एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

तो हजार खर्डे वाचुन...



स्वामित्वहक्का वर झालेल्या उलट सुलट चर्चा वाचून /ऐकून , या सर्व गदारोळात 'कोलटकर खरे शहाणे' निघाले ह्या निष्कर्षाला मी पोचलो. तरी ह्या चर्चा काही माझी पाठ सोडेना...त्यातच खरेच्या एका पंख्याने 'मी हजार चिंतांनी ..' ही खाऱ्यांची प्रसिद्ध कविता पाठवून दिली...(आता हे करताना त्यांनी खरेंची परवांगी घेतली होती की नाही माहिती नाही ;) ) मग जे नेहमी होते तेच झाले ...


तो हजार खर्डे वाचुन कविता छापवतो
मी जालावर बघतो, परवांगी विन वापरतो !

तो साहित्याच्या 'क्षकिरणां'चा छंदी
मी घाऊक प्रसिद्धी मध्ये या आनंदी
तो स्वमित्वाशी जीव गंजवीत बसतो
मी लंघून कायदा पार निघाया बघतो !

डोळ्यांत त्याचिया सूर्याहुनी संताप
तत्वाचा दिसतो शाप, जरी हा ताप !
तो त्या तत्वांची अभ्येद्य, दणकट -
घडवून ढाल प्रस्थापितांना नडतो !!

मी 'माझे नसून माझे' म्हणुनी लिहीतो
तो तेच घेऊनी दावा लावून बसतो
मी हेतु माझा स्वच्छ सांगतो त्याला
तो शांत मानाने तत्वासाठी लढतो !

मी प्रसिद्ध ! करतो कवितेसाठी सगळे
रसिकांना वेचून निवडक देतो अगळे!
तो मुळात देतो हेतू उधळून माझा
अन्‌ 'वकिलाची ही नोटीस' देऊन जातो !!

मज उदात्त हेतूचाच अता आधार
लपतो न परि हा गुन्हा आत भेसूर !
तो जरी लढावतो हक्क कवीचा तरीही
मज साहित्य प्रसाराचा तो मारक दिसतो !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: