एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १९ मार्च, २००७

देवा-२

आमची प्रेरणा चित्तरंजन भट यांची अप्रतिम गझल देवा

आमच्या वस्तीत असतो रोज शिवीगाळ देवा
याचसाठी जाहली बदनाम अमुची चाळ देवा

ती तुझे बघ नाव घेते , लाजताना-हासताना
घेतला जाईल आता बघ तुझ्यावर आळ देवा

पाहिले आहेस का तू नाचताना बारबाला?
एक ठुमक्यानेच तू होशील बघ घायाळ देवा

वेळ पाळावीच लागे आमच्या खानावळीची
येथली कंत्राटदारिण भलतीच तोंडाळ देवा

झगमगाटात इथल्या करशील तू भलतेच बाबा
रे नको हातात घेऊ नर्तकीचे चाळ देवा

बदलले संगीत सारे; बदल अपले कान, तूही
रॅप कर आता कशाला आरती रट्टाळ देवा

मारतिल पाकीट केव्हा ते तुला कळणार नाही
सांगतो तू ऐक माझे, पाकिटा सांभाळ देवा!

शेवटी विडंबना ह्या जायचे विसरून देवा
मानले की "केशवा'ने लिहिले वंगाळ देवा

-- केशवसुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: