एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २ फेब्रुवारी, २००८

तीन पत्तीच्या खेळाची

आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता भातुकलीच्या खेळामधली

तीन पत्तीच्या खेळाची ही माझी कर्म कहाणी
होते नव्हते सगळे गेले , वरती झाली देणी

'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा
दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या"
पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी

खूप दिसांनी जमले सगळे, भरला कोरम सारा
कुणी म्हणाले वाटा पत्ते , वाजून गेले बारा
वाहत होती दारू आणिक जसे वाहावे पाणी

कुणी विचारी तेव्हा, "सांगा आज कसे खेळावे ?"
पत्ते पिसण्या आधी थोडे, नियम जरा बोलावे
बीना लिमिट ने खेळू ठरले, शुद्धीत नव्हते कोणी

हा दैवाने बघा आज मज डाव असा वाटावा
ज्या खेळीवर मी ही माझा प्राण पणा लावावा
हाती माझ्या आले होते, एक्का राजा राणी

का माझा हा श्वास कोंडला घोट एक घेताना?
का माझे हे फिरले डोळे ते पत्ते पाहताना ?
तीन एक्क्यांनि फिके ठरवले एक्का राजा राणी !!

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा
बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा

येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी
हातात बांधलेला, तो मोगरा असावा

लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो?
की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा

दारात ती उभी अन्‌, हाती तयार झाडू
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा

वागो खुशाल "केश्या" हा मर्कटा प्रमाणे
डांबून घालण्याला , पण, पिंजरा असावा

चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता माझ्याभोवतीचे जग बदलत आहे !
.......................................
चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे !
.......................................

आत आत खोल काही बदलत आहे !
चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे !

नवे नवे होते तेव्हा कडू लागलेले...
भरदिवसा नंतर मग घडू लागलेले...
थोडे उभे दिसू, थोडे पडू लागलेले...
हळू हळू पिणे मजला उकलत आहे....!

'पुन्हा पुन्हा पिणे' केला हाच नारा माझा
झोकांडत ठेवला मी सदा तारा माझा
वाहू दिला मदिरेच्या मी जारा माझा...
मला सारे करायाची सवलत आहे !

घराचे हे दार कोण ठोठावते बरे ?
डोळ्यामधे कोण माझ्या डोकावते बरे ?
दूर वरून कोण हे बोलावते बरे ?
पाऊल ना सरळ पण उचलत आहे...!

आनंदात असताना ही दुःख वाटते का ?
विनाकारणच हुरहूर वाढते का ?
एकाएकी डोळ्यांपुढे धुके दाटते का ?
समजावे....! काहीतरी गफलत आहे...!!
* * *
सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी
शेवटला घडणार, हेच जाणतो मी
आता माझा मीच...इतकेच जाणतो मी
...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !!
* * *

- केशवसुमार
रचनाकाल ः २३-२४ जनेवारी २००८

(झुलवा)

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा

रात्रीला पोरांना निजवा
बेत जरा मग जंगी घडवा

तुमची गोची, त्यांची वळवळ
काय करावे लवकर ठरवा

कुणीच येईनासे झाले!
अहो जरा जोराने हलवा

नसे पाहण्या कोणी आता
जरा दमाने खिंडी लढवा

बाई, बाटली आणिक आम्ही
युगायुगाचा चालू झुलवा...

"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत

त्यांची गोची पाने पिकली
देठ तरी वळवळतो हिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
दमलो, थोडे पडतो अडवा...

वाढ

आमची प्रेरणा अजब यांची कविता ओढ

देह आमचा बोजड दिसतो अजूनही
जीम बदलली, मेस बदलली असूनही...

मनात येता; चौपाटीवर फिरून मी
गुरासारखे उदरी घेतो भरून मी...

खाताना पण असतो मी प्रसन्न किती!
बघणाऱ्याला वाटत असते सुन्न किती!...

इतरांना मी दिसतो जबरी फुगलेला
माझ्या 'उदरी' मी असतो 'व्याकुळलेला'...

मळमळ

आमची प्रेरणा अमोल शिरसाट यांची सुरेख गझल दरवळ

कशी समजली माझी वळवळ
मलाच होते ठाउक केवळ.

सहन कराया कळ प्रसवाची
भगवंता दे आध्यात्मिक बळ

कथा वाचता सर्वा पटले ....
ही कोणाची आहे मळमळ .

प्रतिसादाने उठले वादळ
इथे अचानक झाली खळबळ!

कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
हा नाही हो माझा दरवळ

कसे विसरलो अपुले मी वय...
मला लागला का आहे चळ?

मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ

मरशिल मेल्या "केश्या" आता
लावून पाय *डीला पळ

(सांज कलताना...)

आमची प्रेरणा मुकुंद भालेरावांची सुंदर चित्रमय कविता सांज कलताना...

काल घेतलेल्या काल
विसरल्या आणाभाका...
सांज कलताना पुन्हा
प्याले भरून दे माका..

तुझं हसणं नाचणं..
डोळा भरून पाहणं..
लटपटत्या पायांनी
माडीवर येणं जाणं...
पण कशी ही पायरी
रोज देई मला धोका.

घरी जाण्यानं उदास...
माझ्या साऱ्या आठवणी...
आज बर्फावर प्याली
नाही मिसळलं पाणी..
झुले आज मी जसा की
आमराईतला झोका..

झाला दारात तांडव...
बयो हाती सरपण...
माझं तुडवलं अंग...
माझं बांधलं सरण...
बेशुद्धीत घेतल्या मी
पुन्हा साऱ्या आणाभाका...

खाडा -विडंबन

लोकहो !
आमची प्रेरणा 'बरेच दिवसांनी तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार( म्हणजे आम्ही) आणि इतर मित्र फार मागे लागले होते (!) म्हणून धोंडोपंतांनी केलेली सुंदर गझल अखाडा
धोंडोपंत,आपण आज्ञा केलीत 'केश्या,आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं. झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो. '"झ**" हा काफिया मला वापरायला लावण्यात आपला मोठठा वाटा आहे म्हणून आणि हा काफिया मुक्तपणे इथे वापरतात म्हणून मिसळपावचे मालक ह्यांना हे विडंबन अर्पण.

तर विडंबन असे आहे:-

काल ही पडलाय खाडा
बायको करणार राडा

काढुनी कपडे फिरावे
सोसवेना जर उकाडा

बायकोच्या ह्या शिव्या मज
वाटतो माझा पवाडा

पाहिले चोरून सारे
भेटला उघडा कवाडा !

ओढतो इतक्या बिड्या की
नाव मज पडले धुराडा

आयती चालून आली
मी तिचा करतो निवाडा

सारख्या देतो शिव्या ह्या
का बरे तात्या झ**?

पाडतो "केश्या" विडंबन
करुन कवितांचा चुराडा

--- केशवसुमार

मला कसा हा म्हणतो मेला....

आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात......

मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला
लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला

नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू
भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा??
आनंदाने जगण्यासाठी.... भरपुर दे मजला

विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या
संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला

कसे जमावे माझे आता माझ्या पत्नीशी?
माय तिची ही कटेल केव्हा...उत्तर दे मजला

किती पहावी वाट सखे तू सांग जरा मजला
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला

'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या'
दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला

----केशवसुमार

इथे तळत आसपास...!

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची नेहमी प्रमाणेच अप्रतिम कविता ऐस फक्त आसपास...!
.................................................
इथे तळत आसपास...!
.................................................
भोवतालच्या हवेत जाणवे खमंग वास...!
आसणार रे भज्या, इथे तळत आसपास...!

भेट मज पुन्हा पुन्हा अशीच जेवण्यामधून...
येउ दे असाच वास मंद वारियावरून...
घेउ दे मला खमंग आज हा भरून श्वास !

श्वास श्वास पाहतो हळूच आज चाचपून ...
काळजात ठेवलाय वास मी तिचा जपून...
का असा पुन्हा पुन्हा आज आठवे भज्यास...!

मी पहायची अशीच वाट रे किती अजून ?
सांग रे मला इथे मिळायच्या भज्या कुठून !
हो मला जगायला पुरेल आज एक घास...!

वाटते अलो, उगीच दूर देश मी निघून...
लाभले अखेर काय...? सर्व दाम हे मिळून...
जर अशा भज्या मला सदैव ठेवती उदास !

- केशवसुमार
.................................................
(रचनाकाल ः १३ डिसेंबर २००७)
.................................................

विडंबन

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल

नुसतेच बोलण्याचे, नुसतेच सांगण्याचे
बापा समोर येती आवाज फाटण्याचे

खोली कशी असावी सांगू नका मला हो
असतात फायदे ही घरदार पसरण्याचे

लपणे कठीण नसते प्याल्यावरी, कितीही
असतात प्रश्न अवघड रेषेत चालण्याचे

घडले कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान मजला थोबाड झाकण्याचे

चुपचाप राबणारा नवराच दु:ख जाणे
दिनरात बायकोच्या तालात नाचण्याचे

करता कशास त्रागा वाचून "केशवा"ला
असती विडंबने ही साहित्य हासण्याचे

पांढरपेशी विडंबने

आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम पांढरपेशी कविता

अवळेचिंचा कुरतडताना तिला पाहुनी कच्च्या
समजू नका हो झाला आहे भलता सलता लोच्च्या

किरकिरणारा बाप तिचा हा जागा चोवीस तास
खिडकीमधूनी गेलोतरी ही त्यास लागतो वास

गंध मारतो किती तुझ्या रे ह्या कपड्यांना साल्या
तुमान बुरसट, सदरा कळकट धू कधीतर मेल्या

डेलिकसीच्या नावाखाली समोर झुरळे आली
खारवलेल्या मिळती इथल्या हॉटेलातुनी पाली

चादर ओढून आता पडतो लोळत घोरत गादी
(तशी जराशी गारच होती तुरुंगातली लादी)

शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा
कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा

अंगावरचे ठसे सांगती गतकाळाचे काही
मार लपावा इतकी ही अमुची पुण्याई नाही!

दर्प सांगती अभिमानाने मदिरेच्या ह्या जाती
स्वच्छ सुसंस्कृत शुद्ध अमुची इथे गटारी होती

हलकट मेला घाला याला चार शिव्यां अन लाथा
पांढरपेशी विडंबने तव पुरे "केशवा" आता!

-केशवसुमार

(कृपा तुझी रे अपार आहे)

आमची प्रेरणा अदितीताईंची गझल कृपा तुझी रे अपार आहे

जरी अजूनी दुपार आहे,
'बसा'वयाचा विचार आहे ...

कसा करावा विचार पुढचा
'हिचा' मिळाला रुकार आहे

'हिला' बघूनी कसे खुलावे ?
चवळी कसली गवार आहे...

जपून वाका तुम्ही अताशा
घरी हाणला मटार आहे!

(जपून पाडा जरा कविता
तयार "केशवसुमार" आहे!)

अशाच देवा मिळोत कविता
कृपा तुझी रे अपार आहे!

बघा विडंबन लगेच आले
टपून "केशवसुमार" आहे!

--केशवसुमार
(२३.११.२००७,
कार्तिक शू १४ शके १९२९)
(ही रचना ह घ्या हे वे सां न ल .)

रागावल्या सखीला.....

आमची प्रेरणा शरद रेशमेय यांची गझल रागावल्या सखीशी.....

रागावल्या सखीला मज टाळता न आले
घडले पुढे कुणाला मज सांगता न आले

लाथेमुळे तिच्या हा पांगुळलो असा मी
चालायचेच सोडा मज रांगता न आले

आक्रंदनास ही ना संधी मला मिळाली
पडले मला किती ते मज मोजता न आले

हा भार मम प्रियेचा मज पेललाच नाही
पडलो पुन्हा उभे ही मज राहता न आले

लिहितो विडंबने मी पण लायकी न माझी
मी थांबतो म्हणालो मज थांबता न आले

रागावल्या सखीला.....

आमची प्रेरणा शरद रेशमेय यांची गझल रागावल्या सखीशी.....

रागावल्या सखीला मज टाळता न आले
घडले पुढे कुणाला मज सांगता न आले

लाथेमुळे तिच्या हा पांगुळलो असा मी
चालायचेच सोडा मज रांगता न आले

आक्रंदनास ही ना संधी मला मिळाली
पडले मला किती ते मज मोजता न आले

हा भार मम प्रियेचा मज पेललाच नाही
पडलो पुन्हा उभे ही मज राहता न आले

लिहितो विडंबने मी पण लायकी न माझी
मी थांबतो म्हणालो मज थांबता न आले

(पटतच नाही...)

आमची प्रेरणा अजब यांची सुंदर गझल पटतच नाही...

खरे तर मला तुझे लाजणे पटतच नाही
रोज तेच ते तुला विनवणे पटतच नाही...

मला भेटती कशी माणसे नको तिथे ही
अश्या ठिकाणी बघून हसणे पटतच नाही...

स्वप्ने पडती रोज मला ही नको नको ती
स्वप्न बघून ती गप्प राहणे पटतच नाही...

कसे तुम्हाला सांगू केले काहीच नाही
कुणासही पण माझे म्हणणे पटतच नाही...

रोज सांगते आज नको रे करू उद्याला...
रोज उद्याचे पुढे सरकणे पटतच नाही...

मला कळेना तुझे "केशवा" 'अजब' वागणे;
रोज विडंबन तुझे पाडणे पटतच नाही...

केशवसुमार

मिळत राहील्या "केश्या"ला ह्या अयत्या कविता

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची अप्रतिम गझल फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा

धूम्र वर्तुळे ओठांमधुनी निघत राहिली
विडी मागूनी विडी रात्रभर जळत राहिली

तसूभरी ही बघा तिचे रे वजन न घटले
ट्रेडमीलेवर घोडी नुसती डुलत राहिली

जुन्या चूकांची याद कशाला देता मजला
बनून पत्नी पुढे मला ती छळत राहिली

कुणा न दिसली घरामधली त्यांची चुळबुळ
पण खाटेची गाज दूरवर घुमत राहिली

मिळत राहील्या "केश्या"ला ह्या अयत्या कविता
दिवस रात्र मग विडंबने ही पडत राहिली.........

.....केशवसुमार

ही ठमा

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल पौर्णिमा

चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा
पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा

भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता
केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा!

का अशी मम नजर खिळली तिच्या पाठीकडे
ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा?

बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली
(साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा)

राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही
लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!

कसा नेहमी...

आमची प्रेरणा अजब यांची सुंदर गझल तसा नेहमी... आणि तिचे आमच्या गुरुजींनि केलेलं झकास विडंबन तसा नेहमी...(२)

कसा नेहमी नको तिथे मी असायचो
आणि नेमका लफड्या मध्ये फसायचो...

उमेद होती जिंकायची तेव्हा मजला;
अपयश आले तरिही पत्ते पिसायचो...

ओळख माझी कधी विसरले नाही ते?
ज्यांची घेउन इथे उधारी बसायचो...

पाहत होतो पोरी मी पूर्वीदेखिल...
पण त्यांच्यावर मी अवलंबुन नसायचो...

नेता होतो, नव्हतो गांधीवादी मी!
क्वचित-प्रसंगी उपोषणा मी बसायचो...

मी मेल्यावर म्हणेल का हो हे कोणी?
तुझी विडंबन वाचुन "केश्या" हसायचो...

मद्यपान

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अर्घ्यदान

इतका कुठे इथे मी हो भाग्यवान आहे
आहे घरात सासू, घर अंदमान आहे

मिळतात रोज आता पेले मला जलाचे
सध्या घरी स्वतःच्या मी बंदिवान आहे

नशिबास कोसुनी मी जी घेतली सुरई
पेल्या पुढे परंतु ती ही लहान आहे

आश्चर्य आज ह्याचे ती ही पशू निघाली
मज वाटले मिळाले मोकाट रान आहे

वर्दी तिने दिली ना आहेत आत बाबा
नशिबात आज अमुच्या हे कंठस्नान आहे

मज मारलेय त्यांनी सांगू किती ठिकाणी
सगळी कडून सुजली अमची कमान आहे

सरकारमान्य पीता स्वातंत्र्य बडबडीचे
चालू म्हणून आमचे हे मद्यपान आहे

गातात भाट-चारण व्वा व्वा सुभान् अल्ला
कंपूत जोकरांच्या राणी महान आहे !

प्रत्येक चीज आहे खाऊन पाहिले मी
अपवाद फक्त याला ते 'पार्मिसान' आहे

अपमान रोज केला शब्दांत सायबाने
त्याच्या मुळेच माझी हपिसात शान आहे

बोलावले न त्याने, गेलो तरी घरी मी
निर्लज्य आसण्याचा मज स्वाभिमान आहे

केलीस येव्हढी तू घाई उगाच मजला
घालायची विसरलो माझी तुमान आहे

उपयोग काय झाला सांगून "केशवा"ला?
त्याचे विडंबनाचे चालू दुकान आहे

सुवास

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल प्रवास

झोप येत मज झकास आहे
उभी बायको छळास आहे!

मी ही बघतो स्वप्न नव्याने
पोर गोमटी गळास आहे

ही कुणाची रे पुण्याई
हा कसला रे सुवास आहे?

लाल सुराई कशी संपली
हिशोब याचा कुणास आहे?

धापा टाकत काय चालतो
श्रेय विडीच्या धुरास आहे

जुनी जाहली नार-लाजरी
अता मागणी नरास आहे

काल तिच्या मी कुशीत होतो
आज तिच्या खेटरास आहे...

कोण उचलतो, कोण जाळतो
किती काळजी शवास आहे

किती सांगतो नको लिहू तू
लाज कुठे "केशवा"स आहे?

करते अवाज इतका खोली भरून जाते.....

आमची प्रेरणा अदितीताईंची ( फसलेली?) गज़ल स्वप्नात रंग माझ्या कोणी भरून जाते.....

करते अवाज इतका खोली भरून जाते
निद्रिस्त बाप त्याने जागे करून जाते

आहे सदैव त्याला हा राग राग माझा
नुसत्याच कल्पनेने मन घाबरून जाते

चाहूल लागता मम हा थयथयाट नाचे
येताच हाक त्याची तन थरथरून जाते

एका क्षणात पटते की चूक आज झाली
पुढच्या क्षणात प्राक्तन माझे ठरून जाते

त्वेषात चालती मग हात पाय त्याचे,
चोरून भेटण्याची उर्मी जिरून जाते

--केशवसुमार(१५ ऑक्टोबर २००७
आश्विन शुद्ध ४ शके १९२९ )
चोरून भेटण्याचा (अजून एक फसलेला ) प्रयत्न...

कांदेगंध

आमची प्रेरणा मृण्मयी यांची सुंदर कविता मीलनगंध

वरवरी मी दरवळाया लागले
आतुनी मी परि मळाया लागले

वास येतो चंदनाचा मज जरी
लोक का हे चुळबुळाया लागले

दार उघडाया किती हा वेळ तो
सर्व संयम डळमळाया लागले

घेतले आलिंगनी जेव्हा तुला
वजन मजला तव कळाया लागले

टाकली समजून विजली मी विडी
अन तिचे कपडे जळाया लागले

लाजण्या-हसण्यात सरली रात्र अन्
तांबडे फुटता पळाया लागले

नयन ना विरहात जे पाणावले
कापता कांदे गळाया लागले

नाहताना पाहुनी मंदाकिनी
थेटरी सारे चळाया लागले

( ...देहात माझ्या ! )

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...देहात माझ्या !
...देहात माझ्या !
लालसर हे फोड काही उपटले देहात माझ्या !
खाजण्याचे एक वादळ उसळले देहात माझ्या...!

नजर मजला लागली ही सांग रे आता कुणाची...
केवढ्या वेगात झाली वाढ देही पुटकुळ्यांची !
कांजिणे खाजाळलेले उगवले देहात माझ्या...!

फोड झाले एवढे की लपवण्या उरले न काही...
पाठ नाही राहिली अन् सोडले तोंडास नाही...
हे असे फोडत्व सारे पसरले देहात माझ्या !

प्रार्थनेने थांबलेना,ना दाद देई औषधाला...
खाजवूनी लाल केले मी अता साऱ्या तनाला
वेदनेचे कैक सागर उसळले देहात माझ्या !

गार कपड्याची घडी तू लावली हळुवार जेव्हा
कळ सुखाची गारशी रे लहरली गात्रात तेव्हा
स्पर्श सारे गार आता उतरले देहात माझ्या...!

- केशवसुमार रचनाकाल ः ११ ऑक्टोबर २००७

...मला आठवण आहे !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...तुझी आठवण आहे !
...मला आठवण आहे !
.....................................
अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे
...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे !
मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे
मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे
सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे
दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे
भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे
...अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे
समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे !
थकलो आता ! माझा चालू ग्लास विसावा आहे !!
धूम्रनळीची ज्योत इथे ही कुणी लावली आहे
कशी दिसावी ? सांग मला मग कुठे बाटली आहे ?
* * *
...परतीचाही प्रवास आता कसा व्हायचा आहे
कळे न मजला, अधार आता कुणी द्यायचा आहे !
उंबऱ्यात हे पाऊल माझे उगीच अडते आहे
`खरेच` का हे! पाऊल माझे तिरके पडते आहे !
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे !
* * *
...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे !
* * *
- केशवसुमाररचनाकाल ः ०५ ऑक्टोबर २००७