एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

अखेर...

बासूशेठच्या कविता नुसत्याच मेंदूला सुन्न करत नाहीत तर आमच्या गलितगात्र झालेल्या लेखणीच्या पेकाटात एक सणसणीत लाथ हि घालतात...त्यांच्या अखेर ह्या अप्रतिम कवितेच विडंबन करायला घेतले अन विनोद न सुचता गंभीर झालो ...काय लोचा आहे काही कळत नाही ...

अखेर
---------

मग...
वाचक कमी झाले म्हणून
भाव उतरवावा लागला.
ऐन उमेदीत घ्यायचा
त्याच्या चाराणेच रॉयल्टि लावली त्यानं.

काही दिवस धकले.

पण, वाळतंच गेलं लिखाण
दिवसेंदिवस,
अन लेखणी लोंबू लागली, निराधार.
तेव्हा,
फाके सोसायची पाळी आली.
तेही दिवस
खाण्यावारी "निवडणूकीची गाणी" लिहून काढले त्यानं.

साहित्यीक मुल्यांपेक्षा
पोटातली भूक जास्त महत्वाची असते,
हे तर कुणा प्रास्थपितानं
चार महिने एक पौसा न देता,
चार चार सीरिअल्स लिहून घेतल्या त्याच्याकडून ,
रोख, अन,
स्वतःच नाव लावलं, पहिल्यांदा,
तेव्हापासून माहीत होतं त्याला.

किती प्रकाशक गाठले, भेटले,
कुणी कथा आवडली असं दाखवून,
भडवेगिरी केली,
कुणी वर्षोंवर्षे तंगवलं पैशांसाठी.
आसुसून वाट पाह्यली त्यानं,
पण त्याच्या कथांना विचारणारं कुणी
आलंच नाही, त्याच्या दारावर.

आता,

पंधरा-सतरा वर्ष
आयुष्याच्या चरकाने
पिळवटून, शोषून घेतलेली
त्याची लेखणी,
हायकोर्टा बाहेर
अर्ज लिहून देत असताना,
त्याला आठवत राहतात..
मेंदूत आतापर्यंत
मोरपिसासारखी सळसळलेली,
सत्तर ऐंशी कथांची
वीस पंचवीस कादंबऱ्याची
पंधरा-वीस हजार पाने...

--------------------------------------------
केशवसुमार,फ्रँकफुर्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: