एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ३० मार्च, २००७

शब्द-२

आमची प्रेरणा पुलस्ति यांचे शब्द

झोपे मध्ये चुळबुळतो
झोपे मध्ये बडबडतो!

मी लिहितो शब्द असे
तो वाचून ते का चिडतो?

तुझ्याच मनी का संभ्रम?
थेट जरी मी हे लिहितो

तव ह्रदयी किल्मिष नाही?
तोल तुझा मग का ढळतो?

जालावर लिहण्या आलो
प्रशासक पण तडमडतो

हो मीच तिचा नावडता
नको तिथे बघ कडमडतो!

"केश्या" या जालावरती
लोकांना तू का छळतो!

-- केशवसुमार

गज़ल-२

आमची प्रेरणा शिवश्री यांची गज़ल

ह्या तुझ्या हातच्या पोळ्या आताशा खावत नाही
अन् कवळी लावून सुद्धा त्या मजला चावत नाही

झडलेत कधीचे कुंतल अन् उजाड झाला बगिचा
मी उगीच या डोक्यावर गंगावन लावत नाही

सदऱ्यावर माझ्या असते पानाची तांबुल नक्षी
पण बायकोस माझ्या ती केव्हा ही भावत नाही

ही बघून काया माझी, वदला तो भोचक शिंपी
विजार-पैरण सोडा,मी तंबूंत ही मावत नाही

दाराच्या पाठीमागे ही बघणाऱ्याची गर्दी
तरी बरे दारी मी तसली पाटीही लावत नाही

बापाच्या डोक्याला मी नित्याचा झालोय ताप
मी हुशार इतका त्याच्या हाताला गावत नाही

मी पडतो-उठतो पडतो पण पुन्हा तिथे तडफडतो
मी साधे गाढव आहे कोणी ऐरावत नाही

या गुत्त्यांमध्ये कितिदा मी पाणीच केवळ पितो
अन् नशा तरी होते हे आंटीला भावत नाही

हा पिडतो "केशव" लोका लिहून विडंबने असली
लिहिलेले कोणी सुंदर ह्या मेल्या पहावत नाही

-केशवसुमार.

गुरुवार, २९ मार्च, २००७

खात आहे सर्वकाही...

आमची प्रेरणा प्रसाद यांची सुरेख गझल भास आहे सर्वकाही...

खात आहे सर्वकाही...
लंघनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्रास घेतो
(थेट नाही एकदाही...)

शब्द सारे चोर साले
एकही ना अर्थवाही...

पाठ फिरता बायकोची
मी जराही भीत नाही

शेवटी येतो घरी मी
उकिरडे फुंकून दाही

जाणिवा ह्या गोठलेल्या
अन् तुझी ही हात घाई!

"केशवा"सांभाळ आता
वागणे हे ठीक नाही

(कुठे म्हणालो परी असावी)

आमची प्रेरणा प्रणव सदाशिव काळे यांची सुरेख गझल कुठे म्हणालो परी असावी

कुठे म्हणालो परी असावी
जरा तरी पण बरी असावी

हवा तुला जर प्रचंड पैसा
चरायला नोकरी असावी

तरुण लाचार होत जावा
अशी कुणी त्या घरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
लपायला ओसरी असावी

नकोस "केश्या" उगाच गप्पा
मनात लाज्जा तरी असावी

-केशवसुमार

गोड खाणे

आमची प्रेरणा चिन्नु यांची गोड गझल गोड गाणे

मला वेड लावी सखे गोड खाणे
खुळावून खातो सखे गोड खाणे

कसे त्या शिऱ्याला विस्मरून जावे
मंतरून जाई सखे गोड खाणे

मला हालव्याची दिसे रोज वाटी
तरंगे मनाशी सखे गोड खाणे

जरी आज आले मला हे घशाशी
कसे सांग सोडू सखे गोड खाणे

उदासीन झाले किनारे दिलाचे
मधूमेह लावी सखे गोड खाणे

जरी बंद लाडू, मला आज झाले
सुरू रोज चोरी! सखे गोड खाणे ...

अता दात सुद्धा मला सांगती हे
तुझे "केशवा" रे पुरे गोड खाणे

बुधवार, २८ मार्च, २००७

पावले-२

आमच्या पावलांची प्रेरणा मिलिंद फाणसे यांची पावले

निलाजरी, बदनाम करती पावले
नको तिथे बघ रोज वळती पावले

पुन्हा पुन्हा ही रेष लक्ष्मण खोडतो
न मोहणे चुकते, न अडती पावले

परावलंबित्व काय असते वेगळे
सरळ कधी झिंगून पडती पावले?

न पाहिले चंचलचरण सौदामिनी
स्थिरावली कमरेत नवती पावले

दहा ठिकाणे लिहिण्यास ही मोकळी
मनोगती अडकून बसती पावले

न "केशवा" बदनाम उगीच तू इथे
सदा तुझी तिरकीच पडती पावले

मंगळवार, २७ मार्च, २००७

शोभते ना वागणे हे फारसे

आमची प्रेरणा अदिती यांची अवघड वृत्तातली गज़लॉईड कविता शब्द माझ्या अंतरीचे आरसे

रोज मजला वाटते लाचारसे
शब्द त्याचे बोचरे फटकारसे

ही अवस्था कोणती सांगू कसे?
बोलता ही येत नाही फारसे

काल रात्रीचा तुझा पिंगा असा
शोभते ना वागणे हे फारसे

जाऊ दे ना सोड माझी पाठ ही
संपले माझे लढाऊ वारसे

आठवे ना घेतलेले नाव ही
रोज माझे चाललेले बारसे

"केशवा" झाला पुरे अचरट पणा
तू पुणेरी ही पहावे आरसे

--केशवसुमार(२७.०३.०७)
टीप : ही कविता विडंबन म्हणून खपेल का?
ह. घ्या.

शुक्रवार, २३ मार्च, २००७

उलटसुलट केले शब्द मी हे जरासे

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची सुंदर गझल.. उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे

उलटसुलट केले शब्द मी हे जरासे
सरळ डिवचले मी त्या कवींना जरासे

चरत चरत माझी वाढते रोज जाडी
सतत लपवतो मी पोट माझे जरासे

धडगत बघ माझी आज नाही तरी ही
(भिडव सरळ डोळे बायकोला जरासे)

"सहज बघ फसवितो , लीलया हा कुणा ही!"
जपुन पण असावे "केशवा"ला जरासे

विसर पडत जाता वाढत्या या वयाचा
फिरून बघ सख्या तू आरश्याला जरासे

केशवसुमार

गुरुवार, २२ मार्च, २००७

पिंगा -२

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता पिंगा

पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
वाटेवर घालतेय पिंगा जसे

चिंचेच्या झाडावर पिंपळाच्या पारी
उलट्या पायाच्या भुताची स्वारी
रानात चालला सावल्यांचा खेळ
भुताच्या मिशीला लावलय तेल
फेंदारल्या मिशांनी भुतोबा हसे...
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

पल्याडच्या झाडावर समंध खुळा
माडांच्या पोरीला घालतोय डोळा
चांदणं रातीला सांभाळा जरा
अडव्या वाटेचा अडवा वारा
झावळ्याच्या झोक्यात भामटा बसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

माडांनी वाऱ्याशी धरला फेर
लाटांनी काठाला मांडले थेर
अवस रातीला भरती भारी
झिंगून रंगून मातली स्वारी
उलट्या पायचे उलटे ठसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे

--केशवसुमार(२२.३.२००७ चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९२९)

त्रास -२

आमची प्रेरणा चक्रपाणि यांची गझल त्रास

जास्तीच पावट्याचे झाले उगाच खाणे,
विसरू कसा अता मी? थांबे न वास येणे.

पत्नीत मेव्हणीचा हा रोज भास होणे,
मिळताच कारणे मी मग सासरास जाणे. (पत्नीस सोडण्याला मग सासरास जाणे)

सोसायचे किती मी हे बोल बायकोचे?
(होऊन तर्र का मग भार्यालयास येणे)

झाला सराव आता नुसताच पाहण्याचा,
(मदमस्त तारकांची चित्रे उश्यास घेणे)

शिकवीन मी तुला ही भाषा मुक्या मुक्यांची,
शिकण्यास एकदा पण माझ्या घरास येणे.

तू एकदा तरी रे घे ना मिठीत सखया
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.

बुधवार, २१ मार्च, २००७

तुमान लेका

आमची प्रेरणा पुलस्ति गझल वादळ-रेघा

काय करावे आता काही उमजत नाही
मला हवे "ते" तिला कसे पण समजत नाही

बुकलून गेले काल मला ते हात कुणाचे?
अवयव माझा कुठला की जो ठणकत नाही ?

गळवाचे दुखणे प्राणांतिक, सोसत नाही
मऊ गालिच्यावरती देखिल बसवत नाही

ओढुन बसली कमरेवरी तुमान लेका
नशीब माझे बसताना ती उसवत नाही

त्रास जगाला होतो साऱ्या विडंबनांचा
खंत तरी का तुला"केशवा" करवत नाही?

-- केशवसुमार.

मंगळवार, २० मार्च, २००७

काय पहाटे घडून जाते?

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख गझल स्वप्न पहाटे पडून जाते...

काय पहाटे घडून जाते?
रोज कशी ती चिडून जाते...

मनात नसते माझ्या काही
घडायचे ते घडून जाते...

ओठ मागती भलते काही
मलाच का अवघडून जाते...

तुझा चेहरा तसा बेरकी!
खरे मनातच दडून जाते...

तुझे "केशवा" असे वागणे
भल्या भल्यांना नडून जाते..

सोमवार, १९ मार्च, २००७

अता फक्त मी हात हे चोळते ....

आमची प्रेरणा अदितीताईची कविता मनाला तुझे चांदणे माळते ....

लिहावे अता ऊर दाटून येतो
लिहावे परी "केशवा" मी कसे?
तुझी याद येता उरी घाबरे मी
कश्या काढशी सांग माझी पिसे

तुझे भास होतात, साऱ्या ठिकाणी,
अनामी भीती ही मला वाटते
तुझे बेरकी ते प्रतिसाद येता
कुठे लाज माझी इथे राहते ?

कळेनाच काही कसे मी लिहावे?
लपाया अता मी कुठे जायचे?
पुरी लावलेली इथे वाट माझी
अता मायबोली कडे जायचे?

फणा काढलेल्या नागिणीपरी मी
तुझा 'चेहरा' पाहते कोसते
तुझी सर्व ती विडंबे आठवोनी
अता फक्त मी हात हे चोळते ....

--केशवसुमार(१८ मार्च २००७)
(फाल्गुन वद्य चतुर्दशी शके १९२८)

(मधुकर)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल मधुकर

तुझ्या करांचा स्पर्श कशाला, थरथर व्हावा
कळेन मजला भित्रा का हा भ्रातर व्हावा

न मोह मजला इंद्रपुरीच्या मदनाचाही
घरात सुद्धा शेर न का हा बब्बर व्हावा

कशास रागे भरसी, आहे प्रियकर का मी
तुझ्या पती मी माझा का ना आदर व्हावा

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
दूर कसा पण सासूचा हा अडसर व्हावा

असे नटावे, बघण्यानेही नेत्र भरावे
असे बघावे, नटव्यांनाही मत्सर व्हावा

कश्यामुळे निष्फळ बागे या मोहर यावा?
उपाय "केश्या" काही आता सत्त्वर व्हावा

अवरून घे पसारा

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुरेख गझल जुळवून ठेव तारा

उघडू नकोस खिडकी येईल आत वारा
मी दार लावतो, तू अवरून घे पसारा...

सखया मिठीत घे ना लाजू नकोस आता
कोणी पहात नाही ओसाड हा किनारा!

दारात थांब थोडे जाऊन आत बघतो
माझ्या पितामहांचा चढलाय काय पारा

फुकटात जेवणाचा आहे मज़ा निराळा!
(भरले कधीच नाही मी बील का विचारा...)

बोलू नकोस काही खाशील मार आता
मुडद्या तुझा मला रे कळतोय हा इशारा!

सुचतील सहज ओळी, जुळतील गझल-गाणी
नाहीच "केशवा"च्या नशिबात हा नजारा!

- केशवसुमार, पुणे

वर्म -३

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल वर्म

मालकाचे विव्हळणे ना मद्य ही चिक्कार आहे
त्या जुन्या गुत्त्यापरी हा ओळखीचा बार आहे!

शिंग कोणी मारलेले शोध ते नंतर जरा तू
(झाक हाताने अधी तू फाटली सलवार आहे)

व्यर्थ का झिंगले महात्मे, मद्य बघ संपून गेले
या बसा हासू नका मी प्यायलेलो फार आहे!

जाणतो रस्ता घराच्या , शोधता मिळती न वाटा
मी करावे मग कसे? मी चालण्या लाचार आहे!

वाहते धमन्यात ते जे "केशवा" पेल्यात होते
अर्थ शब्दांना कुठे मग, लिहिणे बेकार आहे!

-- केशवसुमार.

देवा-२

आमची प्रेरणा चित्तरंजन भट यांची अप्रतिम गझल देवा

आमच्या वस्तीत असतो रोज शिवीगाळ देवा
याचसाठी जाहली बदनाम अमुची चाळ देवा

ती तुझे बघ नाव घेते , लाजताना-हासताना
घेतला जाईल आता बघ तुझ्यावर आळ देवा

पाहिले आहेस का तू नाचताना बारबाला?
एक ठुमक्यानेच तू होशील बघ घायाळ देवा

वेळ पाळावीच लागे आमच्या खानावळीची
येथली कंत्राटदारिण भलतीच तोंडाळ देवा

झगमगाटात इथल्या करशील तू भलतेच बाबा
रे नको हातात घेऊ नर्तकीचे चाळ देवा

बदलले संगीत सारे; बदल अपले कान, तूही
रॅप कर आता कशाला आरती रट्टाळ देवा

मारतिल पाकीट केव्हा ते तुला कळणार नाही
सांगतो तू ऐक माझे, पाकिटा सांभाळ देवा!

शेवटी विडंबना ह्या जायचे विसरून देवा
मानले की "केशवा'ने लिहिले वंगाळ देवा

-- केशवसुमार

तरही गज़ल -२

आमची प्रेरणा वैभव जोशी यांनी मायबोलीवर घेतलेल्या कार्यशाळेत मीनु यांनी लिहीलेली तरही गज़ल

ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
अता बोलणे फक्त स्पर्शात होते ..

कुणी बेवडा गात जातो भसाडा ..
शिव्या फक्त देण्या जणू रात होते ..

घरी एकटी ती, असावे सवे मी ..
असे नेहमी फक्त स्वप्नात होते ..

मनी चाललेले तुझ्या जाणतो मी ..
सुरू खेळ सारे इशाऱ्यात होते ..

दुकाने सुरेची, भले बंद केली ..
तरी आमची सोय गुत्यात होते ..

मला वाटले फास बसला गळ्याला ..
करांचे तिच्या हार कंठात होते ..

सुरू श्वास नाही अधी दाखला द्या ..
म्हणे चैकशी फार मुडद्यात होते ..

कुणी एक रेडा, झपाटून जावा,
असे लाल या काय रंगात होते ?

भले तोल जावो, भले चाल बदलो ..
तरी चालणे हे दिमाखात होते ..

कुणी काव्य केले, कुणी गीत केले ..
अखेरीस त्यांची, हजामात होते ..

नडे या कवीशी नडे त्या कवीशी ..
तुला"केशवा"टेकले हात होते ..

किती येत होते किती जात होते

आमची प्रेरणा कारकून यांची वैभव जोशी ह्यांच्या गझल कार्यशालेतील जमीनीवर आधारित (सौजन्य- मायबोली) गझल ऋतू येत होते ऋतू जात होते

किती येत होते किती जात होते
पहा सर्व पंडीत कोड्यात होते!

कसे थांबवू पोट माझे प्रवाही!
असे कालच्या काय खाण्यात होते?

जरी जाहले मग्न मी देवळात
परी चित्त माझे चप्पलात होते!

कशाला तयारी नव्याने फसाया ?
भले का कुणाचे विवाहात होते!

कशाला करा हात ओले अता हे
अता काम सारे , चिठोऱ्यात होते

कुणाला कधी ना, दिले ते तुला मी
तसे सर्व माझे हिशोबात होते

रडे ती अशी आज भलत्याच वेळी
(पुन्हा घोळ झाले हिशोबात होते!)

शिवीगाळ ही "केशवा" रोज होते....
जरी व्यंग त्यांच्याच काव्यात होते

- केशवसुमार

मंगळवार, १३ मार्च, २००७

चेहरा-२

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता चेहरा आणि अनुताईची जागतिक भूत महासभा(जा.भू.म.)

मी भुतांनी बाध झालो आवसेची रात झालो
मी गिरा, मी देवचारा मी वेताळी हास्य झालो
पिंपळाचा पार दारी , चिंचेवरी समंध मी
रूप माझे कोणते सांगा खरेसे दाखवू मी?

खवीस मी मुंज्या ही मी रुप भुताचे नवे मी
रक्त सारे शोषण्यारे ड्रॅक्युल्याचे रूप ते मी
रूपकांच्या ओढण्या या ओढताना चेहऱ्याशी
"केशवा"चा चेहरा मी सांडला सांगा कुठेशी?

--केशवसुमार
(१२.३.२००७)

आनंदाने -३

आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल आनंदाने

जाता-जाता हसून जावे आनंदाने१
तोंड वाकडे करून जावे आनंदाने

स्मशानातले मुडदे सारे जिवंत व्हावे
जादूटोणा करून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
किटक नाशकं मारून जावे आनंदाने

तुझ्या तनूने पृथ्वी गोलासमान व्हावे
वजन वाढुनी, सुजून जावे आनंदाने

घरी पोचणे अशक्य व्हावे प्यालावरती
रस्त्यावरती पसरून२ जावे आनंदाने

मिळालाच तर अश्या ठिकाणी मार मिळावा
कुणालाच ते दिसू न जावे आनंदाने

मार कुठे मज किती मिळाला स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी जाण्या सुद्धा
मेकप थोडा करून जावे आनंदाने

वेळ मार खाण्याची येईल "केशा" तेव्हा
जिवलग गोळा करून जावे आनंदाने

— केशवसुमार
------------------------------------------------------------------------------------------------
१."आनंदाने" हा शब्द फक्त क्रियाविशेषण रुपांत वाचवा आणि नाम रूपांत वाचून गैरसमज करून घेउ नये. २.पसरणे- (१) पडणे, पडून रहणे (२) लोळणे किंवा झोपणे

"तरही" गझल -२

आमची प्रेरणा कामिनी केंभावी यांची "मायबोली" वर वैभव जोशींनी घेतलेल्या गझल कार्यशाळेतली गझल "तरही" गझल

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कशी नेहमी मीच गोत्यात होते

तुझा खेळ झाला पुन्हा पावसाचा
अता वाहते नीर नाकात होते

उसाच्या रसा काढण्या वेळ झाला
तुला वाटले मी गरे खात होते

इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते

अता "केशवा" हे उगा दाखले का?
तुझ्या कोठल्या त्राण काव्यात होते?

केशवसुमार

सोमवार, १२ मार्च, २००७

(रग)-२

आमची प्रेरणा अदितीताईची कविता (रग) आणि आमचे गुरुजी खोडसाळपंतांनी (रग) कवितेला दिलेला प्रतिसाद..

मनोगतावर साऱ्या कविंनी हे विसरू नये
प्रशासकाला इथल्या कधी गृहित धरू नये

तो टाकेल काढून वाट्टेल तसल लिहिलेलं
व्यक्तिगत टोमणे लिखाणात पखरू नये

विडंबन करती सारे, कधी असे कधी तसे
असू दे, म्हणून काय आम्ही कविता करू नये?

नाल्यात बेडकांचा बघ सूर लाजला
कंपूत नांदताना असे घाबरू नये

झाले अशक्य "केशवा" माश्या मारणे
म्हणून विडंबनाचे विडंबन करू नये

केशवसुमार

बुधवार, ७ मार्च, २००७

कवितेचा चोळामोळा

आमची प्रेरणा संपदा१ यांची कविता दाद

कोणत्या नावने मी रे
आता लिहावे ना कळे
ह्या विडंब वणव्यात
काव्य कोवळे हे जळे

शब्द दाहक, बोचरे
त्यांना घाबरले मन
प्रश्न सतावतो पुन्हा
कसे करावे लेखन

कसे आवरावे त्याला
द्या हो कुणी त्याला मार
आग ओकतो येव्हढी
लाज काढतो हा पार

सांग "केशवा" रे तुला
कसा येईना कंटाळा
थंड रक्ताने करीतो
कवितेचा चोळामोळा

केशवसुमार

मंगळवार, ६ मार्च, २००७

मराठमोळी -२

आमची प्रेरणा कुमार जावडेकरांची सुंदर गझल मराठमोळी

नकोस समजू साधी भोळी...
जरी नेसते साडी चोळी!

हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुझ्याच लोचट लुबऱ्या डोळी...

नकोस छेडू पुन्हा मला तू,
बाप माझा घालेल गोळी...

फकीर आम्ही! जगास लुटण्या
आता फिरतो करून टोळी!

तुला "केशवा" जमणे नाही
जो तो येथे गोंडा घोळी!

- केशवसुमार, पुणे

सोमवार, ५ मार्च, २००७

(ऋतू येत होते ऋतू जात होते- ५)

आमची प्रेरणा जयन्तरावांची सुरेख गझल ऋतू येत होते ऋतू जात होते- ५

ऋतू येत होते ऋतू जात होते
मला काय सांगा नवे होत होते

जुना तोच साकी जुनी ती सुराही
नव्याने पिणारे गटारात होते

कधी ऐकलेना पसरले कुठेही
जरी लोक सारेच प्रख्यात होते

सदा ओढणी ओढशी का तिची तू
असे काय त्या ओढणीच्यात होते

मदीरा इथे मी किती प्यायली ही
घरी जायचे हे कुणा ज्ञात होते

उतारा अता द्या मला आज कोणी
किती प्यायलो हे कुणा ज्ञात होते

न प्रतिसाद आला कुणाचा कधीही
कमी "केशवा" काय काव्यात होते?

(केशसुमार६९)

शुक्रवार, २ मार्च, २००७

"रोजची बात"

आमची प्रेरणा पुलस्ति यांची "कुणाची बात"

ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी गुंग मी रंग-ढंगात होते

उगा सांगता का कथा रावणाच्या
असे आजच्या ही जमान्यात होते

जरी खात लालू इथे 'घास' आहे
कशी रेलवे आज स्वस्तात होते?

रिकामीच मैफ़िल पहा जाहलेली
असे 'दर्द-गाणे' कुणी गात होते

मला आरसा आज कोठे मिळावा?
किती ओतले तेल केसात होते

जरा शांत आता, पहाटे निजू द्या
सुरू जंग रात्री अकस्मात होते!

अशी वेळ येता कुठे सांग जावे
न जाता फजीती समाजात होते

चढे षंढ गाडीत, त्याला भिडावे
इथे येव्हढे धैर्य कोणात होते!

शहाण्यात माला कुणी मोजले हो?
इथे सर्व वेडे अभिजात होते

अता "केशवा" रोजची बात आहे
विडंबन कसे हे झटक्यात होते

केशवसुमार..

गुरुवार, १ मार्च, २००७

खूप सोसले अर्धांगीचे बंधन मी(गझल)

आमची प्रेरणा अजब यांची गझल खूप सोसले आयुष्याचे बंधन मी (गजल)

खूप सोसले अर्धांगीचे बंधन मी
करीन आता पहा तिचे रणकंदन मी...

दिसे मवाली चेहरा माझा वरून अन्
(आतून सुद्धा मुळीच नाही सज्जन मी)...

नको तिथे हे दुखते मजला कधी कधी
बोलु न शकतो कुणास हे पण पटकन मी...

तिला भेटता, फटके पडले अनेकदा
सांग तुझ्या बापाला तुझे प्राक्तन मी...

नको "केशवा" उगा घाबरू आता तू
सांग 'अजबा' केले आहे विडंबन मी...

केशवसुमार

आज भजी कांद्याची.....

आमची प्रेरणा मानस६ यांची गझल आज फुलांची भाषा.....

आज भजी कांद्याची, मी ही तळते आहे
त्या वासाने घर सारे दरवळते आहे

करपट ढेकर आज मजला आली कशी ही ?
अरबट चरबट खाण्याने मळमळते आहे

शांत बैस रे, कधी तरी तू निमूट आता
बघेल तेव्हा कारट हे वळवळते आहे

आज लागले करास माझ्या पुन्हा नव्याने,
रक्त पाहूनी नर्स ही चळचळते आहे

आज बायको माहेरी जाण्यास निघाली,
खबर 'आतली' सर्वांना पण कळते आहे!

गझल झरा का मनोगतावर अटून गेला ,
रक्त "केशवा" चे पुन्हा सळसळते आहे!

केशवसुमार