाचा झळाळावा
जरासा अत्तराचा मोगऱ्याच्या गंध लाभावा
पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
हळू मग एकएका सांगती आता घरी जावा

दिवास्वप्नातही येतात नंतर त्या मनोहारी
कसा अजून बुडेना सूर्य हा ही आज अंधारी
नभाच्या सांजरंगांचा पिसारा लोपल्या नंतर
बघा येतील आता त्या पुन्हा आनंद बाजारी

कशी कळली तिला रे आज माझी सर्व ही थेरे
तिच्या डोळ्यातल्या ज्वाळा, तिच्या पायातली शक्ती,
लपाया आसरा ना वादळापासून ना थारा
कशी मिळणार रे "केश्या" तिच्या पासून तुज मुक्ती

--केशवसुमार
(३ ऑगस्ट २००७,
आषाढ कृ ५, शके १९२९)

...चोरी घरात झाली!

आमची प्रेरणा पुन्हा एकदा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता ...पोरी वयात आल्या !

चोरी घरात झाली...!

चोरी घरात झाली, झाली घरात चोरी !
खाली करून गेला सगळी बघा तिजोरी !

होत्या समस्त नोटा त्यांनी लुटून नेल्या
माझीच का तिजोरी लुटलीस सांग मेल्या
छाती पिटून घेतो, लाला अता किशोरी....!

दिवसा दिसून आले लालास आज तारे
देहातले निघोनी गेलेत त्राण सारे
अंधार दाटलेला होता तया समोरी !

पैसेच फक्त तुजला होते हवेहवेसे...
लाला जनास केले तू ही नकोनकोसे...
अन्याय खूप केले होतेस तू अघोरी !

भलताच हा बिलंदर दिसतोय चोर मजला
मज वाटले जसे की रॉबिन हूड आला
सोडून खूण गेला अरसा तिथे बिलोरी !

***
थोडे जपून लाला वागायला नको का ?
झोपेतही जरासे जागायला नको का ?
...याच्यामुळेच आली हाती तुझ्या कटोरी !

***
...चोरी घरात झाली... झाली घरात चोरी !

- केशवसुमार

(बदल)

आमची प्रेरणा अजब यांची कविता बदल

दुरून ते घर
बहुतेक तेच असते...

घरात बहुधा
दुसरे कोणी दिसते...

आजू बाजूला
येतो-जातो, बघतो...

"केश्या" घराचा
पत्ता चुकला असतो...

(पोरी वयात आल्या...!)

`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे पाहुणे-सदस्य....या सगळ्यांन तर्फे प्रदिपराव आपलं मनोगतावर स्वागत ..!
........................................................
आपली सुरेख कविता ...पोरी वयात आल्या ! वाचून आम्हाला ही काही ओळी सुचल्या

(पोरी वयात आल्या...!)
पोरी वयात आल्या, आल्या वयात पोरी !
फिरती घरावरूनी गल्लीतले टपोरी!

होत्या कभिन्न काळ्या आता नटून आल्या
रंगात कोणत्या या रंगून आज आल्या
आल्या पहा बसुनी या नाभिके समोरी....!

या चालतात तेव्हा न्याहाळतात सारे
या बोलतात तेव्हा पण तोडतात तारे
आहे जरी तयांची पाटी खुशाल कोरी !

त्यांना सदाच वाटे सारे हवेहवेसे...
यांच्यामुळे कुठेही होई नकोनकोसे...
कंठात प्राण येतो, येताच या समोरी !

बघ हासतोय नुसता ह्याला न लाज थोडी
"केश्या" विडंबनाची रे थोडक्यात गोडी
अवरून घे अता तू प्रतिभा तुझी छिचोरी !

***
तू ही जपून थोडे खरडायला नको का ?
"केश्या" तुला तरी हे समजायला नको का ?
...मिळतो न न्याय येथे पसरून नको कटोरी !
***

...पोरी वयात आल्या...आल्या वयात पोरी !

-केशवसुमार

भय मल्हार

काही दिवसांपूर्वी कुणीतरी 'मला आवडलेले मनोगती लिखाण' अस एक टूमण काढलं होते..ते अजून ही आमच्या डोक्यात (?) घोळत होते. आपल्याला आवडलेले लेख ठरवणे म्हणजे जुने लेख/ कविता शोधून वाचन आलं. ते करताना अनुताईची जागतिक भूत महासभा(जा.भू.म.) पुन्हा वाचली. जा.भू.म. च भूत अजून उतरलं नव्हत आणि मृण्मयी यांची सुरेख कविता रुद्र मल्हार आमच्या वाचनात आली आणि आमच्या डोक्यात(?) नेहमी प्रमाणे गोंधळ झाला.

पसरलेला कभिन्न काळोख भोवताली
तशास अठवे पिशाचलेल्या कथा मलाही
उरात माझ्या बघा लागले धडधडायला
कडाडणाऱ्या विजे मुळे मी हदरून जाई
करू लागली भुते माझ्या भवति तांडव
समीप मुंज्या उभारल्याची उगाच ग्वाही
सभोवताली ठसेच उलट्या पावलांचे
करीत आला खवीस माझ्यावरी चढाई
कवेत घेई हळूच मजला अधीर हाडळ
बघून हसली सुरात वरच्या ती सटवाई
फिरून येतो विचार मज या सर्व भुतांचा
खिशात माझ्या 'ह.चालिसा' उगाच नाही