एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

आता पुन्हा पाऊस येणार ...

आता पुन्हा पाऊस येणार,
मग फेसबुक काळं निळं होणार,
मग कवींना कोंब फुटणार,
मग बदाबदा स्टेटस पडणार,
मग त्यांना कविता होणार,
काय रे देवा...

मग त्या कविता कुणाला दाखवता नाही येणार,
मग त्या ते लपवणार,
मग लपवूनही त्या कुणाला तरी कळावंस वाटणार,
मग त्यांना कोणीतरी डिवचणार,
मग मित्र असतील तर कॉमेंट टाकणार,
आणि मित्र नसतील तर नुसते लाइक करणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी मला काहीच देणं घेणं नसणार...
काय रे देवा...

मग त्याच वेळी दुसऱ्या भिंतीवर चर्चा चालू असणार,
मग त्यात एखादा भजी खातानाचा जुना फोटो टाकलेला असणार,
मग त्याला अबकने लाइक दिलेली असणार,
मग कखगने त्यावर कॉमेंट लिहिलेली असणार,
मग त्यात 'तिचा' उल्लेख आलेला असणार...
मग ती नेमकं अत्ता अशीच भजी खात असेल का? असा प्रश्न पडणार,
मग उगाच दोघतिघं हळहळणार,
मग ना घेणं ना देणं पण फुकटची कांदाभजी खाणार...
काय रे देवा...

मग कवितांचे समूह ओव्हरफ्लो होत जाणार...
मग त्याला ट्यागची आर्जवं लगडणार,
मग खिडकी घट्ट लावून ठेवलेल्या आपल्या भिंतीवर ते टपकणार...
मग प्राव्हसी सेटिंग मधले ऑप्शन अपुरे अपुरे वाटणार,
मग अकौन्ट बंद करून जावंस वाटणार,
मित्रयादीतून त्यांना काढून त्या ब्लॉक यादीत टाकावंस वाटणार...
मग सारं कसं मूर्खासारखं फ्रस्टेट फ्रस्टेट होत जाणार,
पण तरीही फेसबुकवर यायची फ्रिक्वेन्सी फक्त कमी जास्त होत राहणार, पण बंद नाही पडणार,
काय रे देवा...

पाऊस पडणार...
मग कवीला कविता होणार...
मग भिंती भिंतीवर कविता दिसणार,
मग आपल्या मनाच पिंपळ पान लाज सोडून कविता करू पाहणार,
पण आपल्या ते नाही जमणार,
मग आपल्या एकदम खरं काय ते कळणार, मग आपण ओशाळणार,
मग पुन्हा वृत्तीशी परत येणार,
कविता होऊ नये म्हणून लोकांना काळजी घ्यायला सांगणार,
कॉमेंट/लाइकसाठी जालावरती कुडमुडे ' इन्स्पिरेशन कोट' शोधणार,
भज्यांचे फोटो तोपर्यंत मागे पडलेले असणार,
त्या भिंतीवरची चर्चा अनफॉलो केलेली असणार,
मग तीच्या जागी ती असणार, आपल्या जागी आपण असणार,
स्टेट्समधलं वादळ इन्स्पिरेशन कोटच्या लाइकनी भिंतीवर निपचीत झालेलं असणार...
काय रे देवा...

कविता गेल्या वर्षी पडल्या,
कविता यंदाही पडल्या...
कविता पुढच्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: