एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ३ नोव्हेंबर, २००७

रेशमाच्या बाबांनी

आमची प्रेरणा शांताबाई शेळके यांचे अप्रतिम गाणे रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

(...एकटी मी !)

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची सुरेख कविता ...एकटी मी !
(...एकटी मी !)

ये घरी नाही कुणीपण...एकटी मी !
दूर कर माझे सुनेपण...एकटी मी !

रोज सांगावा तुला मी धाडते रे
रोज आडोशास तुजला भेटते रे
चटक मज आहे विलक्षण एकटी मी !

कालची ती चूक...नाही रे गुन्हा जर
तो गुन्हा तू आज सखया रे पुन्हा कर
पाहिजे आहे मलापण... एकटी मी !

गुपित अपुले सांग, कुठवर सांग तोलू ?
गाव सारे बघ अता लागेल बोलू
तोंड मी लपवू कुठे पण...एकटी मी !

पाहरे, आहेत माझ्या भोवताली
कर अता काही तरी तू हालचाली
कळत हे नाही तुलापण...एकटी मी !

पाहण्या आलाय मजला आज तो रे
पाहुनी मजला असा तो हासतो रे
वाटले हसतोय रावण...एकटी मी !

- केशवसुमार
(रचनाकाल ः सायं. ६ ते ११, १३ सप्टेंबर २००७)

ती ब्याद लांब गेली

आमची प्रेरणा बकुळ यांची कविता ती वाट लांब गेली

मी आठवू कशाला जो
काल 'भूत' झाला
होता कसा असा हा
माझ्या गळ्यात आला

डोक्यावरी तयाच्या
न मुळीही केस होते
नाना परी कळा अन
डोळ्यांस भिंग होते

हृदयात आस होती
नि मुळात त्रास होता
चालू परंतु त्याचा
हा अट्टाहास होता

सोडून लाज सारी
चोखाळी वामरस्ता
जरी बंद बार सारे
शोधी इथे हा गुत्ता

आता मनास वाटे
का हे खरेच झाले?
ती ब्याद लांब गेली
झाले बरेच झाले

...कुणी सुजवले अंग !

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ...निळसर झाले अंग !
...कुणी सुजवले अंग !
............................................

गालांचा का हा निळसर झाला रंग !
मज नका विचारू, कुणी सुजवले अंग !!

पाहिले तिला ती मला भासली हूर
ती दिसली की मम मनी उठे काहूर
ती समीप येता...धडधडते हे ऊर
विसरुनी स्वतःला तिच्यात होतो दंग !

स्वप्नात खुणावे रोज मला ती आता
मी तिला मारण्या ,मिठी धावत जाता
सोबतीस होती तिथे तिची पण माता...
मातेने केला मम स्वप्नाचा रस भंग !

ही जिथे जिथे, तू तिथे तिथे येतोस...
पाहून हिला अन वेड्या गत हसतोस...
तू बऱ्याचदा मज गल्लीतही दिसतोस..
तू छळण्याचा का आहेस बांधला चंग ?

तू आजूबाजूला तिच्या जर दिसलास...
घेईन जीव जर पुन्हा बघून हसलास !
मी काल विसरलो त्या मातेचा ढोस...
मज वाचवण्या तो आला ना श्रीरंग !

- केशवसुमार
रचनाकाल ः ५ व ६ सप्टेंबर २००७

मला तुझ्या बापाची भीती

आमची प्रेरणा अनंत ढवळे यांची अप्रतिम गझल मला तुझ्या धर्माची भीती

लिहिताना शब्दांची भीती
लिहिल्यावर अर्थाची भीती

उघडयावर बसण्यास चालला
हा लोटा फुटण्याची भीती...

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या बापाची भीती

खाटेबद्दल शंका नाही
तव बोजड देहाची भीती...

सगळ्यांना "केश्या"वर शंका
विडंबने पडण्याची भीती

होतोय त्रास मजला

आमची प्रेरणा विश्वास यांची गझल आहे उसंत कोठे

होतोय त्रास मजला खाली बसायला
जातेय काय तुमचे नुसते हसायला

कारण पराभवाचे देऊ नकोस तू
चुपचाप घे अता तू पत्ते पिसायला

मी ही जपून थोडे बोलायला हवे
असते तयार पत्नी येथे रुसायला

फुकटात चापण्याला गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला

घेऊन धोतऱ्याची आलास ही फुले
समजू नकोस वेडी मजला फसायला

आली कुठून सासू माझ्या घरात ही
घडणार काय पुढती लागे दिसायला

बाहूत बायकोच्या होतो मजेत मी
हा सासरा तिथे ही आला डसायला

जी वाट लागलेली माझी घरा मधे
तुम्ही तिथे नको पण होते असायला

होता सुखात "केश्या" लग्ना विना किती
बघ लागतात आता फर्श्या पुसायला

मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

टवाळशेठांच्या भाषांतरांनी प्रभावीत होऊन आम्हाला वाटलं आपण ही अस काहीतरी करावं. लगेच जालावर हिंदी गाण्याची संकेतस्थळ शोधली, एक जुने गाणे घेतले आणि लागलो कामाला..थोड्या वेळातच आमचं हिंदी ( की उर्दू) भाषेच ज्ञान(?) आणि त्याहून अगाध आमचं मराठी शब्दभांडार उघडं पडलं. पण जिलब्या पाडायला घेतलेले हे कार्य अर्धवट सोडणं आमच्या शान ( हिंदी ,मराठी नाही ) च्या खिलाफ होत.मग आम्ही परतीचा मधला रस्ता धरला आणि त्या जुन्या गाण्याच्या चाली वर ५-६ ओळी खरडल्या..

मी गं पुरता वेडा झालो पाहून तुला
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

हलवीत वेण्यांना तू नको अशी चालू
लाजूनीया पदराशी नको असे खेळू
तुझी पाहूनीया चाल, माझ्या काळजाचा हाल
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

डोळ्यावर आली तुझ्या बट एक काळी
गालावर खुललेली गुलाबाची कळी
तुझे पाहूनीया गाल, माझ्या काळजाचा हाल
कस सांगू मी सांगू काय होतंय मला
मी गं पुरता वेडाऽऽऽऽऽ

चाल : तीच तर तुम्हाला ओळखायची आहे..
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखत बसू नका.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहितील )
४. फक्त चाल ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करू नका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )

तोरा-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल तोरा

दुसऱ्याने दु:खात रहावे
आपण आनंदात रहावे!

वय झाले, का वखवख करता?
गुपचुप - देवघरात रहावे

चिक्कीचे तुकडे खाताना
कवळीने तोंडात रहावे

वजन वाढले फार तरीही
पीत रहावे, खात रहावे

घोटावी दाढी पण थोडी
हजामा कडे जात रहावे

कानामध्ये घाला बोळे
गाणार्‍याने गात रहावे!

नशिबाने हा पदर पडावा
अन आम्ही धक्यात रहावे

वासाचा नसतोच भरवसा
खाताना लक्षात रहावे

मलाच येथे कळते सारे
मी अपल्या तोऱ्यात रहावे

ह्या "केश्या"ला अक्कल आली
का असल्या स्वप्नात रहावे?

(...हा सुखाचा सोहळा !!)

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची सुरेख कविता ...हा सुखाचा सोहळा !!

(...हा सुखाचा सोहळा !!)

दार हे उघडेच थोडे ठेउनी मी झोपलो
काल मजला मच्छरांनी त्यामुळे छळले किती...!
भोवती माझ्या कसे बघ गीत गुणगुणतात हे ?
लावले कासव; तरीही डास घुटमळती किती !

सोड माझी पाठही अन् सोड माझी साथही
चार घटका झोप मजला घेउनी देऊ नको...
पाठ ही मी खाजवोनी,रात्र सारी जागतो...
रे मला चाऊ नको तू रे मला चाऊ नको...

आज ओडोमास हे मी जाउनी बघ आणले
अंगभर चोपून माझ्या तू जरा देतेस का ?
आज मी झोपेन म्हणतो पार मुडद्या सारखा...
आज माला झोपण्याला तू मदत करतेस का?

झोप झाली; बोललो...हे सांग आहे का खरे ?
झोपण्याचे स्वप्न माझे जाहले साकार का ?
आपल्या गाद्या जरा डागाळल्या गेल्या तरी...
रोज ओडोमास मजला फासुनी देणार का ?

अजुन हा बघ गंध आहे, ही निशा गेली तरी...
रंग ही गादीस आहे, बघ जरासा सावळा
रात्र ही येते...तशी मज झोपही येते अता
आणि ओडोमासने मज...हा सुखाचा सोहळा !!

(रचनाकाल ः २२ ऑगस्ट २००७ )
- केशवसुमार

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

आमची प्रेरणा पुन्हा एकदा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो.मिलिंदशेठनी आपल्या आताशा मी फक्त बकाणे चकण्याचे भरतो या विडंबनात ज्या बेवड्याची कैफियत मांडली आहे त्याचा भूतकाळ बहुतेक असा असावा..

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो
रोज रात्री रिचवून थोडी घराकडे निघतो

जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे
जाणीव कुठली? मुळात मजला शुद्ध नको आहे
ह्या शुद्धीशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे तिला, तिने ही छळू नये मजला
बधिरतेच्या गुंगीवर मी रोज असा डुलतो

आता आता छाती केवळ धुरास साठवते
दारू म्हणता 'उंची' नाही 'देशी' आठवते
आता चालती दिलखुष गप्पा बारबालांशी
आता असते रात्रही माझी थोडीशी हौशी
कलंदरीने पेल्यावर हा पेला मी भरतो

कळून येता जगण्याची मज इवलीशी त्रिज्या
उतरून गेली पुरती माझी पिण्याची मौजा
बाई बाटली सर्व जाहला बंद अता चाळा
जगा न कळले असा कसा हा झाला घोटाळा
स्वप्नी हल्ली बघ माझ्या हा यम काळा येतो!

आताशा मी फक्त विडंबन गझलांचे करतो..

आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो आणि मिलिंद छत्रे यांनी केलेले सुरेख विडंबन आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो

आताशा मी फक्त विडंबन गझलांचे करतो
चाकोरीचे खरडून तुमच्या चरणी पाठवतो

छंद नको मज कुठलाही अन् ताल नको आहे
मात्रा कसल्या? मुळात मजला वृत्त नको आहे
ह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेने शब्दावर मी शब्द इथे भरतो

आता आता डोके केवळ तिरके चालवते
गझला बघता वाव्वा आधी खोडी आठवते
नंतर होती दिलखुष गप्पा कविवर मित्रांशी
मिळती मजला प्रतिसाद ही थोडेसे हौशी
कलंदरीने बिलंदरी ही गीते मी रचतो

कळून येते प्रतिभेची मज इवलीशी त्रिज्या
उडून जाते विडंबनातील हसण्याची मौजा
बाई बाटली याहून नाही नवा छंद चाळा
लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा
विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो

अंघोळ आणि भांडीवाली

उशीरा उठल्यावर मला अंघोळीला जायची घाई असते ..

आणि

न्हाणीघरात नेमकी तेव्हा भांडी

घासणारी बाई असते ...............

पार्श्व अमुचे..

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल प्रश्न ऐसे..

बायकोने लाटणे जे फेकले
पार्श्व अमुचे त्यामुळे हे शेकले!

"तारखा ह्या सांग चुकल्या रे कशा?"
का कधी माझे सखे तू ऐकले?

हा जरा नाजूक होता मामला
आणि मी चुपचाप गुडघे टेकले

लाजणे पाहून हे, कळले मला
ओसरी वर झोपणे मी येकले

तू असे गातोस मेल्या "केशवा"
लोक म्हणती कोण गर्दभ रेकले!!

-------------------केशवसुमार६९

'दोहे'-२

'दोहे' लिहिण्याचा हा माझा दुसराच प्रयत्न.
आमची प्रेरणा पुन्हा एकदा.. अजब यांचे 'दोहे'

१.
माझ्याइतका दमदार दुसरा कुणी नसे
लोकांचे प्रतिसाद मज यावे सांग कसे?...

२.
लिहिले आहे आजतो दर्जेदार मी फार
वाचत नाही कोणीच ते मी काय करणार...

३.
एकटेपणी मला प्यायला आवडते खास
पील्यावर पण माझ्या येतो तोंडाला वास!...

४.
लिहिले आहे वेगळे, 'विशेष' "केश्या" आज
हे कोण ते ध्यान आला, सगळ्यांना अंदाज...

'पोहे'

मराठीत कुणी 'दोह्यांच विडंबन' लिहिल्याचे ऐकीवात वा वाचनात नाही... 'दोह्यांच विडंबन' लिहिण्याचा हा माझाही पहिलाच प्रयत्न. आमची प्रेरणा अजब यांचे 'दोहे'

'पोहे'

१.
माझ्याइतका जाड हा दुसरा कुणी नसे
जाडीवर उपचार मी घ्यावे सांग कसे?...

२.
चापले आहे आजतो चमचमीतच फार
सोसत नाही मज अता हा वजनाचा भार...

३.
निमूटपणे मी भोगतो तुझेच सारे त्रास
तू नसताना सुद्धा होतो तू असल्याचा भास!...

४.
करते आहे वेगळे, 'विशेष' "केश्या" आज
मी अपला बांधलेला, 'पोह्या'चा अंदाज...

