एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २८ फेब्रुवारी, २००७

(ऋतू येत होते ऋतू ज़ात होते -३)

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल ऋतू येत होते ऋतू ज़ात होते - ३

ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
फसवणे तुझ्या हे स्वभावात होते

नको ते मला आज मागून गेली
तिचे मागणे फार वाह्यात होते

गिरवता तिचे नाव मी राजबिंडे
तिने मारलेले श्रिमुखात होते

तिच्या रुमच्या कवडशा मधोनी
तिला पाहिले बाहुपाशात होते

जरी लाजते आज तुमच्या समोरी
(परी गुदगुली 'आतल्याआत' होते)

पुन्हा दैव आलेच अडवे मला बघ
तिच्या सोबतीला तिचे तात होते

नको " केशवा" जाउ वाटेस माझ्या
मला 'चक्रपाणि' बजावीत होते

तुझी वाचुनी रोज सूमार काव्ये
तुला "केशवा" टेकले हात होते

केशवसुमार

ऋतू येत होते, ऋतू जात होते -२

आमची प्रेरणा आमच्या गुरुजींच्या द्विपद्या ( इथे वाचा) आणि जयन्तरावांनी केलेली समिक्षा 'पण तरीही हा चतुर कवि आपले महिलाविषयक धोरण बदलण्याबद्दल चकार शब्दही काढत नाही हे लक्षात घ्यावे ! त्यामुळे भविष्यात या कवीकडून असेच प्रत्ययकारी लिखाण वारंवार वाचायला मिळेल अशी आशा करण्यास बराच वाव आहे.'

ऋतू येत होते, ऋतू जात होते
विचारू नका हे सुरु काय होते

मुली पाहण्याला जरा वेळ झाला
चणे भेटले पण, कुठे दात होते

घरी बायको अन् कचेरीत स्टेनो
किती रोज मजला इथे काम होते

कशाला अता आठवू काय झाले
नकोत्या ठिकाणी तिची गाठ होते

तिला पाहता घाबरे गाव सारा
जिभेला कुठे हो तिच्या हाड होते

नको तेच मी नेमके बोललो अन्
सुजे गाल माझा ,तिचे हात होते

भुताला कसे ओळखावे कळेना
तुझे "केशवा" वाकडे पाय होते

केशवसुमार

सोमवार, २६ फेब्रुवारी, २००७

कंदिल - द दिवा

आमची प्रेरणा साऱंग यांची गझल दिवा

होता सुसाट वारा घुसला झग्यात माझ्या !
लाजून झाकला मी मुखडा करात माझ्या !

मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?

मीही मठात जातो; अन मंदिरात जातो
पण ध्यान सर्व माझे असते बुटात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
(ह्याच्या पुढे जमेना सरत्या वयात माझ्या !! )

हे रोजचेच झाले आम्हास भारनियमन
कंदिल ठेवला मी आता घरात माझ्या...!

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २००७

पीक -२

आमची प्रेरणा पुलस्ति यांच सु(रेख) पीक

लाविले मी बाटलीला बूच हे का लीक आहे?
का असे माझ्या मनी हे संशयाचे पीक आहे?

तू कश्याला ढोसताना मागुती लपलास दोस्ता?
का फुकट पीतोस, तुजला लागली का भीक आहे?

देव किंवा दैत्य केवळ बघ प्रमाणाचा फरक हा
दैत्य तो बघ ज्यास बसली वारुणीची कीक आहे.

मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
चेहऱ्या वर वाढलेल दाढी मिशांचे पीक आहे

"केशवा'ला का सुचावे काव्य मदिरेचेच पुन्हा
घेतसे हल्ली पुन्हा का तो विडंबन पीक आहे?

फटके पडले बापाचे जर

आमची प्रेरणा माफीचा साक्षीदार यांची कविता परके झाले बाबांचे घर

फटके पडले बापाचे जर
उघडे आहे हे माझे घर

सासू हूनी, बाप सासरे
दीरनणंदा हे त्यांच्या उपर

सिंह जरी हा, घरात उंदिर
असा माझा पतिपरमेश्वर

शेतेविहिरी गायगुरे ही
कसले आले जीवन सुंदर

ठरला अमुचा खाण्याचा क्रम
मी आधी अन बाकी नंतर

लौकिक पाहुन तुझा "केशवा"
क्षणभर आली मलाच चक्कर

मुजरा

आमची प्रेरणा पुन्हा एकदा मिलिंद फणसे यांची गझल पृथक्

नुस्तेच पाहुनी हे मन तृप्त होत नाही
सांगावयास हे ही लज्जित होत नाही

विसरून भान सारे बघतात लोक मुजरा
गाण्यात फक्त कोणी संतुष्ट होत नाही

कोणी उरास पाही, कोणी कटीस पाही
लुब्रा कधी कलेने आकृष्ठ होत नाही

पश्चात मीलनाच्या येती मलाच डुलक्या
माझा सखा परी हा निद्रिस्त होत नाही

सरताच रात्र सारी, ती ही घरास जाई
कोणी इथे कुणाचे आजन्म होत नाही

तोंडास झाकती हे बघ माडीस सोडताना
ह्या "केशवा" प्रमाणे का धारीष्ट होत नाही

बुधवार, २१ फेब्रुवारी, २००७

काय कू

आमची प्रेरणा अनील बोकील यांच्या हायकू

साजरे केले सण
वाढलेले तन
आता पुन्हा 'जिमे'त वेट पाहणे आले
***
धुलवडीचे भांग
मी पिण्यात दंग
पाय कधी घसरला कळलच नाही
***
हिरवे जर्दा पान
चंपाबाईची तान
माझा बाप अचानक माझ्या समोर
***
चिंचा, बोरे, आवळे?
हलकट,मेले,टवळे
नक्की कुठे, केव्हा शेण खाल्ले?
***
म्हातारपणी चळ
मरायला टेकलेलेपण
'त्यांच्या' मागे धावणे सुरूच..
***
वाचक दिसेना
प्रतिसाद मिळेना
तरी 'केशवा"चे लिहिणे सुरुच...
***

केशवसुमार.

गं सखे-२ ....!!!

आमची प्रेरणा प्राजु यांची सुंदर कविता गं सखे.....!!!

सप्तसुरांच्या नावा खाली जरा कमी तू रेकत जा
गाताना सभोवतालचे थोडे भान ही ठेवत जा

शुभ्र पांढऱ्या केसांना तू कलप थोडा लावत जा
झिपऱ्यातूनी त्या थोडासा कंगवा ही फिरवत जा

निळ्या तुझ्या नयना मधली चिपाडे सुद्धा काढत जा
गोड(?) तुझ्या वदना वरती पाणी थोडे शिंपीत जा

रोज सकाळी दात आपले खराखरा तू घासत जा
मुखवासाने नंतर उर्ग श्वासास तू रोखीत जा

सप्ताहातून ह्या देहाला थोडे पाणी दावत जा
रंगेबेरंगी(?) मळके कपडे कधीतरी बदलत जा

मनोगतावर येऊन गधड्या थोडेसे तरी लाजत जा
एकतरी इथली कविता "केशवा" आता तू सोडत जा

-केशवसुमार

झाले पिणे...!

आमची प्रेरणा आदितीताईंची कविता झाले गाणे...!

जमता सारे मित्र जुने मग झाले पिणे
स्मिता, रेखा आठवता मग झाले पिणे

मदिरेचे ब्रान्ड किती हे आले गेले
त्यांना ओळखण्या साठी मग झाले पिणे

पार पडल्या सत्र परीक्षा तेव्हा साऱ्या
आज लागता निकाल मग झाले पिणे

जेव्हा कळला 'मनोरमे'चा नवीन अड्डा
त्या जाता मधूशाळेला मग झाले पिणे

मंदिरामध्ये बसून घेता ओल्या रात्री
बोटांनी नैवेद्य शिंपडूनी मग झाले पिणे

ग्लासांनी ग्लासांना देऊन हलका धक्का
आरोळ्या अन किंकाळ्या मग झाले पिणे

खंब्बे तुटले, फुटला पेला, प्रत्येकाचा
ओंजळी मधूनी "केशवा"चे मग झाले पिणे

---केशवसुमार
(११.१.२००७)

सध्याच्या या मनोगतावर...

आमची प्रेरणा अजब यांची गझल आकाशीचा चंद्र

काही जुन्या मनोगतींचे (काल्पनिक) मनोगत

सध्याच्या या मनोगतावर मन माझे लागत नाही
प्रशासकाच्या काय मनी पण कोणा उमगत नाही...

काळ बदलला मनोगतचे स्वरूप बदलत गेले
जूने जाणते कोणी आता येथे लिहीत नाही...

अनोळखी ती सर्व माणसे तरी ही माझी अपुली
हाय! अताशा त्यांच्या वाचून मजला करमत नाही...

ह्या नात्याला नाव, गाव वा पत्ता ही लागत नाही
असाच राहो स्नेह मी दुसरे काही मागत नाही...

खूप ठरवले तरी ही मी परतून येईन येथे
दुसऱ्या संकेतस्थळी "केशवा" घरपण वाटत नाही...

केशवसुमार

समजत नाही...

आमची प्रेरणा अजब यांची गझल आकाशीचा चंद्र

तुम्हा सांगतो बायकोला मी जरा ही भीत नाही
गरम पाणी नसेल तर मी भांडी ही घासत नाही...

काळ बदलला तिचे दिसणे पण तसेच बदलत गेले
वजन वाढले किती तीचे मी हिशोब ठेवत नाही...

अनोखे हे नाते आमचे साऱ्या दुनियेच्या मध्ये
बायको पुढे माझ्या माझे काहीच चालत नाही...

रोज भांडतो इतके तरी ही अजून विटलो नाही
खरे सांगतो तीच्या वाचून मलाच करमत नाही...

'अजब' चे हे काव्य काशाला तू मोडलेस "केशवा"
सगळे सांगूनी थकले तरी पण तुला समजत नाही...

केशवसुमार

गझल-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल

सांगून सुत्र तसले मज बुध्दिमंत गेले
माझी करुन काशी, मग, सर्व संत गेले

चित्कारतोस का रे खाऊनी हरभऱ्यांना
हदरून गर्जनेने बघ आसमंत गेले

काढ्यास ही नमेना, गोळीस पण नमेना
एरंड ढोसल्याने मग सर्व जंत गेले

ताडी म्हणू नका, हे आहे पवित्र पाणी
प्राशन करून तिजला मुल्ला-महंत गेले

आहे अटळ, मिलिंदा, वरवंट केशवाचा
त्याने पिटून येथे,बघ नामवंत गेले

केशवसुमार..

लढाई ..(गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची लढाई..(गझल)

कमरेस दाखवी जी सलवार पाहतो मी
रुढी परंपरा ह्या बेकार पाहतो मी

जी काल बाग होती, ती आज प्रणयभूमी
बाकांवरी इथेहा शृंगार पाहतो मी

'तुटलाय' हात डावा,कोणी 'तयार' नाही!
धुण्यास आज मजला लाचार पाहतो मी

प्रतिसाद लाटण्याची चालू बघा लढाई
त्या सर्व लेखकांचा बाजार पाहतो मी

इतिहास "केशवा"चा सांगू नका मला हो
त्याच्या विडंबने जग 'बेजार' पाहतो मी

केशवसुमार...

बाटल्या

आमची प्रेरणा वैभव जोशींचा पिंजरा

बाटल्यांना कोणी सांभाळायचे?
बेबड्यांचे सुरू झाले प्यायचे

बेवड्यांनो स्वाभिमानी व्हा जरा
शुद्ध असल्यागत अता वागायचे

मान्य कर आता चढाया लागली
बाटलीला दोष नाही द्यायचे

प्यायचे समजूतदारांसारखे?
जाऊ दे ! नाही मला झेपायचे

ठेवुया लक्षात आपण रात्रभर
तू किती अन मी किती ढोसायचे

सांग मजला आज तू आता तरी
मी कसे माझ्या घरी पोचायचे?

एक होता खांब शेजारी खरा
दोन नेहमी ते मला वाटायचे

एकटा ही मी पिण्याला लागलो
काय माझे वेगळे मग व्हायचे?

ऐकले मी "केशवा"बद्दल किती
एकदा त्याच्या सवे मज प्यायचे

केशवसुमार

माणसे (गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची माणसे (गझल)

शरम लाज सगळी विसरती माणसे
बघत खेळ तसला गुंगती माणसे

तो तिथे नाचला, मी जरा झिंगलो
नाव माझेच का सांगती माणसे?

तीच ती टेबले,त्याच त्या बायका
बदलतो बार, ना बदलती माणसे

दूर असला तरी मी तिथे पोचलो
अन नकोतीच का भेटती माणसे

नाचती लोक हे सोडनी लाज का?
"केशवा"लाच ना समजली माणसे

(केशवसुमार 69)

प्रेम -२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल प्रेम

आज तीर्थ दे जाम नाही
सोबती सखा शाम नाही

लाज बाळगू रे कशाला
तेव्हढे तिचे दाम नाही

एकनिष्ठ राहू कसा मी?
देह तेव्हढा ठाम नाही

हो पवित्र तू ही तनाने
लक्स वापर हमाम नाही

फक्त वासना प्रेम खोटे
(मी उगाच बदनाम नाही)

छेड काढशी का कविंची
"केशवा" तुला काम नाही

केशवसुमार...

शोध -२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल शोध

मुक्ती पुरोहितांना प्रणवात सापडेना
युक्ती सराइतांना प्रणयात सापडेना

देणार त्रास नाही भवसागरात अवघ्या
ती बायको कुणाला जगतात सापडेना

तो वागतो जसा की कुत्रा पिसाटलेला
का खांब एकही या शहरात सापडेना

बाहूतली प्रियाही मज वाटते सुरा ही
आहे नशा तिची जी दारूत सापडेना

तोडांस वास भपकन, डोळ्यात तर्रवादळ
माझ्याहुनी पियक्कड वस्तीत सापडेना

'केश्या' कुठून सुचली ही अवदसा तुला रे
जागा लपायला मग गावत सापडेना

शोध -२

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांचा शोध

हे जड कोठ्याचं
पोट घेऊन
मला आता जगणं
अशक्य झालंय
आता
हा मार्ग मोकळातरी व्हावा
किंवा
पूर्ण ढास तरी लागू देत

त्रिफळा चूर्णाचा शोध
मी अजून सोडला नाहीय.

केशवसुमार.

पृथक्-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल पृथक्

सॅलेड खाऊनी हे मन तृप्त होत नाही
वाढीव पोट माझे का लुप्त होत नाही

सरताच पावसाळे, सुकतात पाणसाठे
मोरीतल्या नळाचा गंगौघ होत नाही

कोणी तलाव गाठी, कोणी नदीत जाई
ह्याच्या मुळेच पाणी बघ शुद्ध होत नाही

पश्चात जेवणाच्या येताच खीर वाट्या
एकाच वाढणीने संतुष्ट होत नाही

अठवून काय घडले सुटलाय कंप मजला
सांगायची कुणाला अन भिस्त होत नाही

कोणी तरी अता का सांगल "केशवा'ला
पृथगात्मते कवी हा पण श्रेष्ठ होत नाही

शरीराने मला हो नेहमी मद्यालयी नेले

आमची प्रेरणा माफीचा साक्षीदार यांची सुंदर गझल शरीराने मला जेव्हा जरा रुग्णालयी नेले

शरीराने मला हो नेहमी मद्यालयी नेले
मदीरेने मला पण शेवटी 'देवालयी' नेले

शिकाया बायका आल्या चला हे ही बरे झाले
असे याच्याच साठी मी मला विद्यालयी नेले

सकाळी रोज तू जातेस कोठे ते कळाले अन
तुला भेटायला मीही मला दुग्धालयी नेले

नशेने सोडले कोणा फरक इतकाच केला की
कुणा भार्यालयी नेले कुणा नृत्यालयी नेले

असे मान्य मलाही मीच गुन्हेगार "माफी"चा
म्हणोनी "केशवा"ला या तुझ्या न्यायालयी नेले

केशवसुमार

शनिवार, १७ फेब्रुवारी, २००७

कशाला ! -२

आमची प्रेरणा अदिती यांची गझल कशाला !

गटारा मधे सांग जाणे कशाला
तुझे रोजचे मग नहाणे कशाला

असे रोज जर दूर जाणे कराया
अधी येव्हढे सांग खाणे कशाला

तुझे नाव माहीत साऱ्या जगाला
उगा मीच घेऊ उखाणे कशाला

जरी त्रास आहे तुला घोरण्याचा
मला झोपण्याचे बहाणे कशाला

तुझे लागलेले मला वेड आहे
मला सांगती हे शहाणे कशाला

जरा लागली गाठ जेंव्हा सुटाया
दिसावी नको ती निशाणे कशाला

करी स्नान ना त्यास येईल बदबू
अता अत्तराचे उधाणे कशाला

तुला पाहिजे हॉर्स पावर इथे जर
शिळे आंबलेले फुटाणे कशाला

कुणालाच ना माहिती बाप त्यांचा
तुला सांगु त्यांचे घराणे कशाला

(लिही "केशवा" तू स्वतःच्या कलाने
कवींचे मला वक्र पहाणे कशाला)

मात्रांच्या संकटात सापडल्यामुळे अखेरच्या शेराला कात्री लावावी वाटले होते. पण तो इथे देण्याचा मोह आवरला नाही

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २००७

शूळ -२

आमची प्रेरणा आमचे गुरुवर्य खोडसाळ यांचा शूळ

वाढताना 'नको रे!’ म्हणावे
आणि चोरुन मग का गिळावे!

आठवेना कधी प्रेम केले
चेहरे मग कसे आठवावे?

बाप झालास बारा मुलांचा
तू तुझ्या वारूस आवरावे!

वास हे खास नाहीत माझे
हे तुझ्या खेटसराचे सुगावे!

एकही मूल अद्याप नाही
मागती लोक मजला पुरावे!

हासतो हा अता आरसाही
अंग ढोले तुझे हेलकावे!

ठेवतो कोण येथे कुणाला?
प्रश्न असले कशाला पुसावे!

दार माझे मला सापडेना
सारखी दिसती सर्व दारे!

धन्य झाले कवी आज सारे
"केशवा" ठेवली खूप नावे

मिठी मधूनी कसे सुटावे?

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल मिठीतही का सखे दुरावे?

कळे न मजला कसे करावे
मिठी मधूनी कसे सुटावे?

हळू हळू बघ विरून गेले
न केस आता शिरी उरावे?

वजन न पेले मलाच माझे
कशास ठेवू तुलेस नावे

पगार संपे मिळो उधारी
कधीच काही कमी नसावे

जिथे तिथे हे खिळे निघाले
अता कसे मी इथे बसावे

ललाटरेखा कशी पुसावी
नवीन कोणी तरी पटावे!

उजाडल्या वर निघे पळाया
उदर तरी का न आत जावे

शुद्धीत यावे कधीतरी मी
उतार पीण्या...घरास जावे

जनास वाटे खरेच आता
न "केशवा" तू कधी लिहावे.

श्वासांची धडधड उगीच चालत नाही

आमची प्रेरणा चित्त यांची गझल श्वासांची धडधड काही सांगत नाही

श्वासांची धडधड उगीच चालत नाही
मी कधीच प्याला खाली ठेवत नाही

आजकाल मी बघ दिवसाढवळ्या पीतो
मी रात्ररात्रभर आता जागत नाही

मी शब्द दिला, तुज पिणार नाही आता
पण शब्द कधी मी माझा पाळत नाही?

प्रत्येक घोट हा सावकाश मी गिळतो
मी शुष्क घसा हा माझा ठेवत नाही

मी अपरात्रीला उगाच वळवळ करतो
बघ पिल्यावीण हा डोळा लागत नाही

मदिरेचे प्याले तुडुंब वाहुन गेले
पण अक्षय तृष्णा माझी भागत नाही

मी येण्याआधी सुरा गंध हा येतो
"मी आलो!" मज सांगावे लागत नाही

केली विडंबने थोरामोठ्याची तू
बघ तुझी "केशवा' आता धडगत नाही

असहाय-२

आमची प्रेरणा जयंतरावांची गझल असहाय

भात हा नुसता असा मी घेत नाही
मागतो सांबार कोणी देत नाही

खीर माझी संपली आहे कधीची
वाढपी माझ्याकडे का येत नाही?

भागली नाहीच तृष्णा काल माझी
आज बासुंदी पुरीचा बेत नाही?

वाढलेले सर्व मी खाऊन जातो
मी घरी बांधून काही नेत नाही

लाडवांचा ढीग हा ताटात माझ्या
पैज लावा, हारणे मज येत नाही

वागतो "केशवा" तू हावऱ्या गत
ह्या मुळे कोठे तुला मी नेत नाही

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २००७

विसावा-२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल विसावा

कर जरा मालीश थोडे, तेल मी चोपून आलो
मी विसावा आज घेण्या, वेळ ही काढून आलो

वाढलेले केस मजला क्लेशदायक फार झाले
रेशमी हे पाश होते आज मी कापून आलो

काल दारू घेत बसलो साथ सारे धंद राती
तर्र, सगळ्या सोबत्यांना मग घरी सोडून आलो

तुंबलेल्या माणसांचे दुखः हे सांगू कसे मी
थांब थोडा वेळ तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का "केशवा" मित्राप्रमाणे
ह्या पहा कविता तरी ही आज मी पाडून आलो !

चाल का माझी अशी हळुवार आहे

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे

चाल का माझी अशी हळुवार आहे
(फाटलेली मागुनी सलवार आहे)

मस्तकी घेऊन शेण्या चालले ते
वास हा त्यांना अता छळणार आहे?

बदलल्या मी पत्रिकांच्या चौकटीही
लग्न का याने असे जुळणार आहे?

मी सुखाने दाबतो हो चरण तीचे
मोल त्याचेही मला मिळणार आहे

तो भला माणूस जो घाली विजारी
धोतराची कास ही सुटणार आहे

पाहिला मी सूर्य हा अंधारताना
सत्त्वरी पेला अता भरणार आहे

बंद कानांचीच भोके आज केली
काव्य तुज बहुधा सखे स्फुरणार आहे

व्यर्थ येथे कष्ट मी घेऊ कशाला?
जमिन जर मज आयती मिळणार आहे !

अक्षरांची मोडुनी सारी गणीते
"केशवा"ला काव्य का जमणार आहे?

गुरुवार, १ फेब्रुवारी, २००७

बऱ्याच वेळा...३

आमची प्रेरणा यादगार यांची कविता बऱ्याच वेळा

लपवून तोंड नंतर फिरतो बऱ्याच वेळा
आधी नको नको ते करतो बऱ्याच वेळा

तू काळजी किती ही घेशील गे परंतू
अंदाज तारखांचा चुकतो बऱ्याच वेळा

रस्तात ही अताशा असतो उजेड कोठे
एकांत हवा तसा मग मिळतो बऱ्याच वेळा

घालू नकोस आता बुरखा सखे पुन्हा तू
भलतीस साद मी ही देतो बऱ्याच वेळा

सवयी नुसार मी ही होतो जरा अधीर
तो चेहरा तुझा पण नसतो बऱ्याच वेळा

साऱ्याच बायका त्या नसतात एकट्या पण
नवरा तिथेच मागे दिसतो बऱ्याच वेळा

घेतात हात धुउनी मग लोक सर्व तेथे
नाजूक हात त्यांचा नसतो बऱ्याच वेळा

बिल फाडुनी पळाला कोणी तरी प्रवासी
फसवून "केशवा"ला हसतो बऱ्याच वेळा

चिमण्या-२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची गझल चिमण्या

त्या प्रेमिकाच माझ्या मजला कुटून गेल्या
आधी तश्या चुका ही माझ्या घडून गेल्या

समजायला मला ही झाला उशीर होता
माझ्या उचापती पण त्यांना कळून गेल्या

धरल्या मनात होत्या चिमण्या गृहीत साऱ्या
एका क्षणात मजला दुर्गा दिसून गेल्या

कुरबूर अवयवांची मी एकतोय आता
बुकलून पार मजला साऱ्या निघून गेल्या

केली अशी धुलाई जन्मात ना विसरणे
नक्षाच पार माझा त्या बिघडवून गेल्या

अस्थि-हिशोब जेव्हा करण्यास बैसलो मी
सगळ्याच सापळ्याच्या संख्या चुकून गेल्या

हे शब्द पाहिले अन् सुचलेच "केशवा"ला
पुन्हा विडंबनाच्या चकल्या पडून गेल्या