एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २७ मे, २००७

ओल-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल ओल

अधी काय होते? अता काय केले?
बघा वाकुनी नीट मी काय केले

तसा दोष असतो सदाचाच माझा
तरी प्रश्न उरतो कुठे काय केले!

मला वेगळे खूप पर्याय होते
अता वाटते हाय मी काय केले!

जरा जास्त हा आज आवाज आला
तुम्हाला समजलेच मी काय केले!

मला श्रेय मिळते सदा हे बुर्‍याचे
असे नेमके मी अधी काय केले ?

तुझा चेहरा का असा आज झाला?
कळेना जगाला कुणी काय केले!

तुमानीस का ही तुझ्या ओल आहे?
विचारू नका "केशवा" काय केले!!

-- केशवसुमार

मज उन्हाळा सोसतो ना

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची गझल ना उन्हाळा भोगला मी

मज उन्हाळा सोसतो ना फारसा...
भाजुनी झालोय मी बघ कोळसा...

'हात' अमचा नेहमीचा सोबती
सांग का ठेवू कुणावर भरवसा?

रोज मी गर्दीत येथे पाहतो
रेटतो माणूस येथे माणसा...

गाल का गेला सुजूनी आज हा?
हा कुणाच्या सांग हाताचा ठसा?

आयता अंधार सारा भोवती
चांदण्याचा हा कशाला कवडसा?

लोकहो, इतके तरी सांगा मला
"केशवा"ला मी इथे टाळू कसा?

-केशवसुमार, माकल्सफिल्ड

बुधवार, २३ मे, २००७

हवी आहे एक छबकडी..

गेल्या काही दिवसात मनोगताचे कुरुक्षेत्र करणाऱ्या सर्वसाक्षीयांच्या उडत्या छबकड्यांनी आमच्याही मनात वादळ उठवलं. पण कुरुक्षेत्रा वरचा रणसंगार पाहून प्रतिसाद कसा द्यावा ह्या विचारात असतानाच आमचे परमस्नेही जयंतरावांची हवं आहे एक आभाळ! ही अप्रतिम कविता वाचनात आली आणि आमच्या विमानप्रवासाच्या सुप्त इच्छा शब्दरूप घेऊन कागदावर उतरल्या.

हवी आहे एक स्मितसखी
कपड्याची अट नाही.
अगदी वीतभर किंवा चतकोर असले तरी चालेल!

हवी आहे एक बाहुली
कुठल्याही देशाची अट नाही.
अगदी भारतीय दिसली नाही तरी चालेल!

हवी आहे एक 'मधुमक्षिका'
अट फक्त एवढीच.
ती सुस्मिता असावी!
अगदी संपूर्ण प्रवासात एकदा जरी हसली तरी चालेल!
त्या हसण्याने
काही खडूस चेहऱ्यांनी
इंग्रजी वर्तमानपत्रातून असूयेचा नजरेने बघितले तरी चालेल!

कारण विमानतळावरची गर्दी. कोलाहल,गचाळ व्यवस्थापन, लांबलचक रांगा, ताटकळणे, तपासणीन
ेथकून गेलेल्या ह्या जीवाच्या
सुकलेल्या घशात
मार्टिनीचे दोन थेंब पडावे
एवढीच इच्छा!

हवी आहे अशी एक छबकडी
तातडीने!
अगदी माझ्या बोलण्याने चक्क लाजली आणि धूम पळाली तरी चालेल!