(...मित्रा)

तुझी कशी रे तुमान मित्रा...!
बघून सारे गुमान मित्रा...!

खरेच का भूत आणि तीही
दिसायचे रे समान मित्रा

तसे तिचे पाहताच मजला,
डगमगलेले इमान मित्रा...?

मुलाहिजा ठेव तू जनाचा...
...जरा अता घे दमान मित्रा..

किती रिचवलेस सांग पेले...
...तुझे उडाले विमान मित्रा...!

पडो किडे "केशवा" स मेल्या ..
..करा अपेक्षा किमान मित्रा...

- ई.केशवसुमार, मॅक्लसफिल्ड

या विडंबनाची प्रेरणा 'सुरेशभट.इन' वर

आज साली पण गटारी रात आहे

आमची प्रेरणा मानस यांची सुरेख गझल एक वेडी वेदनेची जात आहे.

गटारी रात....

रोज मी मद्यालयी का जात आहे?
आज साली पण गटारी रात आहे

रंग डोळ्यांचा कसा हा लाल माझ्या,
यात देशीचा जरासा हात आहे

घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
वाटते मज वेगळी ही बात आहे!

काय मी आता करू या बायकोचे
झोपताना लाटणे हातात आहे!

"केशवा"ला काल इतके चोपले की
एक ना तोंडात त्याच्या दात आहे!

-केशवसुमार

(मीतोती- उत्तर)

आमची प्रेरणा अनिल बोकील यांची कविता मीतोती- उत्तर

मी

बघतो

ट..क..म..क!!

तो

एकदम

द..ण..क..ट!!

ती

हसली

कु.. च.. क.. ट!!

-केशवसुमार.

कविवर्यांना आव्हान !!

समस्त कविवर्यांना आव्हान!! येथे दिलेल्या कवितेचा अर्थ शोधा!!

वैधानिक इशारा : हे विडंबन सुमार आहे. जास्त गांभीर्याने घेऊ नये!!

मी...
गीतकार....
त त पप .....म!!

तो..
बघ...
विडंबनकार...
ड्रिं.. डे.. डॉ.. !!!

ती
"केश्या" कोन?
...??...??.. बा..बा..बो!!!!

(केशवसुमार६९)

सोहळा-२

आज चित्त यांचा एका प्रतिसादामुळे आम्हाला मिलिंद फणसें यांची जुनी अप्रतिम गझल सोहळा वाचायला मिळाली. या गझलेने आम्हाला प्रेरणा दिली.

डाव हा आहे तिचा बघ वेगळा
आवळा देऊन मागे कोहळा

प्रेम ठरले एक चर्चा आमचे
आयुधांनी सज्ज ती, मी कोवळा

रोजचे वेणीफणी करणे तिचे
तासभर चाले तिचा हा सोहळा

शोधला बकरा नवा, नवरा नवा
खूप पैसे आणि भोळा-बावळा

मज पटावे हे कसे पण सांग तू
झाड पडले त्यास कारण कावळा!

तू फसावे ह्याचसाठी छेडतो
लावला आहे नवा मी सापळा

हाच कारावास दे आजन्म तू
मारतो डोळा मला हा आंधळा

कोण हा गातोय इतक्या रातरी
आवळा जावा जरा त्याचा गळा

सांगतो आहे तुम्हाला आज मी
वाटतो तितका न "केश्या" सोवळा

(ठसा)

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ठसा

त्या संध्याकाळी मेघ रुपेरी होते
ती घरात मजला आणि एकटी दिसते

खिडकीत दिव्याचा उजेड येऊन गेला
तो तर होता संदेश तिचा आलेला

झाडाची फांदी खिडकीपाशी होती
ती चढून गेलो, प्रिया मिठीत होती

ही वेळ अशी वैरीण साधला दावा
का बाप तिचा पण तेव्हाच तिथे यावा

पायांचे करूनी शस्त्र धुलाई होई
ऐकतो अजून तो पदरव कानी येई...

शांतता कशी? गोंगाट कुठे तो गेला?
त्या पायांचा हा ठसा मात्र उरलेला!

--केशवसुमार
(१० ऑगस्ट २००७,
आषाढ कृ. १२ शके १९२९)

तंतरलेली सायंकाळी

आमची प्रेरणा डॉ‌. संतोष कुलकर्णी यांची अजून एक अप्रतिम गझल मंतरलेल्या सायंकाळी

तंतरलेली सायंकाळी, चालत मी भरभर काहीसा..
श्वास जरा झाले जड होते...घाबरलेला स्वर काहीसा..

मेघ अनावर कोसळताना, वीज कडाडे नभही फाटे...
आणि स्मशानी अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..

कोण बरे हे हसते आहे, कोसळणार्‍या जलबिंदूंसम...
..भास अचानक स्पर्शाचा हा, अन थरकापे कर काहीसा...!

ही तर आहे काळीजादू...वा आहे हा खेळ मनाचा...
...का,मजला मातीमध्ये दिसला अस्थीपंजर काहीसा..

केवळ झाल्या गजराने ह्या जाग मला आलेली पुरती
सावरला "केश्या" काहीसा.. पण चढलेला ज्वर काहीसा...

-ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड

वाटते अप्रूप आता

आमची प्रेरणा डॉ. संतोष कुलकर्णी यांची अप्रतिम गझल आजही अप्रूप वाटे

काय मी आता करावे कवडश्यांचे ...!
- लोक डोकावून बघती भरवश्यांचे...!

लग्न केले मागच्या वर्षीच त्यांनी...
काय पेढे ही मिळाले बारश्यांचे ...?

काय खातो हे कुणाला ज्ञात नाही,
मात्र कौतुक रोज त्यांच्या बाळश्यांचे...!

मोकळा पडला तमाशा...पाहतो मी...
...सूरही विरले अताशा मावश्यांचे...!

पाहुनी थोबाड सुंदर "केशवा"चे!!
..वाटते अप्रूप आता, आरश्यांचे...

- ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार

हिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांच्या गझलेतील काही निवडक शेरांचा मनोगती मानस यांनी केलेला सुंदर भावानुवाद काल वाचला आणि कालच भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या जुन्या सामन्यांच्या चित्रफिती पाहण्याचा योग आला त्यातून सुचलेले हे काव्य..

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार

शतकामागून शतक काढले, त्याबद्दल आभार.
विजयाचे अन शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.

जागून सुद्धा,आम्ही पाहिली नित्य फलंदाजी
हे निद्रे, तू आम्हा सोडले, त्याबद्दल आभार.

केल्या नसत्या तुम्ही; ह्या धावा बनल्या असत्या का?
त्या चेंडूंना, तुम्ही बडवले, त्याबद्दल आभार.

तेव्हा तर हे विश्वच तुम्ही जिंकलेले होते,
विश्वकपाला घरी आणले, त्याबद्दल आभार.

जुन्या चेंडूने पण गोलंदाजी बहरून हो गेली,
स्पिन, गुगलीने दुनियेला छळले, त्याबद्दल आभार

विडंबनाची ऊर्मी पुन्हा"केश्या"ला आली!
इथे दिला अनुवाद 'मानस', त्याबद्दल आभार

-केशवसुमार

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
मूळ गझल येथे आहे

मोठ्याने मज का असा बघ जरा बोलावतो सासरा ?

आमची प्रेरणा चित्तयांची अप्रतिम गझल दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
मोठ्याने मज का असा बघ जरा बोलावतो सासरा ?
दारू का इतकी पितो, बरळतो, भंडावतो सासरा?

दाराचा खटका कसा अडकला आहे बघा ना जरा
वाघाच्यासम आज आत फिरतो, ठोठावतो सासरा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी कुणाचाच हा
कोणालाच न सोडतो पण बघा, हा चावतो सासरा

दारूने सगळी भिजून असती ओलावली कापडे !
त्यादर्पासम हा घरात अमुच्या घोंघावतो सासरा

आईना, निरखून काय बघतो आहेस मेल्या असा?
माझे रूप बघून आणि मजला रागावतो सासरा !

वाटावा चकणा असे बघत हा होता मला आज का?
चष्मा जाड असून ही पण कसा,ना लावतो सासरा

दे सोडून विडंबने सुनवतो आहे तुला "केशवा"
माझ्याहून कुणी न वाइट, असे दर्डावतो सासरा

वेळी अवेळी -२

आमची प्रेरणा जयंतरावांची गजल वेळी अवेळी

तू नको घेऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,चालता वेळी अवेळी

हा खुळा नवरा विचारी बायकोला!
'चिंच कैऱ्या' मागता वेळी अवेळी?

योजना आहे तुला छेडावयाची
का अशी मग सभ्यता वेळी अवेळी

मी घरी येऊ कसा तू सांग,सखये
बाप तव हा जागता वेळी अवेळी

येव्हढे ही जाणशी ना "केशवा" तू
येत नाही सांगता वेळी अवेळी

(केशवसुमार६९)